एडिटर्स चॉइस
– परेश प्रभू
संरक्षण क्षेत्रातील प्रचंड रकमेचे खरेदी व्यवहार आणि त्यामध्ये दिली जाणारी कोट्यवधींची दलाली हा विषय भारतीयांना नवा नाही. बोफोर्सपासून राफेलपर्यंतच्या खरेदी व्यवहारांवर विरोधकांकडून सत्ताधार्यांवर असे आरोप झाले आणि अशा खर्या – खोट्या आरोपांमुळे भारताचे अनेक महत्त्वाचे खरेदी व्यवहारही वर्षानुवर्षे रखडले व त्याची झळ आपल्या सैन्यदलांना सोसावी लागली.
असेच एक गाजलेले आणि अजूनही तडीस न गेलेले प्रकरण म्हणजे ऑगस्टा वेस्टलँड. खरे तर या दोन वेगवेगळ्या कंपन्या. वेस्टलँड कंपनी २००२ साली दिवाळखोरीत गेल्यानंतर ऑगस्टाने ती विकत घेतली व ऑगस्टा वेस्टलँड बनली. फिनमेक्कानिकाने २००९ साली ती विकत घेतली. ऑगस्टा वेस्टलँडला इटालियन कंपनीला अतिमहनीय व्यक्तींसाठी हेलिकॉप्टरे पुरविण्याचे कंत्राट भारत सरकारने दिले. ही कंपनी या खरेदी व्यवहारासाठी पात्र ठरावी यासाठी महत्त्वाचे निकष ऐनवेळी बदलले गेल्याचा आरोप झाला. त्यातच इटलीमध्ये सदर कंपनीच्या दलालांकडून भारतातील मध्यस्थांना लाच चारली गेल्याचा दावा करण्यात आला. संबंधित आरोपीवर टाकल्या गेलेल्या छाप्यात भारतातील हवाई दल प्रमुखाच्या जवळच्या नातलगाला, तसेच ‘एपी’ या आद्याक्षराच्या मध्यस्थाला लाच दिली गेल्याच्या नोंदी सापडल्या आणि हे ‘एपी’ म्हणजे सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल असल्याचा निष्कर्ष काहींनी काढल्याने वादाच्या या वावटळीचे लोण गांधी कुटुंबियांपर्यंत येऊन थडकले. साहजिकच त्याने देशात सनसनाटी निर्माण केली.
या प्रकरणातला दलाल ख्रिश्चन जेम्स मिशेल याच्या दुबईतून मुसक्या आवळून मोदी सरकारने त्याला खास विमानाने आणून आपल्या ताब्यात घेतले. या खळबळजनक प्रकरणात आधी इटलीतील न्यायालयाने संबंधितांना निर्दोष ठरवले, मग दोषी धरले आणि नंतर पुन्हा निर्दोष सोडले, परंतु भारतामध्ये मात्र अजून हे प्रकरण तडीस गेलेले नाही त्यामुळे अजूनही धगधगते आहे.
हे ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण आणि ज्याच्या भोवती सध्या या प्रकरणाचे सारे धागेदोरे गुंतलेले आहेत, तो ख्रिश्चन मिशेल आणि या खरेदी व्यवहारातील सर्व संबंधित घटक, एकूण घटनाक्रम याच्यासंबंधी जाणून घ्यायचे असेल तर राजू संथानम यांचे नवे पुस्तक ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ ख्रिश्चन मिशेल अँड ऑगस्टा वेस्टलँड’ हे वाचायलाच हवे. देशातील एक आघाडीची प्रकाशनसंस्था, रोली बुक्स प्रकाशित या पुस्तकाचा लेखक हा मिशेल यांचा मित्र आहे आणि त्याच्या या संबंधामुळे त्याची आणि त्याच्या विदेश दौर्यांची सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयने चौकशीही केलेली होती. परंतु त्याबाबत कोणताही आडपडदा न ठेवता या प्रकरणाविषयी संथानम यांनी या पुस्तकामध्ये लिहिले आहे. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांशी सहमत व्हायचे की नाही हे शेवटी वाचक म्हणून आपण ठरवायचे आहे, परंतु एकूण ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे अपरिहार्य आहे.
या ख्रिश्चन मिशेलचा बाप वुल्फगँग ऊर्फ वॉली मिशेल हेही शस्त्रास्त्र व्यवहारात गुंतलेले एक गूढ व्यक्तिमत्त्व. त्याच्यावर पुस्तक लिहिण्याचा आपला बेत होता व त्यासाठीच आपण वारंवार ख्रिश्चन मिशेल याला भेटत होतो व तेव्हा ऑगस्टा वेस्टलँड प्रकरण उजेडात आलेले नव्हते, परंतु जेव्हा त्याचे नाव त्या प्रकरणात आले तेव्हा आपण हे पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त झालो, असे लेखकाचे म्हणणे आहे.
या वूल्फगँग मिशेलचा परिचय इंदिरा गांधींना गुप्तचर खात्याच्या अधिकार्यांनीच करून दिलेला होता. भारतासाठी त्याने काही गोपनीय कामगिरीही बजावली होती. इंदिरा गांधींच्या हत्येपूर्वी त्याला ब्रिटनमधील खलिस्तानवाद्यांच्या संभाव्य कटाची माहिती मिळाली होती व ती त्याने इंदिरा गांधींचे सचिव आर. के. धवन यांना इंदिरा यांच्या हत्येच्या दोन आठवडे आधी पत्राद्वारे कळविली होती. परंतु दुर्दैवाने तिच्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही व इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकांनी हत्या केली
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणाची पार्श्वभूमी सर्वविदित आहेच. १९९९ साली भारतीय हवाई दलाने आपली एमआय ८ हेलिकॉप्टरे बदलून त्या जागी नवी हेलिकॉप्टरे खरेदी करण्याचे ठरवले. तेव्हा युरोकॉप्टर कंपनीचा एकच प्रस्ताव आल्याने नव्याने निविदा मागवल्या गेल्या. ऐनवेळी पात्रता निकष असे केले गेेले की ऑगस्टा वेस्टलँड या एकाच कंपनीची निविदा पात्र ठरली. तत्कालीन हवाई दल प्रमुख एस. पी. त्यागी यांचीही त्यात भूमिका राहिली व त्यासाठी त्यांच्या नातलगांना लाच दिली गेली असे आरोप झाले. पुढील घटनाक्रमांनी या प्रकरणाचे गांभीर्य वाढत गेले.
या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात जे आरोपपत्र मिशेलविरुद्ध दाखल केलेले आहे, त्यामध्ये भारतीय उच्चपदस्थांना लाच देऊन हा खरेदी व्यवहार त्यांच्या गळी उतरवल्याबद्दल मिशेल याला ३० दशलक्ष युरोची म्हणजे २२५ कोटींची लाच दिली गेल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. त्याच्या डायर्यांतील नोंदींनुसार त्याने भारतीय उच्चपदस्थांना – ज्यामध्ये हवाई दलाच्या वरिष्ठ अधिकार्यास सहा दशलक्ष युरो, नोकरशहांना ८.४ दशलक्ष युरो, तर राजकारण्यांस १५ ते १६ दशलक्ष युरो दिल्याचा आरोप आहे. अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हा पैसा भारतात वळवण्यात आल्याचा आरोप आहे.
या गुंतागुंतीच्या प्रकरणाची टप्पेवार माहिती लेखकाने या पुस्तकात दिली आहे. बोफोर्स आणि ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्यातील काही साम्यस्थळे लेखकाने अधोरेखित केली आहेत. तो म्हणतो त्याप्रमाणे, ही दोन्ही प्रकरणे विदेशात उजेडात आली. बोफोर्सचे प्रकरण स्वीडनमध्ये, तर ऑगस्टा वेस्टलँडचे इटलीमध्ये. दोन्ही प्रकरणांत त्या देशांमध्ये आरोपी निर्दोष सुटले, परंतु भारतामध्ये मात्र या प्रकरणांनी खळबळ माजवली.
गांधी घराण्याशी या प्रकरणाचा संबंध जोडला गेला त्याला कारण ठरलेली हस्तलिखित चिठ्ठी गायडो हस्क या दलालाच्या घरी टाकलेल्या छाप्यात सापडली होती. यात उल्लेख असलेला ‘एपी’ म्हणजे नेमके कोण हे अजूनही उजेडात आलेले नाही. ते इटलीतील प्रमुख राजकीय पक्षाचे नावही असू शकते असे लेखकाचे म्हणणे आहे. बोफोर्स प्रकरणातही मार्टीन आईबोच्या डायरीत आर, एन. क्यू अशी आद्याक्षरे व पैसे दिल्याच्या नोंदी आढळल्या होत्या. तेव्हाही आर म्हणजे राजीव गांधी, एन म्हणजे अरुण नेहरू व क्यू म्हणजे ऑटावियो क्वात्रोकी असल्याचे आरोप झालेेले होते, परंतु ते कधीच सिद्ध झाले नाहीत. जैन हवाला प्रकरणात लालकृष्ण अडवाणींचे नाव जेव्हा आले तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात अशा नोंदी पुरावा मानता येणार नाही असा निर्वाळा दिला आहे याकडेही लेखक लक्ष वेधतो. मिशेलच्या भारतातील हस्तांतरणाबाबत लेखकाने आपल्या मैत्रीला जागून सवाल उपस्थित केला आहे. संयुक्त अरब अमिरातीची राजकन्या शेख लतिफा पळून समुद्रमार्गे भारतात आली, तेव्हा तटरक्षक दलाने तिची परत रवानगी मायदेशी केली, त्या कृतज्ञतेपायीच ख्रिश्चन मिशेलला संयुक्त अरब अमिरातीने भारताच्या हवाली केल्याचे लेखकाचे म्हणणे आहे. हेलिकॉप्टरांच्या अपेक्षित उंचीचे प्रमाण ऑगस्टा वेस्टलँडसाठी खाली आणण्यात आले तो निर्णय पंतप्रधान कार्यालयाने आधी म्हणजे १९ नोव्हेंबर २००३ रोजी घेतला व ज्यांच्यावर ते केल्याचा आरोप आहे ते एस. पी. त्यागी हवाई दल प्रमुख नंतर म्हणजे ३१ डिसेंबर २००४ रोजी झाले, ख्रिश्चन मिशेल व फिनमेक्कानिकाचा अध्यक्ष ओर्सी याची पहिली भेट २२ डिसेंबर २००६ रोजी झाली. त्याच्या आधीच २७ सप्टेंबरला या खरेदी व्यवहारासाठी सदर कंपनी पात्र ठरली होती वगैरे युक्तिवाद लेखकाने केलेले आहेत, जे तपास यंत्रणांच्या सखोल चौकशीचा विषय आहेत, त्यामुळे त्यांना दुजोरा देता येत नाही.
ऑगस्टा वेस्टलँड व्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारामुळे भारतात चर्चेत आले, परंतु त्याच्या खूप आधी १९८७ साली याच कंपनीकडून नागरी हेलिकॉप्टर खरेदी झाली होती व तेव्हा सर्वांचा विरोध असताना तिला हिरवा कंदील दिला गेला होता याची आठवण लेखकाने करून दिली आहे. नियोजन आयोग, अर्थ मंत्रालय, पेट्रोलियम मंत्रालय वगैरे सर्व संबंधितांनी त्यावेळी विरोध केला, पंतप्रधान राजीव गांधींनी स्वतः त्या खरेदीला विरोध दर्शवलेला होता, परंतु त्यांच्याच नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्या व्यवहाराला मंजुरी दिली गेली यावर लेखकाने बोट ठेवले आहे.
ऑगस्टा वेस्टलँडचे सध्याचे प्रकरण फिनमेक्कानिका या ऑगस्टा वेस्टलँडच्या तत्कालीन पालक कंपनीतील (जी आता लिओनार्डो बनली आहे) सत्तासंघर्षामुळेही बाहेर आल्याचा लेखकाचा दावा आहे. इटलीच्या न्यायालयातील लढाईचा संपूर्ण तपशील या पुस्तकात देण्यात आला आहे.
तटस्थतेचा दावा केला गेला असला तरी लेखकाचे सर्व प्रतिपादन ख्रिश्चन मिशेलची बाजू सावरून धरण्याच्या बाजूने असल्याचे दिसते ही या पुस्तकाची मोठी मर्यादा आहे. फक्त ऑगस्टा वेस्टलँड खरेदी व्यवहाराच्या या खळबळजनक प्रकरणाबाबत अधिक जाणून घेऊ इच्छिणार्या जिज्ञासूंसाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे!