राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली. या महिन्यात नवीन ६३६ कोरोनाबाधित आढळून आले, तर केवळ एका कोरोनाबाधिताचा बळी गेला. ऑक्टोबर महिन्यात मागील जुलै २०२० ते जानेवारी २०२२ या काळात नोंदणी न झालेल्या ४६ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ४०१३ एवढी झाली आहे. दरम्यान, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १०२ एवढी आहे.
ऑक्टोबर महिन्यात दरदिवशीच्या कोरोनाबाधितांची संख्या दुहेरी आकड्यावर आली. राज्यात मागील सप्टेंबर महिन्यात नवीन १९०८ कोरोनाबाधित आणि ३ कोरोना बळींची नोंद झाली होती. ऑक्टोबर महिन्यात केवळ ५ कोरोना रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागले, तर सप्टेंबरमध्ये २२ जणांना इस्पितळात दाखल करावे लागले होते. राज्यात मागील जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंद झाली होती, तर, सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
राज्यात ऑक्टोबर महिन्यात कोरोनाबाधित आढळून येण्याची सरासरी टक्केवारी ३.२६ टक्के एवढी आहे. या महिन्यात १९ हजार ४५३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली.
सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा १०० च्या वर
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १००च्या खाली आली होती. तथापि, या महिन्याच्या अखेरीस सक्रिय रुग्णसंख्या १००च्या वर गेली असून, ती १०२ एवढी झाली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन २० कोरोनाबाधित आढळून आले. चोवीस तासांत ४२९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. राज्यातील आणखी ६ रुग्ण बरे झाले असून, नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.६ टक्के एवढे आहे. कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण ९८.४१ टक्के एवढे आहे.