एसओपीचे पालन न करणार्‍या हॉटेल्स, रेस्टॉरंटवर कारवाई

0
175

>> उपजिल्हाधिकार्‍यांचा इशारा

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनीच कोरोनासाठीच्या एसओपीचे पालन करणे आवश्यक असून जी हॉलेल्स, रेस्टॉरंन्टस, क्लब, कॅसिनो, मॉल्स आदी या एसओपीचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून प्रसंगी त्यांचा परवानाही रद्द केला जाईल, असा इशारा काल उपजिल्हाधिकारी गुरूदास देसाई यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. हॉटेल्स, रेस्टॉरंट, क्लब, कॅसिनो, मॉल्सना पोलीस आकस्मिक भेटी देणार असून एसओपीचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

यासंबंधी अधिक माहिती देताना आपण शुक्रवारी सकाळी आरोग्य अधिकारी, पोलीस यांच्याशी बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना केल्याचे देसाई म्हणाले. संध्याकाळी अन्य घटकांबरोबर बैठक घेऊन चर्चा केली. आता लॉकडाऊन परवडण्यासारखे नसून सर्व लोकांनी कोविड एसओपीचे पालन करण्याची आवश्यकता आहे व त्याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे ते म्हणाले. लोकांनी मास्क परिधान करावे, सामाजिक अंतर पाळावे, स्वच्छता बाळगावी, ताप आल्यास विनाविलंब कोरोना चाचणी करून घ्यावी असे देसाई यांनी नमूद केले. ४५ वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू झालेले असून लोकांनी न घाबरता लस टोचून घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

कोरोना झालेल्यांनी संपर्कात
आलेल्यांची माहिती द्यावी

कोरोनाचा संसर्ग झालेल्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांची महिती द्यावी. म्हणजे त्यांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करता येईल. कोरोना झालेल्या एका माणसामागे त्याच्या संपर्कात आलेल्या किमान २५ जणांना शोधून त्यांची चाचणी करावी लागते.लोकांमध्ये जागृती घडवून आणण्याच्या कामी समाज कार्यकर्ते, पत्रकार व अन्यांनी मदत करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.