राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढतीच

0
143

>> २८० नवे रुग्ण, एकाचा मृत्यू

>> सध्याच्या रुग्णांची संख्या १,९१४

राज्यात नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मागील चोवीस तासांत २८० बाधित नवे रुग्ण सापडले असून रुग्णवाढीच्या पुन्हा एकदा नव्या उच्चांकांची नोंद झाली. तसेच, काल आणखी एका रुग्णाचा बळी गेला आहे. राज्यात नव्या कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण १० टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील सध्याच्या रुग्णांची संख्या दोन हजारांजवळ येऊन ठेपली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या १,९१४ एवढी झाली आहे.

पणजी, पर्वरीत रुग्ण वाढले
राजधानी पणजीमध्ये २१० आणि पर्वरीमध्ये २०० सध्याच्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तसेच मडगाव, फोंडा, वास्को, कांदोळी, कुठ्ठाळी, कासावली, म्हापसा या ठिकाणी कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील दहा ठिकाणी सध्याच्या रुग्णांची संख्या १,३४३ एवढी आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी २६५ बाधित रुग्ण आढळले आले होते. या महिन्याच्या दुसर्‍या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८३२ एवढी झाली आहे. आणखी २ प्रवासी कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ५८४ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित आणखी ८१ रुग्ण बरे झाले आहेत. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या ५५ हजार ८३८ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.३१टक्के एवढे आहे.

कोरोना पॉझिटिव्ह नवीन १४८ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत. चोवीस तासांत २०२९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील १३.७९ टक्के नमुने बाधित आढळून आले आहेत.
मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १८८ झाली आहे. फोंड्यात १५१ रुग्ण, कांदोळीत १४१ रुग्ण, वास्कोत १२८ रुग्ण आणि म्हापशात ८४ रुग्ण आहेत.

चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. कुठ्ठाळीत ८४ रुग्ण, कासावली ७३ रुग्ण, कांदोळी ६२ रुग्ण, चिंचिणी ५५ रुग्ण, शिवोली ६७ रुग्ण, साखळी ४३ रुग्ण, नावेली २५ रुग्ण, लोटली ३३ रुग्ण, हळदोणा ४३ रुग्ण, खोर्ली ४१ रुग्ण, डिचोली ३१ रुग्ण आहेत. तसेच, आणखी २ प्रवासी कोरोनाबाधित झाले आहेत.

मास्क न वापरणार्‍यांवर
पोलिसांकडून कारवाई

राज्यात कोरोना रुग्णाच्या पुन्हा वाढ होत असल्याने पोलीस यंत्रणेला जाग आली असून मास्क परिधान न करणार्‍या नागरिकांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे.
येथील पणजी पोलिसांनी येथील चर्च चौक परिसर, मिरामार आदी ठिकाणी कोरोना रुग्ण वाढीबाबत जनजागृतीला सुरुवात केली आहे. या जनजागृतीच्या वेळी मास्क परिधान न करणार्‍या नागरिक आणि पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोना रुग्ण वाढीच्या पार्श्‍वभूमीवर कोविड नियमावलीचे कडक पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

पुण्यात रात्रीची संचारबंदी

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल पुण्यात संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट आजपासून सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार आहे. तसेच, पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार असल्याची माहितीही यावेळी श्री. राव यांनी दिली. सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहतील. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळे, मॉल, थिएटर्स बंद असतील. शाळा, महाविद्यालये ३० एप्रिल पर्यंत बंद असतील अशी माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

रॉबर्ट वाड्रा कोरोनाबाधित
कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती उद्योजक रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यामुळे प्रियांका गांधी यांना विलगीकरणात रहावे लागणार आहे. प्रियांका गांधी यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली.

माझी चाचणी निगेटिव्ह आली आहे मात्र मला काही दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे माझा आसाम दौरा रद्द करावा लागणार आहे. मी कॉंग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते, असे ट्विट प्रियांका यांनी केले आहे. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधींनी पश्चिम बंगालमध्ये व आसामममध्ये निवडणूक प्रचार रॅलीत सहभाग घेतला होता.