एल्गार १२व्या तर आमला सातव्या स्थानी

0
101

दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज हाशिम आमला व डीन एल्गार यांनी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या पोचेफस्ट्रूम येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील भरीव कामगिरीच्या जोरावर या द्वयीने सकारात्मक दिशेने वाटचाल कायम राखली. पहिल्या डावात १३७ व दुसर्‍या डावात २८ धावा करत आमलाने एका क्रमाने वर सरकताना सातवे तर डावखुरा सलामीवीर एल्गारने (१९९ व १८ धावा) चार स्थानांची सुधारणा करत १२व्या स्थानावर हक्क सांगितला आहे. आमलाने यापूर्वी कसोटी फलंदाजांत अव्वल स्थान मिळविलेले असून एल्गारने यंदा मार्च महिन्यात आपले सर्वोत्तम ११वे स्थान गाठले होते. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार फाफ ड्युप्लेसिस (+ २, १६वे स्थान) व तेंबा बवुमा (+ ३, ३६वे स्थान) यांनी प्रगती साधली आहे. गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने एका क्रमाने उडी घेत पाचवे स्थान प्राप्त केले आहे. सामन्यात ७ बळी घेतलेला भारतीय वंशाचा डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने पाच स्थानांची झेप घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम १८वे स्थान मिळविले. दक्षिण आफ्रिकेचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन झाल्यानंतर द. आफ्रिकेच्या फिरकीपटूने मिळविलेले हे दुसरे सर्वोत्तम स्थान आहे. पॉल हॅरिसने डिसेंबर २००९ मध्ये सहाव्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती.
बांगलादेश संघाचा विचार केल्यास फलंदाजीत मोमिनूल हकने एका स्थानाची तर महमुदुल्लाने दोन स्थानांची सुधारणा करत अनुक्रमे ३७वे व ५२ वे स्थान मिळविले आहे.

अबुधाबी कसोटीत पाकिस्तानला २१ धावांनी नमविलेल्या श्रीलंकेच्या संघाचा कर्णधार दिनेश चंदीमलने १३ क्रमांकांनी पुढे जाताना विसावे स्थान मिळविले. त्याने या कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद १५५ व दुसर्‍या डावात ७ धावा केल्या होत्या. सलामीवीर दिमुथ करुणारत्ने (+ ५, २६वे स्थान), निरोशन डिकवेला (+ २०, ४१वे स्थान) यांनी आपल्या कामगिरीच्या बळावर चढत्या क्रमाने प्रवास कायम ठेवला आहे.
गोलंदाजी विभागात दिलरुवान परेरा (+ १, २६वे स्थान), नुवान प्रदीप (+ १, ३३वे स्थान) व सुरंगा लकमल (+ २, ३६वे स्थान) यांनी ‘अव्वल २०’मध्ये स्थान मिळविण्याकडे वाटचाल केली आहे. अबुधाबी कसोटीत ११ बळी घेऊनही रंगना हेराथच्या चौथ्या स्थानात कोणताही फरक पडला नाही. परंतु, या कामगिरीच्या बळावर ३७ रँकिंग गुणांच्या कमाईसह तिसर्‍या स्थानावरील अश्‍विन व आपल्यातील अंतर ६ गुणांपर्यंत कमी केले आहे. श्रीलंकेविरुद्ध ८ बळी घेऊनही यासिर शाहच्या १५व्या स्थानात फरक पडलेला नाही. मोहम्मद अब्बास याने ३ स्थानांची प्रगती करत ४२वा क्रमांक मिळविला. पदार्पणवीर हॅरिस सोहेलने ७१व्या स्थानासह फलंदाजी क्रमवारीत प्रवेश केला.

विराटच्या स्थानाला धोका
भारताचा कर्णधार विराट कोहली कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. विराटच्या खात्यात ८०६ गुण जमा आहे. हाशिम आमला ७७६ गुणांवर असून बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीतील चांगली कामगिरी त्याला विराटला मागे टाकण्यास मदत करू शकते. तसेच १०व्या स्थानावरील अजिंक्य रहाणे ‘टॉप १०’ बाहेर जाऊ शकतो. अजिंक्यच्या खात्यात ७६० तर १२व्या स्थानावरील एल्गारकडे ७१६ गुण आहेत.