एलटीटीई प्रमुख प्रभाकरन जिवंत!

0
10

>> जागतिक तामिळ फेडरेशनच्या अध्यक्षांचा दावा

लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (एलटीटीई) या श्रीलंकेतील तमिळ अतिरेकी संघटनेचा प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरन जिवंत असल्याचा धक्कादायक दावा जागतिक तामिळ फेडरेशनचे अध्यक्ष पी. नेदुमारन यांनी काल केला. प्रभाकरन जिवंत आहे, तो सुखरुप आहे आणि लवकरच सर्वांसमोर येईल, असे त्यांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे.

थांजावूर येथील मुल्लिवाइक्कल मेमोरिअलमध्ये सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पी. नेदुमारन यांनी प्रभाकरन जिवंत असल्याची माहिती दिली. आपण एलटीटीई प्रमुख वेलुपिल्लई प्रभाकरनबद्दल काही सांगू इच्छितो. तो जिवंत आहे आणि सुखरूप आहे. आम्हाला विश्वास आहे की यामुळे त्याच्याबद्दल सुरू असलेल्या अफवांना पूर्णवराम लागेल. तो लवकरच सर्वांसमोर येईल, अशी शक्यता देखील नेदुमारन यांनी वर्तवली.
2009 मध्ये श्रीलंकेच्या सैन्याने एलटीटीईचे वर्चस्व असलेल्या भागात एक मोठी लष्करी कारवाई सुरू केली. त्यामध्ये प्रभाकरन मारला गेल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी श्रीलंकेच्या लष्कराने एक छायाचित्रही जारी केले होते. त्यात मृतदेह दाखवण्यात आला होता. एलटीटीईचा म्होरक्या प्रभाकरनसोबतच या संपूर्ण संघटनेच्या मुसक्या आवळल्यानंतर दक्षिण भारतात, विशेषत: तामिळनाडू आणि आसपासच्या भागातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र आता नेदुमारन यांनी केलेल्या या धक्कादायक दाव्यामुळे पुन्हा खळबळ
उडाली आहे.

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत प्रभाकरनचा सहभाग होता. ही हत्या होण्यापूर्वीही एकदा प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता.

श्रीलंकेच्या लष्कराने पी. नेदुमारन यांचा दावा फेटाळला
श्रीलंकेच्या लष्कराने प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. प्रभाकरन ठार झाल्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामध्ये डीएनए अहवालाचा समावेश आहे. त्याआधारे तो ठार झाल्याचे सिद्ध होत असल्याचे श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर रवी हेराथ यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला प्रभाकरन जिवंत असल्याच्या दाव्यावर श्रीलंका सरकारने प्रतिक्रिया दिली असून, मंत्रालय या दाव्याची चौकशी करेल, असे श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी म्हटले आहे.