हडफडे, बागा किनाऱ्यावरील दुकानांतील घटना
पोलिसांकडून एकूण 9 जणांवर गुन्हे दाखल
उत्तर गोव्यातील हडफडे आणि बागा या समुद्रकिनारी भागातील दोन दुकानाच्या एलईडी फलकावर पाकिस्तान जिंदाबाद असे लिहिलेले झळकल्याने एकच खळबळ काल उडाली. या प्रकरणी कळंगुट आणि हणजूण पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. हणजूण पोलिसांनी पाच जणांच्या विरोधात तर, कळंगुट पोलिसांनी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
हडफडे येथील एका व्हिस्की पीडिया वाईन स्टोअर या मद्य विक्रीच्या दुकानाच्या एलईडी फलकावर रात्री 9.50 च्या सुमारास ‘पाकिस्तान झिंदाबाद’ झळकत असल्याचे तेथील नागरिकांना आढळून आले. स्थानिकांनी दुकान चालकाला जाब विचारला असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.
हणजूण पोलिसांनी या प्रकरणात रंचित भाटिया (हरियाणा), विपिन पाहुजा (हरयाणा), विनयचंद्र राव (कर्नाटक), कृष्णा लमाणी (कर्नाटक) आणि मनोज कुमार (बिहार) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. संशयितांनी वाईन स्टोअरवर लावलेल्या एलईडी बोर्डवर व्हिस्की पीडिया असे लिहिलेले मजकूर स्क्रोल करताना जाणूनबुजून पाकिस्तान झिंदाबाद असे घोषवाक्य दाखवले. यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेविरुद्ध दुरावा निर्माण झाला, इंटरनेट, संगणक सिस्टमशी जोडलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे देशद्रोहाचे, राष्ट्रविरोधी संदेश प्रदर्शित करून सामान्य जनतेमध्ये सार्वजनिक अशांतता आणि संताप निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संशयितावर ठेवण्यात आला आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात 4 नोव्हेंबरला रोजी रात्री 10.18 च्या सांवतावाडो कळंगुट येथील न्यू रिव्हाइव्ह युनिसेक्स सलूनच्या एलईडी फलकावर पाकिस्तान झिंदाबाद असे वाक्य झळकले. कळंगुट पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद फरमान सजाउद्दीन (मुरादाबाद, उत्तर प्रदेश), नौशाद कासिम (दिल्ली), मोहम्मद शवेझ वार अय्युब अहमद (बिजनौर, उत्तर प्रदेश) आणि राकेश रंजन दास (कळंगुट) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुकानात लावलेल्या एलईडी डिस्प्ले बोर्डवर जाणूनबुजून आणि जाणूनबुजून पाकिस्तान झिंदाबाद असे घोषवाक्य लावले, असा आरोप संशयितावर ठेवण्यात आला आहे.
कडक कारवाई ः मुख्यमंत्री
या प्रकरणात गुंतलेल्या संशयित आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. देशविरोधी कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिला.