एप्रिल २०१९ पर्यंत जुवारी पूल पूर्णत्वास

0
188

>> साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांची पत्रपरिषदेत माहिती

नव्या आठ पदरी केबल स्टेड जुवारी पुलाचे ३० टक्के काम पूर्ण झालेले असून एप्रिल २०१९ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ढवळीकर यांनी पत्रकारांना प्रत्यक्ष पुलाच्या बांधकामस्थळी नेऊन पुलासंबंधीची सविस्तर माहिती दिली.

३ हजार कोटी रुपयांच्या या पुलाचे काम वेगात सुरू असून त्यामुळे काम निर्धारित वेळेत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुलाचा खर्च वाढू शकतो, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी केले.

पुलावर दोन मनोरे
ह्या पुलावर दोन मनोरे उभारण्यात येणार असून १२० मीटर एवढ्या ऊंचीचे हे मनोरे स्थानिक लोकांबरोबरच पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरणार असल्याचे मत ढवळीकर यांनी यावेळी व्यक्त केले. ह्या मनोर्‍यांवरून लोकांना चहुबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येणार आहे. शक्य झाल्यास तेथे एक रेस्टॉरन्टही उभारण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. ह्या मनोर्‍यांवर जाण्यासाठी लिफ्टची सोय असेल.
पुलाच्या कमानी तयार करण्याचे कामही सध्या जोरात चालू आहे. पुलाचे खांब उभारण्यासाठी सुमारे ६० फूट खोल पाया घालण्यात आला आहे.
ह्या पुलासाठी उत्तरेच्या बाजूने बांबोळी ते आगशी व दक्षिणेच्या दिशेने वेर्णे ते कुठ्ठाळीपर्यंत खांब उभारण्यात आले आहेत. पुलाच्या जोड रस्त्यांसाठी अतिरिक्त जमीन संपादन करण्याचे काम झालेले आहे. दिलीप बिल्डकॉम ही नामांकित कंपनी हा पूल बांधत आहे. ह्या कंपनीने आतापर्यंत निर्धारित वेळेतच हाती घेतलेल्या पुलांचे काम पूर्ण केलेले आहे, अशी माहिती ढवळीकर यांनी यावेळी दिली.
या पुलाचा आराखडा पंकज गोयल यांनी तयार केलेला आहे. सध्या पुलाचे काम युद्ध पातळीवर चालू असल्याचे ते म्हणाले.

बोरी, बाणस्तारीत नवे पूल
बोरी व बाणस्तारी येथे नवे सहा पदरी पूल उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या निविदा येत्या ऑक्टोबर महिन्यात काढण्यात येणार असल्याची माहितीही ढवळीकर यांनी यावेळी दिली. बोरी व बाणस्तारी येथे सध्या असलेले पूल न मोडता नवे सहापदरी पूल बांधण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
खांडेपार येथील पुलाचे काम २ वर्षांत पूर्ण होणार असल्याचे सांगतानाच काणकोण येथील पुलाचेही काम पूर्णत्वाकडे आले असल्याचे ते म्हणाले.

दुतर्फा झाडांसाठी
६० कोटींचा निधी
महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी केंद्र सरकारने ६० कोटी रुपये एवढा निधी गोवा सरकारला दिला असल्याची माहितीही ढवळीकर यांनी यावेळी दिली.

पत्रादेवी – पेडणे महामार्ग काम रखडणार
पत्रादेवी ते पेडणे या राष्ट्रीय महामार्ग १७ चे काम पूर्ण होण्यास आणखी चार वर्षे प्रतिक्षा करावी लागणार असल्याची माहिती बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली.

या महामार्गाचे ठिकठिकाणी काम चालू आहे. दक्षिणेच्या तुलनेत उत्तर गोव्यात जास्त काम झालेले आहे. कुंकळ्ळीसह काही ठिकाणी लोकांनी मार्ग बदलण्याची मागणी केली असल्याचे ते म्हणाले.