तब्बल 1 लाख 87 हजार कोटींचा महसूल सरकारच्या तिजोरीत
गत एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक जीएसटी संकलन झाले असून, तब्बल 1 लाख 87 हजार कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या माध्यमातून जमा झाला आहे. जीएसटी कर संकलन सुरू झाल्यापासून ही आजवरची सर्वाधिक नोंद आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने ही आकडेवारी जारी केली.
एप्रिल 2023 मध्ये 1,87,035 कोटी जीएसटी जमा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार त्यातील केंद्राचा वाटा म्हणजेच सीजीएसटी 38,440 कोटी रुपये आहे, तर राज्याचा वाटा म्हणजेच एसजीएसटी 47,412 कोटी रुपये इतका आहे. एकात्मिक जीएसटी म्हणजेच आयजीएसटी संकलन 89,158 कोटी रुपये आहे.
यापूर्वी सर्वाधिक जीएसटी संकलनाचा 1.75 लाख कोटी रुपये इतका होता. आता 1.87 लाख कोटींचा जीएसटी गोळा करुन नवा उच्चांक स्थापित करण्यात आला आहे. मागील महिन्यात म्हणजे मार्च 2023 मध्ये तब्बल 1.60 लाख कोटी रुपयांचा जीएसटी कर गोळा करण्यात आला होता.
एप्रिल 2023 या महिन्यात जीएसटी सुसंगत तब्बल 9 कोटी व्यवहार नोंदवण्यात आले. यापूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये नोंदवण्यात आलेल्या 8.1 कोटी ई वे बिलांच्या तुलनेत एप्रिलमधील वाढ ही तब्बल 11 टक्के जास्त आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक जीएसटी सुसंगत व्यवहार 20 एप्रिल रोजी करण्यात आले, असेही केंद्र सकारने जारी केलेल्या आकडेवारीत स्पष्ट करण्यात आले आहे. 20 एप्रिल 2023 या एकाच दिवसात 9.8 लाख व्यवहारातून तब्बल 68,228 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा करण्यात आला. या तारखेच्या बरोबर 1 वर्षापूर्वी 20 एप्रिल 2022 रोजी 9.6 लाख व्यवहारातून 57,846 कोटी रुपयाचा जीएसटी मिळाला होता.
एप्रिल 2023 मध्ये झालेल्या व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सर्वाधिक जीएसटी संकलनाची नोंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे अपेक्षेनुसार एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाने आजवरचे जीएसटी करवसुलीचे सर्व विक्रम मोडत नवा उच्चांक गाठला आहे.
जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल
देशात सर्वाधिक जीएसटी संकलन करुन देणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. महाराष्ट्रातून एप्रिल 2023 मध्ये 33,196 कोटी रुपयांचा जीएसटी संकलित झाला. गेल्या वर्षी म्हणजे एप्रिल 2022 मध्ये हा आकडा 27495 कोटी रुपये होता. महाराष्ट्रानंतर जीएसटी संकलनात दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून, 14593 कोटी रुपये कर संकलित केला आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात असून, 11721 कोटी रुपयांचा जीएसटी संकलित करुन दिला आहे.