एटीएम चोरी : दिल्लीत तिघांना अटक

0
286

>> दिल्ली पोलिसांची धडक कारवाई

>> संशयितांकडून रोख रकमेसह पिस्तूल जप्त

आंबिर्ण सुकूर येथील युनियन बँकेचे एटीएम मशीन दि. १७ रोजी पळवून त्यातील रोख रक्कम पळवणार्‍या तिघांच्या दिल्ली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. या चोरांकडून सुमारे साडेतीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोवा गुन्हे शाखा आणि उत्तर गोवा जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतील सीमापुरी झोपडपट्टीतून प्रमुख आरोपी रुस्तम सुहाग, मोहम्मद सफी आणि सफिकूल मुल्ला यांच्या मुसक्या आवळल्या. हे तिघेही आरोपी बांगलादेशी असून दोन दिवसांपूर्वी गोव्यात आले होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी कळंगुटमधून दुचाकी भाड्याने घेतली होती, दुचाकीवरून त्यांनी शनिवारी पर्वरीत फिरून एटीएमची रेकी केली आणि दि. १७ रोजी मध्यरात्रीनंतर त्यांनी आंबिर्ण सुकूर येथील एटीएम मशीन पळविण्यात यश मिळविले. या प्रकरणात वरील तिघांचा हात असल्याचे निष्पन्न झाले.

गोवा पोलिसांनी कळंगुटमधून त्यांची माहिती मिळवून त्यांचे मोबाईल ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला असता ते गोव्याच्या हद्दीबाहेर गेल्याचे समजले. गोवा पोलिसांनी मोबाईल सर्व्हेलन्सवरून त्यांचा ठावठिकाणा घेण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्ली येथे असल्याचे समजले. पोलिसांनी त्वरित दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सीमापुरी झोपडपट्टीतील तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यातील प्रमुख आरोपी रुस्तम सुहाग याचा पळून जाण्याचा प्रयत्न हाणून पाडला. पळ काढणार्‍या रुस्तमवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात तो जखमी झाला. गोव्यातून पोलिसांचे एक पथक आरोपीना आणण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. आरोपीना गोव्यात आणल्यावरच पुढील तपासाला गती येईल. उत्तर गोवा अधीक्षक उत्कृष्ट प्रसून, उपअधीक्षक एडविन कुलासो, पर्वरीचे निरीक्षक निनाद देऊलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास कामात भाग घेतला.