एक प्रवास

0
5
  • सुरेखा सुरेश गावस-देसाई

आजची पिढी वाया गेलेली नाही. ती प्रगल्भ, व्यवहारी, चाणाक्ष आहे. पण त्यांच्यापुढे आदर्श कोणाचे? कसले? म्हणून तर कित्येकांना ‘इझी मनी’ तोही कशातही बिझी न राहता हवा आहे. शॉर्टकटने मिळाला तर सोने पे सुहागा!

मा निषाद! प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती समाः
याक्रौंच मिथुनादेकम्‌‍ अवधी काममोहितम्‌‍।
महर्षी वाल्मीकी तमसा नदीच्या तीरी चालले होते. मध्येच त्यांना आकर्षक सारस पक्ष्यांची जोडी दिसली. प्रेमात दंग, कामक्रीडेत रंगलेले पक्षी पाहून महर्षी प्रमुदित झाले. इतक्यात सूंऽऽ सूंऽऽ करत तेथे आलेल्या तीराने एका पक्ष्याचा अचूक वेध घेतला. खाली पडलेल्या पक्ष्याची तडफड, आसन्नमरण अवस्था पाहून जोडीदार व्याकूळ होतो आणि विरहाच्या कल्पनेने विलाप करणाऱ्या पक्ष्याला पाहून महर्षी व्यथित होतात. त्याचवेळी आपली पारध (पक्षी- सावज) नेण्यासाठी आलेला पारधी तेथे पोचतो. महर्षींच्या तोंडून निघालेला पहिला संस्कृत श्लोक-
शोकात्‌‍, श्लोकम्‌‍ आपसते. पक्ष्यामुळे प्रेरणा मिळते. ‘हे व्याधा, तुला कधीच शांती- सुख-समाधान मिळणार नाही. कारण तू कामक्रीडेत मग्न असलेल्या एका पक्ष्याची शिकार केली आहेस.’ ती व्याधासाठी महर्षींची शापवाणी असते. वस्तुतः तीरकमान घेऊन शिकार करणे व कुटुंबासह आपली गुजराण करणे हे त्याचे कर्तव्य होते, धर्म होता.

महर्षी भूतकाळात वाटसरूंवर फरशीने वार करून त्यांना ठार मारत असे. लुटमार, वाटमारी करताना कधीही त्याचे मन कचरले नाही, द्रवले नाही की मनाला पाझर फुटला नाही-
माझी गाडी ट्रॅकवरून घसरत होती, मनाने डोक्यावर टपली मारली, रुळावर आणले-
आता ते महर्षी वाल्मीकी आहेत. तेव्हा तो जंगलात राहणारा वाल्याकोळी होता. कुटुंबाच्या उदरभरणासाठी वाटमारी, लूटमार हीच त्याची रोजीरोटी. सर्वत्र जंगलच जंगल! अधेमध्ये वस्ती-गाव. लोकांना जंगलातून ये-जा करावी लागे. वाल्या कोळी ते वाल्या; वाल्या ते वाटमारी करणारा लुटारू; लुटारू ते वाल्मीकी; वाल्मीकी ते वाल्मीकी महर्षी! ज्याला ‘राम’ या जपमंत्रातील ‘र’ धडपणे उच्चारता येत नव्हता, तोच ‘रामायण’ या महाकाव्याची रचना करणार होता; उत्कटता, समरसता, एकाग्रता, आशावाद, सकारात्मकता यांच्या जोरावर.
वाल्या घनदाट, निबिड अशा अरण्यात एकांतात गेला. हळूहळू सरावाने राम-नाम जपमंत्र जपू लागला. वाल्याने खडतर तपश्चर्या- घोर तपस्या केली. वाल्याला नारदासारखा देवर्षी सल्लागार, मार्गदर्शक गुरू योग्यवेळी भेटला. तेही पालनकर्त्या विष्णूमुळे. नारदमुनी त्रैलोक्याचे वार्ताहर! ‘कळलाव्या नारद’, इकडचे तिकडे करणारा; पण हेतू चांगला असायचा. देवर्षी नारद वीणेच्या तारा छेडत ‘नाऽऽरायण, नाऽऽरायण’ म्हणत तिन्ही लोकांत विहार करत, संचार करत.

भगवान विष्णूनी पृथ्वीवर मानवाच्या रूपात सातवा अवतार घेतला तो राम म्हणून. मर्यादापुरुषोत्तम राम म्हणजे आदर्श राजा! आदर्श राजाचे राज्य म्हणजे रामराज्य! जेथे सर्व प्रजा सुखी, समाधानी, आनंदी. दोनवेळेला पोटभर जेवून- तेही स्वतःच्या मेहनतीचे- तृप्तीचे ढेकर देणारी प्रजा! कशाला होतील तंटेबखेडे? कसले वादविवाद?
रामायणातील नात्यांची गुंफण, नातेसंबंधातील कर्तव्ये- त्यांचे आदर्श चकित करणारे! प्रजेने- लोकांनी त्यानुसार आचरण करावे, शिकवण घ्यावी म्हणून रामकथा-रामचरित्र लिखित स्वरूपात असावे असे पालनकर्त्या विष्णूंना वाटे. ही कामगिरी विष्णुदेवांनी देवर्षी नारदावर सोपवली. रामायणाचा रचयिता- लेखक म्हणून देवर्षीनी वाल्याची निवड केली. वाल्याचा उद्धार केला. वाल्मीकी महर्षी आदिकवी व रामायण आद्यकाव्य! 24,000 श्लोकांचे पौराणिक महाकाव्य म्हणजे ‘रामायण!’

एके दिवशी नेहमीप्रमाणे एका झाडाआड येण्या-जाण्याच्या वाटेवर वाल्या लपून राहिला. वाटसरू आला की त्याच्यासमोर जायचे, दरडवायचे, धमकवायचे, कां-कू केल्यास धारदार-चमकदार फरशीने वार करून ठार मारायचे, मिळेल ते लुटून न्यायचे हा त्याचा शिरस्ता. पण त्या दिवशी जो वाटसरू समोर आला तो ‘नाऽऽरायण नाऽऽरायण’ म्हणत, वीणेच्या तारा छेडत हसत-हसत उभा! आतापर्यंत अचानक समोर आलेल्या वाल्याला पाहून लोकांची बोबडीच वळायची. पण देवर्षींचा नूरच वेगळा- सूरही आगळा! त्यांनीच न घाबरता बावरलेल्या वाल्याची समजूत काढली- ‘मला मारून तुला काय मिळणार? तू आतापर्यंत या फरशीचा वापर करून कित्येकांना यमसदनी पाठविलेस. तुझ्या संसारासाठी कित्येकांचे संसार उधळून लावलेस. तू चुकतो आहेस वाल्या. तू जे करतो आहेस ते पाप आहे. ज्यांच्यासाठी तू करतो आहेस ते तरी तुझ्या पापाचे वाटेकरी होतील का?’ अतिआत्मविश्वासाने घरी गेलेला वाल्या लागलीच जड पावलांनी परतला. त्याने देवर्षींच्या पायावर लोळण घेतली. ‘अरे वाल्या, पुण्याचे सगळे धनी, पापाला नाही कुणी वाली! आता रामनाप जप, सुटका होईल,’ असे म्हणून देवर्षी अंतर्धान पावले.

वाल्याने एकांतात रामनाम, ध्यानधारणा सुरू केली. निश्चल-अविचल बसलेल्या वाल्याभोवती मुंग्यांनी वारूळ (वाल्मीक) केले. कालांतराने तेथे देवर्षी पोहोचले. एका वारूळातून अस्पष्ट आवाज येत होता. देवर्षींनी हळूवारपणे वारूळ बाजूला करून वाल्याला- वाल्मीकींना बाहेर काढले. अखंड रामनाम, ध्यान-मनन-चिंतन यात देहभान हरपलेले असे आमूलाग्र बदल त्यांच्यात झाले होते. त्यांना ज्ञानप्राप्ती व दिव्यदृष्टी लाभली होती. देवर्षींकडून त्यांनी रामकथा जाणून घेतली. दिव्यदृष्टीमुळे त्यांना सर्वकाही दिसत होते. आणि महर्षींनी रामायण लिहून काढले.

रामायणातून मानवी स्वभावाचे अनेक कंगोरे समोर येतात ते त्यातील विविध पात्रांच्या स्वरूपात! प्रजेचा लाडका, गुणसंपन्न, ज्येष्ठ पुत्र राम मातृ-पितृभक्त होता. वचनभंगाचे पाप-ठपका पित्यावर येऊ नये म्हणून राजीखुशी चौदा वर्षांचा वनवास भोगण्यास तयार असलेला राम, सावत्र आई कैकयीचेही मनात आकस न ठेवता नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतो. सावलीप्रमाणे रामाच्या पाठोपाठ असणारा लक्ष्मण वनवासातही सावली बनून राहतो. राजवैभव लाथाडून पतीसमवेत काट्याकुट्यांतून, दगडधोंड्यातून पायपीट करणारी, वल्कले पांघरणारी जनकात्मजा! भरत व राम यांच्यातील अभूतपूर्व भक्तिभाव; रामाचा निस्सीम सेवक व भक्त पवनपुत्र हनुमान; रामाच्या पादुका राजगादीवर ठेवून राजकाज चालवणारा भरत; मायावी रूप घेऊन फसवू पाहणारा मारिची; भिक्षुकवेशात येऊन सीतेचे अपहरण करणारा अहंकारी, बलिष्ठ लंकाधीश; पतिव्रता म्हणून प्रातःकाली स्मरण करावे अशी मंदोदरी- एकीकडे सीतेला धीर देते तर दुसरीकडे चुकलेल्या आपल्या पतीला- रावणाला योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करते. प्रजेवर पुत्रवत प्रेम करणारा, त्यांच्या सुखात आपले सुख शोधणारा राम सीतेचा त्याग करतो. तिला अरण्यात सोडून येण्याची लक्ष्मणास आज्ञा देतो. तेही एका यःकश्चित रजकाच्या- परिटाच्या बोलण्यावरून. वास्तविक अयोध्येत सीता आल्या-आल्या स्वतःहून अग्निदिव्य करून घेते. त्यातून तावून-सुलाखून, झळाळून निघालेली पतिव्रता सीता! कालांतराने राम सन्मानाने तिला परत अयोध्येस आणण्यासाठी जातो तेव्हा आपल्यामुळे अयोध्येचा राजा राम यावर पुन्हा काही किटाळ- ठपका येऊ नये म्हणून रामाबरोबर जाण्याऐवजी धरतीमातेला ती विनंती करते आणि धरणी दुभंगते, सीतेला आपल्या पोटात घेते.

पुढे पुढे शब्दकोशही नसतीलच, पण गुगल महाराज तरी ‘रामराज्य’चा अचूक अर्थ- माहिती सांगू शकतील की नाही ही शंकाच आहे.
कुठे प्रजेच्या सुखात सुख मानणारा राम आणि कुठे कष्टाने मिळविलेल्या सामान्य लोकांच्या पैशांवर डल्ला मारणारे! पुत्रपौत्रांसाठी बेगमी करणारे!
त्रेतायुग आले, गेले; द्वापरयुगही गेले. आता कलियुग. कालचे आज राहिले नाही. सगळेच कळीचे नारद. अनागोंदी, अंदाधुंदी, बेबंदशाही!
साधले सर म्हणतात, ‘रामायणकाळापासून चोरीचा, लुटीचा प्रकार चालत आला आहे. वाल्याचा वाल्मीकी झाला, तसे झालेले मात्र कुठे दिसत नाही.’ रामायणातील आदर्श कालबाह्य झालेले दिसतात. सर्वसामान्यांचे खाणे कोण ‘खाते’? कुठे कसे जाते, हे वेगळे सांगायची गरज नाही. आजची पिढी वाया गेलेली नाही. ती प्रगल्भ, व्यवहारी, चाणाक्ष आहे. पण त्यांच्यापुढे आदर्श कोणाचे? कसले? म्हणून तर कित्येकांना ‘इझी मनी’ तोही कशातही बिझी न राहता हवा आहे. शॉर्टकटने मिळाला तर सोने पे सुहागा! दुधात साखर! नव्वदीच्या दशकात सगळे बदलत गेले. जागतिकीकरणाने जग जवळ आले पण जवळची माणसे दुरावली. माहिती-तंत्रज्ञान आले, ज्ञानविज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. सामान्यांच्या हातातही बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. राहणीमान उंचावले. एका धड्यातील एक वाक्य मन विषण्ण करणारे! ‘घूस लेने के इल्जाम में पकडे गए हो, तो घूस देकर ही बरी हो जाओ!’
एकेकाळी इंदिरा गांधी नेहमी म्हणायच्या, ‘बॉटम टू द टॉप, भ्रष्टाचार ही भ्रष्टाचार है। कहाँ से शुरू करेंगे सुधार?’
आजही आपण रामनवमी- हनुमान जयंती सोहळे साग्रसंगीत भक्तिभावाने साजरे करतोच ना!