Home बातम्या एक दुर्घटना हृदय हेलावणारी…

एक दुर्घटना हृदय हेलावणारी…

0

राजेंद्र सावईकर,

वाठादेव डिचोली

बुधवार उजाडला तोच एका दुर्घटनेची बातमी घेऊन. उल्हास देसाई स्कूटर बस अपघातात गंभीर जखमी झाल्याची ही बातमी ऐकून सार्‍या कुटुंबावर आघात झाला. असा आघात जो ह्रदयाध्ये कायमचा घर करून राहणार. त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी उल्हास मुष्टीफंडमध्ये बारावीत शिकणार्‍या आपल्या धाकट्या मुलीला चारुताला पोहोचवण्यासाठी आपल्या दुचाकीवरून निघाला. दुचाकी रोजची, रस्ताही रोजचाच. कदंब बसस्थानकाकडून दोघेही निघाली. चर्च स्क्वेअरजवळ पोहोचताच तोच आल्तिनोवरून येणार्‍या पोलीस बसने त्यांना जोराची धडक दिली आणि होत्याचे नव्हते झाले. मुलगी चारुता बाजूला फेकली गेली व उल्हास डोक्याला जबरदस्त मार लागल्याने बेशुद्ध झाले. नाका तोंडातून रक्त वाहू लागले. १०८ रुग्णवाहिका बोलावून त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. ते गोमेकॉचेच कर्मचारी असल्याने त्यांच्यावर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांकरवी उपचार करण्यात आले, परंतु दैवाने साथ दिली नाही आणि गुरुवार दि. १८ रोजी उल्हास आम्हाला कायमचा सोडून गेला.

अत्यंत सुस्वभावी, मितभाषी पण हसर्‍या चेहर्‍याचा उल्हास २५ वर्षांपूर्वी गोमेकॉमध्ये ईसीजी टेक्निशियन म्हणून कामाला लागला. तो कॅज्युअल्टीमध्ये कामकरायचा. आलेल्या रुग्णाचा लगेच कार्डिओग्रामकाढण्याची तिथे पद्धत आहे. त्यामुळे बहुतेक रुग्णांशी त्याचा संबंध यायचा. बोलणे अगदी मृदू व सेवाभावी वृत्तीमुळे अनेक लोक मदतीसाठी त्याच्याकडे पाहायचे. अनेक लोकांची चौकशी करून तो व्यवस्थित मार्गदर्शन करायचा. आपले नातेवाईक, गावातील लोक किंवा कुठूनही जराशी ओळख सांगितली किंवा अनोळखी माणसाने जरी विनंती केली, तरी तो डॉक्टरांना सांगून अथवा आपल्या परीने मदतीला धावून जात असे. गोमेकॉमध्ये पाळ्यांत कामकरण्याची पद्धत आहे. पण कुठूनही फोन आला तर तो स्वतः कुठल्याही पाळीत मदतीला धावून येत असे. मी अनेकवेळा त्याला रुग्णांच्या मदतीसाठी फोन करायचो. पण रात्री अपरात्री कधीही गोमेकॉमध्ये मदतीसाठी धावून येत असे.

जवळच कालापूर येथे शांतादुर्गेच्या मंदिराजवळ श्री. फडके यांच्याकडे त्याची सासुरवाडी. जवळच भूखंड विकत घेऊन त्याने घर बांधले होते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाही त्याची मदत होत असे. घर जवळच असल्यामुळे नातेवाईकांना तर गोमेकॉमध्ये रुग्ण ठेवण्यास कोणतीही अडचण येत नसे. तोही गोमेकॉमध्ये चांगल्या सोयीसुविधा असल्याचे सांगून ओळखीच्या लोकांना गोमेकॉच्या सेवेचा लाभ घेण्याची विनंती करीत असे.

प्राजक्ता आणि चारुता ह्या त्याच्या दोन गुणी मुली. पत्नी सुवर्णा भविष्य निर्वाह निधी कार्यालयात कर्मचारी. सुस्वभावी उल्हासने आपल्या मुलींना लहानपणापासूनच आईची माया दिली. पप्पांशिवाय त्यांचे पानही हलत नसेत. उल्हास गेला त्या दिवशी त्याची पत्नी व मुली वडिलांच्या जाण्याने अगदी धाय मोकलून रडत होत्या. ह्रदय पिळवटून टाकणारे असे ते दृश्य होते. हळव्या चारुताचे रडणे तर थांबतच नव्हते. पाच बंधू, एक बहीण, जमलेले सर्व परिचित, अपरिचित, कुणालाच शोक आवरता येत नव्हता.

ज्येष्ठ बंधू शिवदास उल्हासला थट्टेने आमचा पणजीकर’ असे म्हणायचे. एखाद्या कार्यक्रमासाठी घरी येण्यास उशीर झाला तर आमचा पणजीकर’ अजून पोहोचलाच नाही म्हणून काळजी करायचे. आता मात्र आमचा पणजीकर’ कधीच येणार नाही म्हणून ते आक्रोश करीत होते. कोणालाच त्यांना सावरता येत नव्हते. घडलेला आघात एवढा मोठा होता की सर्वांना तो एक मानसिक धक्काच होता.

उल्हासचे राहणीमान अगदी टापटीप व शिस्तप्रिय. घरातील सर्व स्वच्छतेची कामे हा स्वतः करायचा. सर्व बंधू उच्चशिक्षित व आपण मात्र उच्च शिक्षण न घेताच नोकरी पत्करली अशी एक खंत त्याच्या मनात सतत सलत होती. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्याची त्याची अत्यंत तीव्र इच्छा होती. त्याची थोरली मुलगी प्राजक्ता ही शिरोड्याला रायेश्वरमध्ये अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करीत आहे, तर धाकटी चारुता बारावीला आहे. तिलाही उच्च शिक्षण देण्याचा त्याचा मानस होता. उल्हासच्या अंत्यविधीसाठी अनेक अपरिचित माणसेही आली होती. नातेवाईकांपैकी, कर्मचारयंपैकी अनेकजण घर शोधत सांत्वनासाठी येत होते. ही सर्व अपरिचित माणसे, उल्हासने ज्यांना गोमेकॉमध्ये मदत केली त्यांच्यापैकीच होती. उल्हासने आपल्याला केव्हा कशी मदत केली हे सांगून ती रडत होती. कित्येकांनी उल्हासने संकटकाळी कशी मदत केली ते सांगून आपला आधार गेला असे सांगून डोळ्यांतून आसवे गाळत होती. एक अनोळखी व्यक्ती तर तिथे येऊन त्या वास्तूलाच परत परत नमस्कार करीत होती. विचारले तर ती व्यक्ती सांगू लागली की उल्हास आपल्यासाठी देवच होता. त्याच्या मदतीमुळेच मी पुन्हा उभा आहे!

ह्रदय पिळवटून टाकणार्‍या अशा कितीतरी आठवणी, तिथे आलेली माणसे सांगत होती. एक एक आठवण मन रक्तबंबाळ करीत होती. त्याच्या पुण्यस्मृतीला आदरांजली वाहताना अजूनही दुःखाचा आवेग आवरता आवरत नाही. मन सांगतेय, उल्हास, तू गेलेला नाहीस! आमच्या सर्वांच्यामध्ये आहेस आठवणीच्या रूपाने.