Home Featured एका रंगसम्राटाचे स्मरण

एका रंगसम्राटाचे स्मरण

0

गोमंतकाचे थोर चित्रकार रंगसम्राट कै. रघुवीर मुळगावकर यांचा पन्नासावा स्मृतिदिन आणि त्यांच्या चरित्राचा प्रकाशन सोहळा आज संध्याकाळी त्यांच्या परमप्रिय मायभूमीमध्ये, गोव्यामध्ये कला अकादमीत पार पडतो आहे. खरोखरच हा एक ऐतिहासिक क्षण आहे. एक काळ होता, जो दीनानाथ दलाल आणि रघुवीर मुळगावकर ह्या दोन महान चित्रकारांनी गाजवला. महानगरी मुंबईला आपली कर्मभूमी बनवून, मासिके आणि दिवाळी अंकांतील चित्रमालिका, त्यांची मुखपृष्ठे, त्या काळी प्रचंड लोकप्रिय असलेली कॅलेंडरे, जाहिराती, चित्रपटांची भित्तिपत्रे आदी व्यावसायिक कामांमधूनही अभिजात भारतीय चित्रशैलीचा आणि आपल्या अलौकिक रंगसंगतीचा अमीट ठसा ह्या दोघाही चित्रकारांनी काळाच्या भाळावर उमटवला. दीनानाथ दलालांची जन्मशताब्दी काही वर्षांपूर्वी गोव्यात दिमाखात साजरी झाली. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही भरले, त्यांच्यावर उत्तम पुस्तके निघाली. परंतु मुळगावकरांचे मात्र गोमंतकाला आणि कला जगताला पूर्ण विस्मरण झाले होते. 1976 साली झालेल्या त्यांच्या मृत्यूनंतर आज तब्बल पन्नास वर्षांनी का होईना, ह्या महान चित्रकाराच्या जीवनकर्तृत्वाचे संस्मरण होते आहे ही निश्चितच ऐतिहासिक गोष्ट आहे. रघुवीर मुळगावकर हे नाव कदाचित आजच्या पिढीला माहीत नसेल, परंतु एके काळी हे नाव घरोघरी सर्वतोमुखी होते. अतिशय सुंदर, मनमोहक अशी चित्रे आणि त्याखालची ‘मुळगांवकर’ ही झोकदार सही याचे गारूड त्या काळात घरोघरी होते. हिंदू देवादिकांच्या चित्रांना मानवी चेहऱ्यातून मूर्त रूप देण्याचे काम पूर्वी राजा रविवर्मा ह्या मूळ केरळच्या महान चित्रकाराने केले. त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून हे काम पुढे नेले ते मुळगावकरांनी. राम, कृष्ण, हनुमान, शंकर पार्वती, गणपती, लक्ष्मी, सरस्वती अशा दैवतांची त्यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने आणि तितक्याच श्रद्धापूर्वक जी चित्रे त्या काळी रंगवली, तीच आज त्या देवदेवतांचे खरे स्वरूप मानून घरोघरी भक्तिभावाने पूजली जात आहेत, एवढा विश्वास जनमानसात मुळगावकरांनी आपल्या चित्रांतून निर्माण केला. गुरू दत्तात्रेयांचे त्यांनी काढलेले चित्रच आजही मराठी माणसाच्या घरांत नित्यपूजेत पाहायला मिळते. श्रीमंगेश आणि श्रीशांतादुर्गेची जी चित्रे दिसतात तीही एक तर गणपत लाड किंवा मुळगावकरांचीच किंवा त्यांच्या प्रतिकृती असतात. शिरगावची श्रीलईराई कलशरूपात आहे, परंतु हिरवे नऊवारी लुगडे नेसलेले तिचे जे सुंदर आईसारखे सात्विक रूप कलशामध्ये अधिष्ठित दाखवले जाते, ते चित्र आणि संकल्पना मुळगावकरांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर यांच्या मुळगावकरांनी संकल्पिलेल्या प्रतिमांच्याच नकला आजही प्रचलित आहेत. रघुवीर यांच वडील शंकरराव हेही उत्तम चित्रकार होते. त्यांचा पणजीत आझाद मैदानाजवळ मुळगावकर आर्ट स्टुडिओ होता. त्यांचे पुत्र प्रभाकर हेही उत्तम चित्रकार होते. प्रभाकर यांचे दुर्दैवाने अल्पवयात निधन झाले. त्यामुळे हे कुटुंब गोवा सोडून मुंबईला गेले. परंतु वयाच्या चोविसाव्या वर्षी मुंबईत दाखल झालेल्या रघुवीरने अल्पावधीत आपल्या कलेच्या बळावर आपले नाव चित्रकार म्हणून तेथे प्रस्थापित केले. तो काळ कॅलेंडर चित्रांचा होता. ह्या कॅलेंडरांवर मुळगावकरांची चित्रे छापली जाऊ लागली तेव्हा वर्ष उलटले तरी त्या चित्रांची मोहिनी ओसरेना, म्हणून लोकांनी ती चित्रे कापून फ्रेम करून आपल्या घरांत लावली. गोव्यातील जुन्या घरांमध्ये अजूनही ही मोठ्या आकारातील फ्रेम केलेली मुळगावकरांची चित्रे दिसतात. दुर्दैवाने नूतनीकरणात जुनी घरे पाडली गेली आणि काळानुसार फ्रेम कमकुवत झाल्याने वा वाळवी लागल्याने ही चित्रे माळ्यावर फेकली गेली. कित्येक नष्ट झाली. परंतु ही चित्रे पन्नास – पन्नास वर्षे सांभाळून ठेवणारे रसिकही आहेत. काळजाचा तुकडा जपावा तसा त्यांनी ही चित्रे जपली आहेत. मुळगावकरांनी केवळ देवादिकांचीच चित्रे काढली असे नव्हे. त्यांनी सुंदर रमणी रेखाटल्या, छान गुटगुटीत बालके काढली. त्या काळी पत्नी असावी तर मुळगावकरांच्या चित्रातल्यासारखी आणि बाळ असावे तर मुळगावकरांच्या चित्रातल्यासारखे असे म्हटले जाई. गरोदर स्त्रिया आपल्या शयनकक्षात मुळगावकरांनी ‘बिटको’ किंवा ‘पोरवाल’ कंपनीच्या कॅलेंडरसाठी काढलेले गोळ गुटगुटीत बाळ लावायच्या. जाई काजळच्या जाहिरातींतील आजही लक्ष वेधून घेणारे आई आणि बाळ काढले होते ते मुळगावकरांनीच. मुळगावकर व्यावसायिक चित्रकार होते, त्यामुळे कलाक्षेत्रातील नव्या प्रवाहांचे काही पुरस्कर्ते त्यांना मानत नाहीत. परंतु मुळगावकरांचा चाहतावर्ग गावोगावी, घरोघरी पसरला आहे. कलासमीक्षक काही म्हणोत, काळाच्या कसोटीवर ह्या रंगसम्राटाचे नाव केव्हाच अजरामर झाले आहे.