एकता, जातीय सलोख्यासाठी सहकार्य करावे

0
204
????????????????????????????????????

>> प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राज्यपाल सत्यपाल मलीक यांचे नागरिकांना आवाहन

राज्यातील एकता, शांतता, जातीय सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल कांपालच्या परेड मैदानावरील राज्यपातळीवर प्रजासत्ताक दिन सोहळ्यात बोलताना केले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, मुख्य सचिव परिमल राय व इतर मान्यवरांची उपस्थिती होती. राज्याचा सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानतळामुळे पर्यटन व उद्योग विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात विविध प्रकारच्या साधनसुविधा उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. नवीन झुवारी पूल हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनणार आहे. राज्य शाश्‍वत विकासामध्ये आघाडीवर आहे. नीती आयोगाच्या देशपातळीवरील क्रमवारीत गोव्याने सातवा क्रमांक पटकाविला आहे, असेही राज्यपाल मलिक यांनी सांगितले.

राज्यातील सुमारे १० हजार हेक्टर जमीन सेंद्रीय शेतीखाली आणली जाणार आहे. शेतीच्या विकासाच्या माध्यमातून शेतकर्‍याचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आंबा, काजू या सारखी नगदी पिकांची लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. राज्याच्या महसुलात वाढ होत आहे. अबकारी खात्याच्या महसुलात ७.६ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये अबकारी ३५१.५५ कोटीचा महसूल गोळा केला आहे, असेही राज्यपाल मलिक यांनी सांगितले.

राज्यात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. स्ट्रेमी कार्यक्रमाअर्तंगत हदयरूग्णांना तातडीची सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. अंगणवाडीच्या माध्यमातून अत्याधुनिक साधन सुविधांचा वापर करून दर्जात्मक शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे, असेही राज्यपाल मलिक यांनी सांगितले.
राज्यपाल मलिक यांच्या हस्ते यावेळी वर्ष २०१७-१८ या वर्षातील उत्कृष्ट पोलीस प्रशिक्षणासाठीचे केंद्रीय गृहमंत्रालय पदक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत गावंस यांना प्रदान करण्यात आले. तसेच वर्ष २०१७-१८ मधील उल्लेखनीय सेवेसाठीचे राष्ट्रपती अग्निशामक पदक अनुक्रमे अग्निशामक दलाचे साहाय्यक विभागीय अधिकारी अजित कामत, स्टेशन फायर ऑफिसर मार्यन बॉस्को फेर्रांव, उपअधिकारी रोहिदास परब आणि ज्येष्ठ अग्निशामक जवान प्रकाश कन्नाईक यांना प्रदान करण्यात आले आहे.
तत्पूर्वी, राज्यपाल मलिक यांनी भारतीय नौदल, सैन्य दल, भारतीय तटरक्षक दल, कर्नाटक पोलीस (महिला पथक), गोवा पोलीस पथक, गृहरक्षक , एनसीसी कॅडेट्‌स यांच्याकडून मानवंदना स्वीकारली.

गुन्ह्यांचे प्रमाण घटले
राज्यातील विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण १०.४ टक्क्यांनी कमी झाले आहे. तसेच, गुन्ह्याच्या तपासकामातील टक्केवारीत २ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याकडे लक्ष दिले जात आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्यक्रम दिला जात आहे. राज्याने औषध उद्योगाचा पाया स्थापित केला असल्याचे नमूद करून जैव तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान अशा ज्ञानाधिष्ठित उद्योगांसाठी उदयोन्मुख स्थळ म्हणून पुढे येत आहे, असेही राज्यपाल मलिक यांनी सांगितले.

राज्यपालांच्या भाषणात
म्हादईवर भाष्य नाही
राज्यपाल मलिक यांनी राज्यात गाजणार्‍या म्हादईच्या विषयावर सर्व प्रकारची मदत करण्याची घोषणा केलेली आहे. राज्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन म्हादईच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले आहे. तथापि, प्रजासत्ताक दिनाच्या राज्यपालांच्या भाषण म्हादईचा उल्लेख नसल्याने चर्चेचा विषय बनला आहे. तसेच राज्यातील खाणी सुरू होण्यावरही राज्यपालांनी कोणतेही वक्तव्य केले नाही.