कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे काल आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. येणाऱ्या काळात कर्करोगाबरोबरच अन्य अंभीर व घातक अशा रोगांचे विनाविलंब व लवकर निदान करता यावे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णांचे निदान होण्यास विलंब लागत असे व परिणामी रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत असे. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य खात्याने लवकर निदान होणाऱ्या आधुनिक अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचा तपासणीसाठी वापर करण्यात सुरवात केली असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी काल दिली. लवकर निदान होत असल्याने आता रुग्णांवर लवकर उपचार सुरू करणे शक्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घडीला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच राज्यातील 17 आरोग्य केंद्रांमध्येही सुविधा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आतापर्यंत राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांची कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फुफ्फुसांच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. त्यात 1600 जणांना फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे आढळून आली, तर त्यापैकी 20 रुग्णांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान झाले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान लवकर तर होतेच, शिवाय तपासणीत मानवी त्रुटींचा धोका राहत नाही. तसेच तपासणीत अचूकपणा येतो, असे राणे यांनी स्पष्ट केले.
2027 पर्यंत कर्करोग इस्पितळ सुरू
कर्करोग इस्पितळासाठीच्या इमारतीचे बांधकाम युद्धपातळीवर चालू असून सध्या या इमारतीच्या सात मजल्यांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. 2027 सालापर्यंत या कर्करोग इस्पितळासाठीची साधनसुविधा उभारण्याचे काम पूर्ण करून हे इस्पितळ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.