एअर इंडिया विमानातून १९ लाखांचे सोने जप्त

0
164

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कस्टम अधिकार्‍यांनी काल केलेल्या कारवाईत एअर इंडिया विमानातून (एआय-९९४) १९ लाख ९२ हजार रुपयांच्या ७२० ग्राम वजनाच्या सोन्याची चार बिस्किटे जप्त केली.

कस्टम अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी दुबईहून आलेल्या एअर इंडिया (एआय-९९४) विमानात जाऊन पाहणी केली असता त्यांना एका रिकामी असलेल्या आसनावर दोन लहान काळ्या रंगाची पाकिटे नजरेस पडली. ती पाकिटे हस्तगत करून त्याची पडताळणी केली असता त्यात त्यांना चार सोन्याच्या बिस्किटाचे तुकडे सापडले. कस्टम अधिकार्‍यांनी याविषयी प्रवाशांशी विचारपूस केली असता कोणीही या पाकिटावर आपला दावा केला नाही. सदर सोन्याची बिस्किटे ७२० ग्राम वजनाच्या असून त्याची किंमत १९ लाख ९२ हजार रुपये एवढी होत आहे. सदर कारवाई कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषकुमार चौधरी, जी. बी. सांतीमोनी यांनी केली.