ऍप टॅक्सीसेवेचा शुभारंभ

0
178

मोबाइल ऍपवरील गोव्यातील पहिल्या टॅक्सी सेवेचा काल गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते वापर करून तर पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांच्या हस्ते गाड्यांना झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

पर्वरी येथे मंत्रालयात या सेवेचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, या टॅक्सी सेवेमुळे पर्यटक व स्थानिक लोकांची चांगली सोय होणार आहे. कुणालाही जेथे टॅक्सी हवी असेल तेथे ती मागवता येईल. टॅक्सी शोधण्यासाठी टॅक्सी स्टॅण्डवर अथवा बाजार परिसरात जावे लागणार नाही. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबर धावपळही करावी लागणार नाही. या ऍपधारीत टॅक्सी सेवेत सहभागी होणार्‍या टॅक्सीवाल्यांचा धंदा कित्येक पटीने वाढू शकेल, असेही पर्रीकर यावेळी म्हणाले. पर्यटक व स्थानिक लोकांना परवडणार्‍या दरात टॅक्सी उपलब्ध होऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर म्हणाले की, या ऍप सेवेमुळे टॅक्सी सेवेत क्रांतीकारी बदल घडून येतील. टॅक्सीचालक, पर्यटक आणि स्थानिकांना या सेवेचा फायदा होईल. अवघ्या २-३ दिवसांत या ऍपधारीत टॅक्सीसेवेसाठी सुमारे ३ हजार टॅक्सीवाल्यांनी नोंदणी केल्याचे ते म्हणाले. गोव्यात येणार्‍या पर्यटकांसाठी चांगली टॅक्सीसेवा उपलब्ध व्हावी यासाठी पर्यटन खात्याने ‘गोवा माईल्स’ या नावाने ही सेवा सुरू केली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. ही सेवा सुरू करण्यासाठी ‘पिटासिस प्रा. लिमिटेड’ या कंपनीची मदत घेण्यात आली आहे.

घर, ऑफिस, रेल्वे स्थानक, बसस्थानक, विमानतळ अशी पाहिजे तेथे टॅक्सी बोलावून घेता येईल. रोख पैसे भरता येईल, अथवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, भीम, यूपीआय अशा विविध कॅशलेस पर्यायांचाही पैसे फेडण्यासाठी वापर करता येईल, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांनी यावेळी दिली. यावेळी पर्यटन संचालक मिनिनो डिसोझा, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई आदी मंडळीही उपस्थित होती.