मालकाचे 5 लाख रुपयांचे नुकसान
तिस्क -उसगाव येथे मंजू नामक व्यक्तीच्या जेवणासाठी पत्रावळी तयार करणाऱ्या दुकानाला काल रविवारी दुपारी आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यावर फोंडा अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. अंदाजे दोन तास अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक युवकांनी प्रयत्न करून आग विझविली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय असून या आगीत अंदाजे 5 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
रविवारी दुपारी बंद असलेल्या दुकानातून धूर येत असल्याने स्थानिक लोकांनी फोंडा अग्निशामक दलाच्या कार्यालयात माहिती दिली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेऊन आग विझविण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्थानिक युवकांनीही जवानांना मदत केली. दुकानात मोठ्या प्रमाणात जेवणाच्या पत्रावळी करण्यासाठी लागणारे साहित्य ठेवले होते. कागदी साहित्य असल्याने आगीवर त्वरित नियंत्रण ठेवणे कठीण झाले. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळाले. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांनी पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या फ्लॅटमधील गॅस सिलिंडर व लोकांना बाहेर काढले. आगीत मोठ्या प्रमाणात खरेदी केलेले कागद जळून खाक झाले आहे.
दुकानाचा मालक राज्यबाहेर असल्याने नुकसान समजू शकले नाही. पण स्थानिक लोकांनी 5 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

