उसगावातील अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

0
256

बाराजण – उसगाव येथील टाकवाडा रस्त्यावर काल बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दुचाकीला भीषण अपघात झाल्याने दोघेजण जागीच ठार झाले. या अपघातात चंद्रकांत रवी दाली (२०) साळगावकर कॉलनी पाळी व आलिशा फर्नांडिस (२१) तारमाथा – पाळी ही दोघेही जागीच ठार झाली. प्रत्यक्षदर्शी कुणी नसल्याने नेमका अपघात घडला कसा घडला यासंबंधी कुणालाच माहिती नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी पाळीहून चंद्रकात हा जीए ०४ एन ७७१५ या दुचाकीने आलिशा हिला घेऊन फोंड्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी टाकवाडा येथे रस्त्यावर पार्क करून ठेवलेल्या जीए ०१ यू ३५७६ या ट्रकला दुचाकीची धडक बसली. त्यात दुचाकी फेकली गेली. या अपघाताचे स्वरुप एवढे भीषण होते की, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. चंद्रकांत व आलिशा रस्त्यावर फेकल्याने दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाली. अपघातानंतर स्कूटरने पेट घेतला, मात्र तेथे आलेल्या एका कारचालकाने आग विझवून १०८ रुग्णवाहिकेला अपघाताची माहिती दिली.

अपघातात सापडलेल्या ट्रकचा चालक त्या ठिकाणी नव्हता, तसेच अन्य कुणी अपघात होताना पाहिला नसल्याने काहीजणांनी एखाद्या वाहनाने ठोकर देऊन पळ काढल्याचा अंदाज व्यक्त केला. दुचाकीच्या दर्शनी तसेच मागच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. फोंडा पोलिसांनी याप्रकरणी टाकवाडा येथील चर्च परिसरातील सीसीटीव्ही फूटेजचा आधार घेत अपघाताच्या वेळेला तेथून गेलेल्या सर्व वाहनचालकांना बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली. त्यावेळी चंद्रकांत दाली याचा तोल गेल्यानेच हा अपघात झाल्याचे या लोकांनी सांगितल्याचे फोंडा पोलिसांनी स्पष्ट केले.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन मदतकार्य करण्याचा प्रयत्न केला. पोलिसही घटनास्थळी त्वरित पोचले, मात्र चंद्रकांत व आलिशा ही दोघेही गतप्राण झाली होती. दरम्यान या अपघातप्रकरणी ट्रकचालक नाऊ नवलो झोरे (४८) सुर्ल – साखळी याला फोंडा पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवून अपघात झाल्याबद्दल अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवचिकित्सेनंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. फोंड्याचे पोलीस उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर यांनी अपघाताचा पंचनामा केला असून निरीक्षक मोहन गावडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.