Home बातम्या उद्याच्या भविष्याचे ऋषिवनातील विचारमंथन

उद्याच्या भविष्याचे ऋषिवनातील विचारमंथन

0

– महेश तुकाराम गावकर

आमचा गोवा केवढा? उत्तर साधे आणि सरळ आहे- भारताच्या नकाशावरील फक्त एक टिंब! एकूण भौगोलिक क्षेत्रफळ केवळ ३७०२ कि.मी. अरबी समुद्र किनारपट्टीवर वसलेला गोवा म्हणजे भारताचा मुकुटमणीच. सोनेरी वाळूचे मनोहारी किनारे, लांबच लांब आणि गगनाला भिडू पाहणारी माडांची बने, एकमेकांना डोकावून पाहणार्‍या सह्याद्रीच्या पर्वतरांगा… जणू स्वप्नातील स्वर्ग. नव्हे, पृथ्वीतलावरील स्वर्गच! अहो, काय विचारता… म्हणूनच तर त्याची सातासमुद्रापार ख्याती आहे. या भूमीचे वेड असणारा जगात नाही असा सापडणे कठीण. असा हा आमचा सुंदर गोवा न्या. शहा आयोगाने ३५,००० कोटींचा खाण घोटाळा उघड केल्यापासून चर्चेत आहे. या कथित घोटाळ्याचे मोहोळ उठले असतानाच सांगे तालुक्यातील ऋषिवनात पर्यावरण विषयावर दोन दिवसांची परिषद झाली. पर्यावरण हा विषय वर्तमान स्थितीत गोव्यात अग्रस्थानी आहे. उद्याचे भविष्य दडलेल्या या विषयाशी संलग्नित भरपूर माहिती मिळणार असल्याने संपादकांच्या शिफारशीनुसार सहभागाची संधी मिळाली.

ऋषिवन, अर्थात रिवण गाव. शांत असा हा भाग. निसर्गाने भरभरून दिलेला भूप्रदेश. या गावाची विशेषतः म्हणजे चहूबाजूंनी असलेली गोलाकार लोकवस्ती आणि गुण्यागोविंदाने नांदणारे ग्रामस्थ. शेतीभाती येथील लोकांचा पूर्वापार व्यवसाय असल्याचे ज्येष्ठांकडून समजले. पाहूनही तसेच वाटले होते अन् ते तंतोतंत खरे ठरले. ‘ग्रीनिंग द पेन’ या पर्यावरण कार्यशाळेसाठी हा सुंदर निसर्गरम्य गाव निवडण्यात आला होता. त्याला कारणेही बहुधा विशेष असावीत. पूर्वी ऋषींचे पावन वास्तव्य लाभलेल्या या गावावर सध्या खाण संकटामुळे अस्तित्वाचे ढग जमा होऊ लागले आहेत. दीड वर्षापूर्वी खाणीसाठी झालेल्या जनसुनावणीवेळी हा गाव प्रकाशझोतात आला. सदरवेळी खाणवाल्यांनी सरकारी अधिकार्‍यांसमक्ष थयथयाट केला होता. त्याच साली तेथे अभ्यासार्थ गेलेल्या एनडीटीव्हीच्या पत्रकाराला लोकचक्रव्यूहाचा घेरा पडला होता. आणि अशा रिवण गावी विमलेश्‍वर मंदिराच्या सभागृहात परिषद भरत होती. गोव्यासह शेजारच्या महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांतील पत्रकार सहभागी झाले होते. काय बरे चर्चिले गेले या परिषदेत? कोणत्या विषयांवर विचारमंथन झाले?

या परिषदेचा प्रमुख हेतू होता- पर्यावरणासंदर्भात पत्रकारांच्या तनामनात आस्था निर्माण करणे. त्यांनी सजग होऊन हे विषय गांभीर्याने समजून घ्यावेत असा उद्देश होता. आयोजक विज्ञान व पर्यावरण केंद्र (सीएसई, नवी दिल्ली) व गोवा मराठी पत्रकार संघाने मंथनासाठी विषयही तसेच निवडले होते. नियोजनानुसार या परिषदेत खाण व्यवसायाबरोबर समुद्रकिनार्‍यांवरील संकट, पश्‍चिम घाटाच्या अस्तित्वाला असलेली बाधा या महत्त्वाच्या विषयांवर ऊहापोह झाला. नैसर्गिकदृष्ट्या भविष्यकाळात किती धोका आहे, त्याचे भयावह चित्र तज्ज्ञांनी सोदाहरण उपस्थित पत्रकारांसमोर ठेवले आणि काळजात धस्स झाले. काय भयावह स्थिती असेल भविष्यात आमच्या सुंदर (उरला तर!) गोव्याची? मंथनावेळी तज्ज्ञ देत असलेली आकडेवारी पाहून अंगावर काटा उभा राहत होता. का म्हणून करतो आपण हे सारे? कशासाठी म्हणून… केवळ पैशांसाठीच ना? विचार करा, जगण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? उत्तर सोपे आहे- अन्न, वस्त्र आणि निवारा. पण हे अन्न, शुद्ध हवा आणि पाणीच शिल्लक राहिले नाही तर काय खाणार? पैसे खाणार-पिणार का?? वेळ टळून गेलेली असणार आणि या प्रश्‍नाचे उत्तर कोणाकडेच नसणार. मग आमची पुढची पिढी जगणार तरी कशी? ती आम्हाला माफ करणार? नक्कीच नाही! मग का म्हणून आम्ही करावी त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी? हक्क आहे का तसा आम्हाला? अनंत प्रश्‍न आणि उत्तरे न सापडणारी! परिषदेत याच प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न झाला. तज्ज्ञांनी बोधामृत पाजले. उपस्थितांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करून निसर्ग, उद्याचे भविष्य वाचविण्यासाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे काळजातून आवाहन केले.

पर्यावरणतज्ज्ञ क्लॉड आल्वारिस, पर्यावरणासाठी वाहिलेल्या ‘डाउन टू अर्थ’ या मासिकाचे ज्येष्ठ संपादक रिचर्ड महापात्रा, सीएसईचे सुपोर्णो बॅनर्जी, ‘डाउन टू अर्थ’च्या नागपूर प्रतिनिधी अर्पणा पल्लवी, एनआयओ गोवाचे बबन इंगोले, रमेश गावस, एचसीएन चॅनलचे संदेश प्रभुदेसाई, प्रा. राजेंद्र केरकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कामत, डीजीटल गोवाचे निरज नाईक यांनी वेगवेगळ्या विषयांवर पोषक माहिती दिली. क्लॉड आल्वारिस यांनी पुरविलेली माहिती बरेच काही सांगून गेली. अत्यावश्यक परवाने नसताना कित्येक खाणी चालू होत्या, अशी माहिती त्यांनी दिली. अंदाधुंद खाण व्यवसायामुळे पर्यावरण रसातळाला गेल्याने भावी पिढीचे काय? असा नेमका हृदयाला हात घालणारा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. गोव्याची जीवनदायिनी असलेली मांडवी नदी पोटात २००० टनांपेक्षा जास्त खाणमाती उदरात घेऊन वाहत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली. खाणी सरकारने हाती घेऊन महामंडळातर्फे मर्यादेत चालवण्याची सूचना जाताजाता करण्यास ते विसरले नाहीत. पाणीस्रोतांची निर्मिती करणे शक्य नाही. म्हणून टप्प्याटप्प्याने खाण व्यवसायावर पर्याय शोधणे अत्यावश्यक असल्याचा कानमंत्र त्यांनी दिला. सरतेशेवटी गोवा युवा पिढीच्या हाती असल्याचे त्यांनी गहिवरून सांगितले.

रमेश गावस यांनी गोव्यातील खाण साम्राज्याचा पटच सादर केला. गोव्यात ८६४ खाणींचे लीझेस असल्याची माहिती त्यांनी दिली. ८० खाणी २२ नद्यांच्या १ कि.मी. अंतरावर सुरू होत्या. त्यात मांडवी नदीचाही समावेश आहे. ओपा- खांडेपार जलप्रक्रिया प्रकल्प धोक्यात आला आहे. गोव्यातील नद्या रक्तरंजित झाल्या आहेत. कारण सर्वांना माहीत आहे. खाण व्यवसायातून किती महसूल मिळतो? केवळ ६५ कोटी. उलटपक्षी पर्यटन व्यवसायातून १५०० कोटींचा महसूल वर्षाकाठी मिळतो. मात्र खाण हाच आमच्या राज्याच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा असल्याचा टाहो राज्यकर्ते फोडतात. याकामी निसर्गाची किती अपरिमित हानी होते, त्याचे सोयरसुतक निसर्गलुटारूंना नाही. पर्यावरण टिकले तर आम्ही टिकणार आहोत. म्हणून वर्तमान स्थितीत गोव्यात पाणी की खाणी हे ठरविण्याची वेळ आल्याचा प्रश्‍न रमेश गावस यांनी उपस्थित करताच सर्वांच्याच कपाळाला आठ्या पडल्या. खरेच, शुद्ध पाणीच नाही मिळाले तर पैसा काय आपण पिणार आहोत? गावससरांनी खरे तर ‘पर्यटन वाचवा, निसर्ग वाचवा’ असाच संदेश दिला. त्यांचा संदेश सत्यात उतरवण्याचा प्रयत्न झाला तर आमची भविष्यातील पिढी दूषणे का म्हणून देणार?

एनआयओचे डॉ. बबन इंगोले यांनी समुद्राचे पाणी विष बनत चालले असल्याचे निरीक्षण नोंदवले. उदाहरणासह विश्‍लेषण करताना त्यांनी तिसर्‍या, खुबे, शिनाणे यांचे उत्पादन कमालीचे घटल्याची माहिती आकडेवारीसह दिली. खाण कचर्‍यामुळे कवच असलेले सागरी मासे मरून जातील. ऑक्सिजन फिल्टर करणार्‍या त्यांच्या चाळण्या निकामी होतात. प्लास्टिक कचरा, घरगुती कचरा, सांडपाणी इ.मुळे मासळीच्या पोटात कितीतरी रसायने जातात. तेच आम्ही खातो. किती भयावह…! वैद्यकीयदृष्ट्या मासे आरोग्यासाठी गुणकारी हे सिद्ध झालंय. पण सध्या आम्ही जे खातो ते किती गुणकारी आहे हे प्रत्येकाने ठरवावे. डॉ. इंगोले यांची माहिती समुद्र वाचण्यासाठी उपयुक्त ठरणारी अशी आहे. निसर्ग आणि मानव यांच्यातील मैत्री फार जुनी आहे. अगदी अनादिकालापासूनच निसर्ग हा मानवाचा सोबती आहे. या सोबत्याचे आपल्यावर केवढे उपकार आहेत! तो भूक भागवतो, तहान शमवतो, मंद-मधुर झुळकांनी श्रमपरिहार घडवितो, सुगंधित फुलांनी जीवन सुगंधित करतो. थकल्याभागलेल्यांना सावली देतो. पण आम्ही…? सुखी जीवनाच्या हव्यासापोटी त्याला ओरबाडून नाश करायला निघालो आहोत. जगण्याच्या कल्पना बदलल्या असल्याने पैशांच्या मागे धाव धाव धावत सुटलो आहोत. परिणामी, पदोपदी भ्रष्टाचार माजला आहे. भ्रष्टाचाराच्या अधीन होऊन आमची सदसद्विवेकबुद्धी हरवत चालली आहे. बुद्धी भ्रष्ट झाली आहे अन् आम्ही सोन्याची अंडी देणार्‍या कोंबडीप्रमाणे सुंदर गोव्याचा कपाळमोक्ष करण्याच्या कामाला लागलो आहोत. याला कोठेतरी विराम निश्‍चितच हवा आहे. तो कोण देणार? जनतेनेच ते ठरवायचे आहे. ओरबाडून ओरबाडून किती दिवस खाणार? पर्यावरणसंतुलित समाजाभिमुख उद्योग चालवून उद्याचा पर्याय शोधण्यास कंबर कसणे आजची खरी गरज आहे. ‘माणूस’ या मराठी चित्रपटातील एक गाणे आठवते. प्रसंग माहीत नाही. पण ते गाणं असं आहे- ‘आता कशाला उद्याची बात…’ या गाण्याच्या ओळी गोव्याच्या सद्यःस्थितीला लागू पडतात. का? तर पर्यावरणाची होणारी नासाडी पाहून वाटतं- खरंच उद्याचा विचार करण्याची वेळ आलीय!