उत्पलना नकार

0
36

‘केवळ पर्रीकरांचा पुत्र आहे म्हणून उत्पलला उमेदवारी दिली जाऊ शकत नाही’ अशा शेलक्या शब्दांत भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांचा पणजीच्या उमेदवारीवरील दावा भर पत्रकार परिषदेत निकाली काढला. आपण केवळ पर्रीकरांचा मुलगा म्हणून उमेदवारी मागत नव्हतो अशी प्रतिक्रिया उत्पल यांनी त्यावर दिली आहे. ‘फडणवीस हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मी प्रत्युत्तर देणे योग्य नव्हे’ अशी शालीनताही त्यांनी यावेळी दाखवली हे विशेष आहे. पर्रीकरांचे पुत्र म्हणून उत्पल यांच्याविषयी गोव्याला निश्‍चितच ममत्व आहे. आपुलकी आहे. मात्र, आजच्या गलीच्छ राजकारणामध्ये त्यांच्यासारख्याचा निभाव लागणे शक्य आहे का ही विचार करण्याजोगी बाब आहे. मुळात त्यांचा पक्ष देखील आज पूर्वीचा राहिलेला नाही. केवळ सत्ता हेच ज्या पक्षाचे साध्य बनले आहे, त्यांनी पर्रीकरांचा वारसा एका फटक्यात असा निकाली काढला तर त्यात आश्चर्य वाटू नये. सरकारच्या स्थैर्यासाठी म्हणून अनेक कलंकित व्यक्तींना पक्षात घेऊन पावन करण्यात आले. गरज संपताच दूर फेकण्यात आले. आतादेखील निवडणुकीमध्ये केवळ जिंकून येण्याची क्षमता या एकाच निकषावर अनेकांचे इनकमिंग सुरू झाले आहे. दुसरीकडे पर्रीकरांचा भाजप उरलेला नाही असे सांगत काही निष्ठावंत बाहेर पडत आहेत. सत्तेच्या या साठमारीमध्ये उत्पल पर्रीकरांचा पत्ता काटला गेला यात आश्चर्य नाही.
उत्पल पर्रीकर यांनी राजकारणात येण्याची इच्छा फार पूर्वीच व्यक्त केलेली होती व तसा प्रयत्नही सुरू केला होता. शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला दोन पानी खरमरीत पत्र लिहून आपल्या दिवंगत पित्याच्या नावाने राजकारण करू नका असे बजावण्यासही त्यांनी कमी केले नव्हते. पक्षकार्यातही त्यांनी आजवर सक्रिय सहभाग घेतला. परंंतु ‘‘राजकारण हे फार क्रूर क्षेत्र आहे. येथे समोरून नव्हे, पाठीत खंजीर खुपसले जातात.’’ असा इशारा आम्ही त्यांना तेव्हाच दिला होता. ‘‘आपल्या पित्याची सहानुभूती त्यांना नजीकच्या भविष्यात कदाचित हात देईल, परंतु राजकारणाच्या या क्षेत्रात टिकायचे असेल, वाढायचे असेल तर तेथे स्वतःची कर्तबगारीच लागेल. सहानुभूती काही काळापुरतीच असेल. ती काही कायम उरणार नाही. पुढचा प्रवास स्वतःच्या हिंमतीवरच करावा लागेल. स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल. त्यासाठी राजकारणात शिकायचा पहिला धडा म्हणजे कमी बोलणे आणि जास्त काम करणे.’’ असे आम्ही तेव्हा लिहिले होते. उत्पल यांनी शांतपणे मतदारसंघात आपले काम जरूर सुरू ठेवले होते, परंतु बाबुश मोन्सेर्रातसारख्या बाहुबली उमेदवाराला आव्हान निर्माण करण्याइतपत आपली राजकीय ताकद त्यांना निर्माण करता आली नाही. उत्पल यांनी राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी पर्रीकर समर्थक निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा एक मोठा गट पणजीमध्ये सतत कार्यरत होता. बाबुश मोन्सेर्रात यांचे पक्षात येणे त्यांना कधीच रुचले नाही. ज्या मोन्सेर्रातविरुद्ध भाजपचेच नेते ते प्रचाराला येतात तेव्हा आयाबहिणी घरात लपतात अशी टीका करायचे, त्यांनीच त्यांच्यासाठी केवळ सरकार बळकट करण्यासाठी लाल पायघड्या अंथरल्या. त्याखाली पक्षनिष्ठा, नैतिकता चिरडली गेली तरी त्याची फिकीर केली नाही. उत्पल पक्षनेत्यांच्या याच शरणागत वृत्तीचे बळी ठरले आहेत. निवडून येणार नाहीत त्यांनी पक्ष सोडला असे फडणवीस म्हणत आहेत, परंतु त्याचबरोबर निष्ठावंतांना डावलून ‘निवडून येऊ शकतात’ त्या उपर्‍यांना पक्षात घेण्याची सध्या मालिकाच लागली आहे त्याचे काय?
भाजप एखाद्याला नेत्याचा मुलगा म्हणून उमेदवारी देत नसेल तर फ्रान्सिस डिसोझांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीत जोशुआला कसे तिकीट मिळाले होते? असे त्याचे काय पक्षकार्य होते? आता पक्षाचे काही नेते आपल्या बायकांनाही रिंगणात उतरवू पाहात आहेत ते सहन केले जाणार आहे का? असे अनेक प्रश्न निश्‍चित उपस्थित होतात, ज्याची उत्तरे फडणविसांना द्यावी लागतील. मनोहर पर्रीकरांनी राजकारणात आपल्या कुटुंबीयांना कधीच उतरवले नाही वा त्यांना त्याचा फायदा मिळवून दिला नाही. त्यांच्या लोकप्रियतेचे तेही एक महत्त्वाचे कारण होते. त्यांचा मुलगाही केवळ पित्याच्या नावावर उमेदवारी मागण्याएवढा सत्तापिपासू नाही. मात्र, पर्रीकरांनंतर त्यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना ज्याप्रकारे नेत्यांनी दूर सारले त्याचा सूड उगवण्यासाठी उत्पलला पाठबळ दिले जाताना दिसते. उत्पलना उमेदवारी नाकारल्याने जनतेमध्ये पक्षाविषयी एक नकारात्मक संदेश मात्र नक्कीच गेला आहे. उत्पल हे एका अर्थी नैतिकतेवर विश्वास ठेवणार्‍या जुन्या भाजपचे प्रतिनिधी आहेत. त्यांना नकार दिल्याने पक्षाचे राजकीय नुकसान होणार नाही, पण प्रतिमा खराब जरूर होईल.