उत्तम साहित्यिक राष्ट्र घडवू शकतो ः गडकरी

0
29

>> अखिल मराठी साहित्य संमेलनाची सांगता

साहित्याच्या व्यासपीठावरून राजकारण होता कामा नये. राजकारणात साहित्यिकाला खूप मोठे महत्त्व आहे. राष्ट्रनिर्मिती करण्याचे आणि राष्ट्र घडवण्याचे काम उत्तम साहित्यिक करू शकतो. राजकारणात साहित्य आणि संस्कृती समजणारा राजकारणी असेल तर तो उत्तम काम करू शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल रविवारी केले.

उदगीर येथे सुरू असलेल्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची काल रविवारी सांगता झाली. यावेळी समारोप सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख, स्वागताध्यक्ष संजय बनसोडे, संमेलनाध्यक्ष भारत सासणे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते गोमंतकयी लेखक दामोदर मावजो, कौतिकराव ठाले-पाटील उपस्थित होते. उदगीर येथे २२ ते २४ एप्रिल दरम्यान हे साहित्य संमेलन पार पडले.

गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा द्या
गोव्यात मराठी भाषक बहुसंख्य असूनही त्या राज्यात मराठी ही राजभाषा नाही. मधल्या काळात गोवा सरकारने कोकणीला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे. हा मराठीवर अन्याय आहे. म्हणून मराठीवरील अन्याय दूर करण्यासाठी कोकणीप्रमाणेच गोवा सरकारने मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरूज्जीवन करा
गोव्याची राजधानी पणजी येथे अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र परिचय केंद्राचे पुनरुज्जीवन करावे अशी मागणी यावेळी संमेलनात करण्यात आली. त्याचप्रमाणे परिचय केंद्र नसलेल्या सर्व राज्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी लवकरात लवकर महाराष्ट्र परिचय केंद्रे स्थापन करावीत आणि तेथे मराठी व्यक्तींची अधिकारी व कर्मचारी म्हणून नेमणूक करण्याची मागणी संमेलनात करण्यात आली.