उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा भराव कोसळून कामगार ठार

0
226

>> बायणा – वास्को येथील दुर्घटना

बायणा समुद्र किनार्‍याजवळ सुरू असलेल्या चौपदरी महामार्गाच्या उड्डाण पुलाच्या खांबासाठी खोदलेल्या खड्ड्यात मातीचा भराव कोसळल्याने मातीखाली सापडून सियालाल कापसी (वय ३५, नागपूर) या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना काल संध्याकाळी ४ वाजता घडली.
प्राप्त माहितीनुसार बायणा किनार्‍यानजीक वेर्णा-मुरगाव बंदर चौपदरी महामार्गाचे काम जोरात चालू असून या चौपदरी महामार्गासाठी बांधण्यात येणार्‍या उड्डाण पुलासाठी जलवाहिनीचा अडथळा होत होता. त्यासाठी वाहिनी तेथून काढून टाकण्याचे काम मुंबई येथील मेसर्स सेठ अँड सुरा इंजिनिअयर्स प्रा. लि. कंपनीला देण्यात आले आहे. काल सोमवारी दुपारी ४ वा. या कंपनीचा सियालाल कापसी (३५ वर्षे, मूळ गोंदिया, नागपूर) हा कामगार गॅस कटरच्या सहाय्याने जलवाहिनी कापण्याचे काम करीत होता. त्यावेळी सुमारे दोन मीटर खोल असलेल्या खांबाच्या खड्ड्यातील मातीचा काही भाग अचानक कोसळला. यावेळी मातीच्या ढिगार्‍याखाली हा कामगार सापडला. त्यावेळी तिथे हजर असलेल्या एका कामगाराने आरडाओरड करून इतरांना बोलावून घेऊन मातीखाली सापडलेल्या कामगाराला बाहेर काढले. त्याला जवळच असलेल्या संजीवनी इस्पितळात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याबाबत वास्को पोलिसांना माहिती देताच त्यांनी इस्पितळात जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गोमेकॉत पाठविला. वास्को पोलीस पुढील चौकशी करीत आहेत.