सोसायटी महानिरीक्षकांचा निर्णय; 90 दिवसांत समिती निवडीचे आदेश
दक्षिण गोवा सोसायटी महानिरीक्षक यांनी युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) या संघटनेची नवीन कार्यकारी समितीसाठी निवडण्यासाठी 30 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेली निवडणूक अखेर रद्दबातल ठरविली आहे. तसेच दक्षिण गोव्याचे सोसायटी महानिरीक्षक सूरज आर. वेर्णेकर यांनी काल काही महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, संघटनेची वर्ष 2025 ते 2028 या तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारी समिती निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात यावी, प्रशासक नियुक्तीनंतर नव्वद दिवसांत ही निवडणूक घ्यावी, उटा संघटनेवर प्रशासकांची नियुक्ती करण्यासाठी सरकारला अहवाल सादर करावा, कार्यकारी समितीची निवड करण्यासाठी सर्व आठ संस्थांना 30 दिवसांची नोटीस जारी करावी, असे आदेशात म्हटले आहे.
उटा संघटनेची नवीन कार्यकारी समिती निवडण्यासाठी 30 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेली निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. याविरोधात सहा संस्था आणि एका व्यक्तीने सोसायटी महानिरीक्षकांकडे एक याचिका दाखल करून आव्हान दिले होते. गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर फेडरेशन, अखिल गोवा शेड्युल ट्रायब युनियन, ट्रायबल वेल्फअर असोसिएशन, गौड, जमात महासंघ गोवा, ताळगाव ट्रायबल वेल्फअर आणि शंकर बी. गावकर यांचा याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये समावेश होता. त्यांनी कार्यकारी समितीचे प्रकाश वेळीप, दुर्गादास गावडे आणि नानू बांदोडकर यांना प्रतिवादी केले होते.
आदिवासी समाजातील आठ संस्थांनी एकत्र येऊन युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) या संस्थेची स्थापना केली आहे. कार्यकारी समितीची निवड करण्यासाठी 30 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेची 30 दिवस आगाऊ नोटीस देण्यात आली नाही. त्यामुळे उटाची निवडणूक रद्द करण्याची याचिकेत मागणी करण्यात आली होती. या याचिकेनंतर संस्था महानिरीक्षक दक्षिण गोवा यांनी उटा या संस्थेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे आदिवासी समाजातील दोन्ही गटात शाब्दिक वादावादी देखील झाली होती.