Home बातम्या उज्ज्वल निकम यांच्यासह चौघांचे राज्यसभा खासदार म्हणून नामांकन

उज्ज्वल निकम यांच्यासह चौघांचे राज्यसभा खासदार म्हणून नामांकन

0

दहशतवादी अजमल कसाब याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम खासदार बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे राज्यसभेसाठी नामांकन केले आहे. निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सी. सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांचे नामांकन राज्यसभेसाठी केले आहे. ही अधिसूचना शनिवारी गृहमंत्रालयाने काढली.

उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध सरकारी वकील आहेत. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. 26/11 च्या हल्ल्यानंतर पकडण्यात आलेला एकमेव पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याच्या खटल्यात उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. त्यांनी कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी जोरदार युक्तिवाद केला. त्यामुळे कसाबला फाशी मिळाली.

हर्षवर्धन श्रृंगला हे एक वरिष्ठ राजनयिक आहेत. ते 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी आहेत. 35 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी नवी दिल्लीसह परदेशात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मीनाक्षी जैन या इतिहासाच्या सुप्रसिद्ध प्राध्यापक आहेत. तर सदानंदन मास्टर हे बऱ्याच काळापासून शिक्षण आणि समाजसेवेशी जोडलेले आहेत. ते स्वतः केरळमध्ये राजकीय हिंसाचाराचे बळी ठरले आहेत.