उंच माझ्या टाचा

0
153
  •  दिलीप वसंत बेतकेकर

हायहिल्सच्या क्षणिक सुख व आनंदाचा मोबदला खूप भयानक आहे हे विसरू नका. हायहिल्समुळे आयुष्याच्या भावी टप्प्यात दिवसभर ‘हाय हाय’ म्हणण्याची पाळी येणार आहे हे ध्यानात असू द्या. ते टाळायचं असेल तर हाय हिल्सना म्हणा ‘बाय बाय’.

चतुर्थीला गावी जाण्याची तयारी सुरू झाली होती. सामानसुमान गाडीत भरत होतो. इतक्यात शेजारच्या हॉटेलच्या बाहेर किंचाळण्याचा आवाज आला. चार पावलं पुढं जाऊन काय झालं ते बघतो तर हॉटेलमधून बाहेर पडणारी एक तरुणी दाणकन् पडली होती. सोबत असलेली दुसरी तिला धरून उभं करण्याचा प्रयत्न करत होती. दोन्ही तरुणींनी उंच टाचांची पादत्राणे घातली होती. त्यामुळे तोल जाऊन ती पडली होती. दिवसभरात ठिकठिकाणी अशा कितीतरी पडत असतील, आपटत असतील, हाडं मोडून घेत असतील.

केवळ उंच टाचांमुळे पडल्यामुळे डॉक्टरांकडे जाणार्‍यांची संख्या सतत वाढते आहे, पण उंच टाचांचा सोस काही कमी होत नाही.
ही हायहिल्सवाली हायफाय मंडळी सामान्य गरीब लोकांची वेशभूषा पाहून नाक मुरडतात. मागासलेले, बुरसटलेले, अंधश्रद्धावाले म्हणून थट्टामस्करी करतात. पण हवामान, इतर स्थानिक परिस्थितीचा विचार न करता ज्या तर्‍हेचे कपडे, पादत्राणे, खाणेपिणे करतात ते बघितल्यावर यांच्याइतके आंधळे कोणी असतील असं वाटत नाही. एरवी ‘पुराणातील वांगी’ म्हणून कुचेष्टा करणारी आणि ऊठसूठ वैज्ञानिकतेचा जप करणारी ही मंडळी आहार-विहाराच्या बाबतीत डॉक्टर व तज्ज्ञ लोक सांगतात ते स्वीकारायला तयार नसतात. आपलं हित कशात आहे हेच कळेनासं झालं एवढं खरं.
एम्सच्या संधीवात विभागाचे प्रमुख डॉ. उमाकुमार यांच्या मते दिवसभरात भरपूर वेळ उंच उंच टाचांचे बूट किंवा सँडल्समुळे हाडांचे नुकसान होऊन संधीवात होतो. चाळीशीतल्या अनेक महिला सांधेदुखीच्या उपचारासाठी एम्समध्ये येत असतात. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर ऑपरेशन हाच पर्याय राहतो असं त्यांचं मत आहे. म्हणजे उंच टाचांची पादत्राणं वापरणं हे संधीवाताला दिलेलं निमंत्रणच आहे.
शरीराचं पायावर पडणारं वजन समप्रमाणात, संतुलित पडत नाही. संरेखन म्हणजे अलाईनमेंट बिघडतं. त्यामुळे शरीराच्या काही भागांवर अधिक भार पडतो. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.
चपलांच्या टाचांची उंची व पायाच्या बोटांवर (पंजावर) पडणार्‍या दाबदबावात सहसंबंध दिसून आला आहे. शरीराच्या वजनाचा मध्य पुढे ढकलला जातो. एक इंच टाचा असतील तर २२% अधिक दाब, ताण येतो. दोन इंच टाचा असतील तर ५७% अधिक व तीन इंच उंचीच्या टाचा असतील तर ७६% अधिक दबाव येतो असं तज्ज्ञ मंडळी सांगतात. शरीर बरंच पुढे झुकल्यामुळे कंबरेच्या खालच्या (लोअर बॅक) भागात दुखणं सुरू होतं. म्हणून पाच सेंटीमीटरपेक्षा अधिक उंच टाचांची पादत्राणे कटाक्षाने टाळण्याचा विशेषज्ञ इशारा देतात. जास्तीत जास्त एक इंच उंच टाचा चालतील.
पोटर्‍यांच्या स्नायूंवरही ताण व दाब वाढतो. गुडघेदुखीही वाढू लागते. नसाही ताणल्या गेल्यामुळे एकूणच सतत दुखणं सुरू राहतं.

हॉर्वर्ड मेडिकल स्कूलच्या एका संशोधनानुसार कोणतीही चप्पल न वापरता चालण्यापेक्षा उंच टाचांची पादत्राणं वापरल्यामुळे गुडघ्यांवर २५% अधिक ताण पडतो.
क्वीनस्लँड (ऑस्ट्रेलिया) येथील ग्रिफिथ विद्यापीठात नील नेक्रोनिन व त्याच्या दोन सहकार्‍यांनी एक महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी अध्यक्षस्थानी नऊ तरुण महिला (ज्यांनी दोन वर्ष आठवड्यात चोवीस तास उंच टाचांच्या चपला वापरल्या होत्या) व दहा महिला (ज्यांनी क्वचित उंच टाचांची पादत्राणं वापरली होती) अशांची अध्ययनासाठी निवड केली. उंच टाचावाल्या महिलांना त्यांच्या आवडीचे हायहिल्स बूट घेऊन प्रयोगशाळेत बोलवले. तिथे अनेक प्रकारची उपकरणं, सेन्सर्स होते. २६ फूट लांबीच्या चालण्याच्या पटट्यांवर त्यांना दहा वेळा अनवाणी व दहा वेळा हायहिल्स घालून चालायला लावलं.

एरवी उंच टाचा वापरणार्‍या पण या पाहणीत बिनाबूट (अनवाणी) चालणार्‍या नऊ (पहिला गट) व नेहमी सामान्य चपला वापरणार्‍या (दुसरा गट) महिलांच्या हालचालींमध्ये खूप फरक दिसून आला. पहिल्या गटातील (हायहिल्स वाल्या) महिलांच्या पोटर्‍यांचे स्नायू आखूड झाल्यामुळे त्या स्नायूंवर अधिक दबाव पडत असल्याचे जाणवले. टाचेच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूबंधावर (अकायलीस टेंडन) विपरीत परिणाम झाल्यामुळे चालण्यावर व ठेवणीवरही परिणाम होतो.
उंच टाचांच्या पादत्राणांमुळे थोडा वेळ झोकात आणि ऐटीत चालण्याचे समाधान काहींना मिळत असेल तर काहींना आपण खूप सुंदर आणि स्मार्ट झालो असाही भास होत असेल. पण या आनंदापेक्षा नुकसान मात्र खूप होतं आणि कायमस्वरूपी दुखणं वाट्याला येतं. यातलं काय निवडायचं हे ज्याच्या त्याच्या हाती आहे.

थोडक्यात हायहिल्सचे परिणाम….
* हायहिल्समुळे जीवयांत्रिकी (बायोमेकॅनिकल) बदल होतो.
* पाय दुखणे, ताण, दबाव यांचा हायहिल्सशी सरळ संबंध असतो.
* गुडघ्यावर हायहिल्समुळे अतिरिक्त दबाव पडल्यामुळे गुडघेदुखी सुरू होते.
* पोटरीचे स्नायू आखडून दुखायला लागतात.
* टाचांमध्येही विकार उत्पन्न होतात.
हायहिल्सच्या क्षणिक सुख व आनंदाचा मोबदला खूप भयानक आहे हे विसरू नका. हायहिल्समुळे आयुष्याच्या भावी टप्प्यात दिवसभर ‘हाय हाय’ म्हणण्याची पाळी येणार आहे हे ध्यानात असू द्या. ते टाळायचं असेल तर हाय हिल्सना म्हणा ‘बाय बाय’.