इस्रोची ऐतिहासिक कामगिरी

0
123

>>२० उपग्रह एकसाथ अवकाशात

 

भारतीय अवकाश संशोधन केंद्र तथा इस्रोचा पीएसएलव्हीसी-३४ हा प्रक्षेपक तब्बल २० उपग्रहांसह काल सकाळी येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून झेपावला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे इस्रोने एकाच वेळी २० उपग्रह सोडण्याचा नवा इतिहास रचला.
इस्रोच्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रातून गेल्या सोमवारी या मोहिमेचे काऊंट डाऊन सुरू झाले होते. त्यानंतर ४८ तासांनंतर म्हणजे काल सकाळी ९.२६ वा. प्रक्षेपक झेपावला. याआधीच्या मोहिमेत एकाच वेळी १० उपग्रह अवकाशात सोडण्यात आले होते. मात्र यावेळी २० उपग्रह सोडून इस्रोने इतिहास घडवला.
इस्रोने दिलेल्या माहितीनुसार प्रक्षेपण झालेल्या २० उपग्रहांचे एकूण वजन १२८८ किलो एवढे आहे. यापैकी दोन भारतीय बनावटीचे, तर अन्य १८ विदेशी बनावटीचे आहेत. अमेरिका, कॅनडा, जर्मनी व इंडोनेशिया या विदेशी बनावटीच्या उपग्रहांचा त्यात समावेश आहे.
भारतीय बनावटीच्या उपग्रहांमध्ये पुणे येथील सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ व तामिळनाडूतील सत्याभामा विद्यापीठातील काही प्राध्यापकांनी तयार केलेल्या उपग्रहाचा समावेश आहे. स्वयम् उपग्रहाचे वजन ९९० ग्रॅम असून त्यासाठी ५० लाख रुपये खर्च आला आहे.
पंतप्रधानांकडून प्रशंसा
इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल त्यांनी ट्विटरवरून शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.