राणविरोधात युद्ध छेडले आहे. इराणला सर्वतोपरी कमकुवत करण्याचे प्रयत्न या दोन्ही देशांकडून केले जात आहेत. त्यांच्या लष्करी तळांपासून तेल साठ्यांपर्यंत सगळीकडे या दोन्ही देशांनी हल्ले केले आहेत. या हल्ल्यांची तीव्रता काल देखील कायम राहिली. इराणमधील 400 हून अधिक लक्ष्यांवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपक आणि शस्त्रास्त्र निर्मिती सुविधांना लक्ष्य केले गेले. तसेच इराणच्या तेहरान आणि कराज भागातील तेलसाठ्यांवर हल्ले झाले. त्यामुळे या भागात आगीचे मोठे लोळ आकाशात पाहायला मिळाले.
इस्रायली संरक्षण दलांच्या (आयडीएफ) मते, हवाई दलाने गेल्या 24 तासांत पश्चिम आणि मध्य इराणमध्ये व्यापक हल्ले केले, ज्यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपक, संरक्षण प्रणाली, शस्त्रास्त्रे साठवण सुविधा आणि इतर लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले गेले. दुसऱ्या बाजूला लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यातील मृतांचा आकडा 394 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये 83 मुले आहेत. तसेच 1,130 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
इराणकडूनही प्रतिहल्ले
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) ने इस्रायली शहरांच्या तेल अवीव आणि बेअरशेबा येथील लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. याशिवाय जॉर्डनमधील एका अमेरिकन हवाई तळालाही अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले. जॉर्डनच्या अझ्राक शहरातील मुवफ्फक अल-साल्ती हवाई तळाला अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले.
यूएईवरील इराणी
हल्ल्यात 4 जण ठार
संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये इराणी हल्ल्यात मृतांची संख्या चार झाली आहे. यूएईच्या संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मृतांमध्ये पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशचे नागरिक आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर इराणने शेजारील देशांवर प्रत्युत्तर म्हणून हल्ले केले. या काळात यूएईमध्ये चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला.
खामेनेईंच्या मृत्यूचा बदला घेणार
या युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘इराणची पराभूत राष्ट्र’ अशी अवहेलना केल्यानंतर इराण संतापला आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारिजानी यांनी सरकारी दूरचित्रवाणीशी बोलताना मोठा इशारा दिला. आमच्या नेत्याच्या रक्ताचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जे केले त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. त्यांनी आमच्या नेत्याला मारले आणि हजाराहून अधिक लोक शहीद झाले आहेत, ही साधी गोष्ट नाही, असे लारिजानी यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या बाजूला इराण पुढील सहा महिने युद्ध लढू शकतो, असे रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटले आहे.
इराणमधील तेलसाठ्यांवर हल्ले
इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिमेला असलेल्या कराज शहरातील एका इंधन साठवण डेपोवर काल इस्रायलने हल्ला केला. तेहरानमधील मुख्य तेल शुद्धीकरण प्रकल्प शहर-ए-रेय परिसरात असून, हा भागही हल्ल्याचे लक्ष्य ठरला. तसेच, तेहरानच्या उत्तर-पश्चिम भागातील शहरान तेल डेपोवरही हल्ला झाला. या हल्ल्यानंतर मोठी आग लागली आणि आकाशात दाट काळ्या धुराचे प्रचंड लोट उठल्याचे दिसून आले.
युद्धात आतापर्यंत काय घडले?
इराणमध्ये आतापर्यंत 6,668 नागरी भागांना लक्ष्य.
या हल्ल्यांमध्ये 5,535 घरे आणि 1041 दुकानांचे नुकसान.
14 वैद्यकीय केंद्रे आणि 65 शाळांवरही हल्ला करण्यात आला.
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धात आतापर्यंत 1483 लोकांचा मृत्यू.
युद्धात आतापर्यंत इस्त्रायलचे 1765 लोक जखमी.