इस्पितळांची नावे निश्‍चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात

0
107

>>दीनदयाळ आरोग्य विमा योजना

 

पं. दीनदयाळ आरोग्य विमा योजनेसाठीचे अर्ज लोकांना वितरित करण्याचे तसेच भरून दिलेले अर्ज स्वीकारून त्यांची नोंदणी करण्याचे काम राज्यभरातील १६ केंद्रांतून जोरात चालू आहे. या योजनेसाठीच्या २५ इस्पितळांची यादी तयार करण्याचे काम येत्या महिना-दीड महिन्यात होणार असल्याचे जीईएल (गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड) या कंपनीचे चेअरमन दत्तप्रसाद नाईक यांनी सांगितले. या योजनेसाठीचे अर्ज सर्व लाभधारकांपर्यंत पोचतील याची काळजी घेतली जात आहे. आतापर्यंत नक्की किती अर्ज आले त्याची यादी उपलब्ध नाही. मात्र, पणजी, मडगाव, वास्को व म्हापसा येथून सर्वाधिक अर्ज आले असल्याचे ते म्हणाले.
आधारकार्ड सक्तीचे
दरम्यान, या योजनेसाठी आधारकार्ड हे सक्तीचे आहे. मात्र, राज्यातील काही ज्येष्ठ नागरिकांकडे ते नसल्याचे दिसून आलेले असून अशा ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन आधारकार्ड तयार करून देण्याचा आपला विचार असल्याचे नाईक म्हणाले. ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्डासाठीची धावपळ करणे शक्य होत नाही. अशा लोकांना घरी संबंधीतांना पाठवून त्यांना आधारकार्ड करून दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. हे काम आपण पुढील आठवड्यापासून हाती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.