दोन्ही देशांतील संघर्ष विकोपाला; हल्ले सुरुच
इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आणखी विकोपाला गेला आहे. इस्रायल-इराणमधील संघर्षात मोठी जीवितहानी होत आहे. या दोन्ही देशांच्या संघर्षात अमेरिकेनेही उडी घेतली आहे. अमेरिकेने इराणमधील 3 अणुऊर्जा केंद्रावर हवाई हल्ला केल्यानंतर इस्रायलने काल पुन्हा इराणवर मोठे हल्ले केले. इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगासह आणखी काही ठिकाणी भीषण हल्ले केले. या हल्ल्यात अनेक परिसरही उद्ध्वस्त झाले आहेत. दुसऱ्या बाजूला इराणकडून उत्तर इस्रायलमध्ये अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
इराणमधील हल्ल्याच्या विध्वंसाचे व्हिडीओ समोर आले आहेत. या संदर्भात इराणी सरकारी टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानजवळ सोमवारी दुपारी तीव्र इस्रायली हवाई हल्ला झाला. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी केली असून, तेहरानमधील इराणी सरकारी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायल डिस्ट्रक्शन वॉच, आयआरजीसीचे बसिज फोर्स मुख्यालय आणि अंतर्गत सुरक्षा मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आले. यावेळी इस्रायलने इराणच्या एविन तुरुंगाच्या गेटवर भीषण हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या हल्ल्यात काही जीवितहानी झाली का? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. एविन तुरुंग हे पाश्चात्य कैद्यांना ठेवण्यासाठी ओळखले जाणारा कुप्रसिद्ध तुरुंग आहे.
इराणकडून काल उत्तर इस्रायलमध्ये अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या क्षेपणास्त्र हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये इस्रायलमधील एश्दोद शहरावर झालेल्या इराणी क्षेपणास्त्र हल्ल्याचे क्षण कैद झाले आहेत. हे एक डॅशकॅम फुटेज आहे, ज्यात एका गाडीजवळ क्षेपणास्त्र स्फोटानंतर दगड आणि ढिगारे आकाशात कसे उडतात हे स्पष्ट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र एश्दोदजवळील एका पॉवर स्टेशनवर आदळले.
कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर हल्ला
अणूऊर्जा केंद्रांवरील हल्ल्यानंतर इराणनेही काल प्रत्युत्तरादाखल कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळांवर सहा पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे डागली. कतारमध्ये मध्य पूर्वेतील अमेरिकेचे सर्वात मोठे लष्करी तळ आहे. त्याच ठिकाणी इराणने आता क्षेपणास्त्रे डागली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर कतार देखील सतर्क झाले असून, कतारने आपले हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सीरियाच्या हसकाह प्रांतातील एका अमेरिकन लष्करी तळावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे.