इराणसमोर जर्मनीने टाकली नांगी

0
246

पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील ‘सी’ गटातील सामन्यात इराणने झंझावाती खेळाचे दर्शन घडवताना जर्मनीवर ४-० असा दारुण पराभव लादला. इराणने या बहारदार विजयासह स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

जर्मनीच्या संघाला संपूर्ण सामन्यादरम्यान सूर गवसला नाही. तर इराणने पोषक वातावरणात खेळताना जर्मनीच्या दर्जाला किंमत न देता केवळ आक्रमणावर लक्ष केंद्रित करत गोलांची बरसात केली. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला युनिस डेल्फी याने इराणचे खाते उघडले. १५व्या मिनिटाला इराणची आघाडी दुप्पट झाली असती. परंतु, डेल्फीने लगावलेली फ्री किक क्रॉसबारला लागून बाहेर गेली. डेल्फी व अलायार सय्यद यांनी पहिल्या ४५ मिनिटांत जर्मनीच्या बचावफळीची व त्यांचा गोलरक्षक लुका प्लॉगमन यांची परीक्षा पाहिली. ४२व्या मिनिटाला डेल्फीने जर्मनीचा बचाव पुन्हा भेदत स्वतःचा व संघाचा दुसरा गोल केला.

जर्मनी संघाच्या मध्यफळी व बचावफळीतील समन्वयाचा अभाव पहिल्या सत्रात ठळकपणे दिसून आला. आपल्या संघातील खेळाडूकडे चेंडू पास करण्याऐवजी प्रतिस्पर्धी संघातील चेंडू देण्याच्या घटना अनेकदा या सत्रात घडल्या. केवळ गोलरक्षक प्लॉगमनच्या चपळतेमुळे पहिल्या गोलांत इराणला दोन गोलांवर समाधान मानावे लागले.

मध्यंतरानंतर जर्मनीचा संघ पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. परंतु, दुसरे सत्र सुरू होऊन चार मिनिटांचा खेळ झालेला असतानाच डेल्फीच्या अप्रतिम पासवर सय्यदने हेडरद्वारे इराणचा तिसरा गोल लगावला. वाहिद नामदारी याने ७५व्या मिनिटाला चौथा गोल करत जर्मनीच्या दारुण पराभवावर शिक्कामोर्तब केले. शेवटच्या साखळी सामन्यात इराणचा सामना कॉस्टारिकाशी तर जर्मनीचा सामना गिनी संघाशी होईल.