इम्रान खान यांची त्वरित सुटका करा

0
3

पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असून, त्यांना तातडीने सोडा, असा आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने काल दिला.

इम्रान खान यांच्या अटकेसंदर्भात गुरुवारी 11 मे रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या याचिकेवर पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल, न्यायमूर्ती मुहम्मद अली मजहर आणि न्यायमूर्ती अतहर मिनल्लाह या तीन सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली.
पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान खान यांना बेकायदेशीर पद्धतीने अटक केल्याबद्दल नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) चांगलेच फटकारले. सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांनी इम्रान यांना इस्लामाबाद न्यायालयाच्या परिसरातून अटक करण्यावर प्रश्न उपस्थित केला. तसेच इम्रान खान यांना तासाभरात न्यायालयात हजर करण्याचे निर्देश एनएबीला दिले. न्यायालयात हजर राहिल्यानंतर सरन्यायाधीशांनी इम्रान खान यांच्या सुटकेचे आदेश जारी केले.

एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या परिसरातून कशी काय अटक केली जाऊ शकते? न्यायालयाची एक प्रतिष्ठा असते. इम्रान खान यांच्या अटकेनंतर न्यायालयात कोणालाही सुरक्षित वाटणार नाही. न्यायालयाच्या आवारात अटक करणे ही एक धोकादायक प्रवृत्ती आहे. हे थांबवले पाहिजे, असे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल म्हणाले.