इमारत कोसळून १९ जण मृत्यूमुखी

0
14

>> मुंबईच्या कुर्ला येथील घटना; १३ जण जखमी

मुंबईतील कुर्ला येथे सोमवारी रात्री उशिरा चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. कुर्ल्यातील नाईक नगरमध्ये सोमवारी रात्री उशिरा ही ४ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा हळूहळू वाढतून १९ वर गेला आहे. या घटनेत काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

कुर्ला पूर्वेकडील एसटी बस डेपोच्या जवळील नाईक नगर सोसायटी येथील चार मजली इमारत सोमवारी रात्री ११.३० च्या दरम्यान कोसळली. या इमारतीमध्ये ४० बांधकाम मजूर राहत होते. हे सर्व मजूर कुर्ल्यातच काम करत होते. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याला सुरुवात केली. इमारत कोसळल्यानंतर ढिगार्‍याखाली २०-२५ लोक अडकले होते. त्यापैकी १९ जणांचा मृत्यू झाला.

अजय भोले पासपोर (२८), अजिंक्य गायकवाड (३४), कुशर प्रजापती (२०), सिकंदर राजभर (२१), अरविंद भारती (१९), अनुप राजभर (१८), अनिल यादव (२१), शाम प्रजापती (१८) अशी मृतांची नावे आहेत, तर काही मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

जखमींपैकी चार जणांची प्रकृती स्थिर आहे, त्यापैकी तिघांवर राजावाडी रुग्णालयात, तर एकावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य ९ जखमींवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.

या घटनेत जखमी झालेल्यांमध्ये चैत बसपाल (३६), अखिलेश माझी (३६), संतोषकुमार गौड (२५), सुदेश गौड (२४), रामराज रहमानी (४०), संजय माझी (३५), आदित्य कुशवाह (१९), अबिद अन्सारी (२६), गोविंद भारती (३२), मुकेश मोर्य (२५), मनिष यादव (२०) यांच्यासह अन्य काहींचा समावेश आहे.
जखमींपैकी संतोषकुमार गौड याने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही जेवून नुकतेच भांडी घासत होतो. रात्रीचे ११.३० वाजले होते. तितक्यात भूकंप झाल्यासारखे जाणवले आणि आम्ही घराबाहेर पळालो. अचानक पूर्ण इमारत कोसळली. आम्ही चौथ्या मजल्यावर राहत होतो. इमारत कोसळ्यावर ढिगाराच्या वरच्या बाजूला असल्याने आम्ही सुरक्षित बाहेर पडलो; परंतु खालच्या मजल्यावरचे रहिवासी ढिगार्‍याखाली अडकले, असे संतोषकुमार याने सांगितले.

नाईक नगर परिसरातील एकमेकांना खेटून असलेल्या चार इमारती धोकादायक असल्याने पालिकेने रहिवाशांना स्थलांतर करण्याची सूचना दिली होती. मात्र रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या नव्हत्या. पडलेली इमारत धोकादायक इमारतींपैकीच एक असल्याचे समोर आले आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
मुंबईतील कुर्ला पूर्व परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांबाबत दु:ख आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहवेदना व्यक्त केली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या वारसाला मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात यावेत, असे निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत.