Home बातम्या इफ्फीबाबत डीएफएफ उदासीन

इफ्फीबाबत डीएफएफ उदासीन

0

काल यासंबंधी या प्रतिनिधीशी बोलताना गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष विष्णू सूर्या वाघ म्हणाले की, डीएफएफची टीम दरवर्षी इफ्फीच्या १५ ते २० दिवस अगोदर गोव्यात दाखल होत असे. इफ्फीच्या आयोजनाच्या तयारीबरोबरच महोत्सवासाठीच्या महत्त्वाच्या अशा सूचना हे अधिकारी करत असत.

मात्र, यंदा या अधिकार्‍यांनी आम्हाला इफ्फीचे काहीच सोयरसूतक नाही अशीच जवळपास भूमिका घेतलेली असून इफ्फी आठ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गोव्याकडे पाठच केलेली आहे. इफ्फीच्या तयारीसाठी येणार्‍या अधिकार्‍यांसाठी १५ दिवसांपूर्वीच हॉटेलांत खोल्यांचे आरक्षण करण्यात आले होते, अशी माहितीही वाघ यांनी दिली.

यंदा इफ्फीतील काही फिल्म विभागही डीएफएफवाल्यानी रद्द केले असल्याचेही वाघ यांनी सांगितले. दरवर्षी असणारा प्रिमियर विभाग तसेच रिट्रोस्पेक्टिव्ह हे विभाग यंदा रद्द करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

यंदा शॉर्ट फिल्म सेंटरला फाटा

इफ्फीत यंदा शॉर्ट फिल्म सेंटरला फाटा देण्याचा निर्णय गोवा करमणूक सोसायटीने घेतला असल्याची माहितीही वाघ यांनी दिली. इफ्फीत शॉर्ट फिल्म सेंटरकडे चित्रपट महोत्सव संचालनालय पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे इफ्फीतील शॉर्ट फिल्म सेंटर रद्द करून फेब्रुवारी महिन्यात वेगळा लघु चित्रपट महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वाघ यांनी सांगितले.