इफ्फीनंतर जमावबंदी मागे ः मुख्यमंत्री

0
138

>> म्हादई आंदोलन दडपण्यासाठी जमावबंदी ः कॉंग्रेसची टीका

राज्यात लागू असलेला जमावबंदीचा आदेश इफ्फीचा समारोप झाल्यानंतर मागे घेतला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या अयोध्या खटल्याच्या निकालाच्या वेळी ७ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. अयोध्या खटल्याच्या निकालानंतर जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आलेला नसल्याने विरोधी पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यभरात विरोधी पक्षांकडून म्हादईच्या रक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन दडपून टाकण्यासाठी जमावबंदीचा आदेश कायम ठेवण्यात आल्याची टीका कॉंग्रेसने पत्रकार परिषदेत काल केली.

राज्यातील जमावबंदीचा आदेश मागे घेण्यसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांसमोर एका याचिका दाखल करण्यात आली आहे, असे कॉंग्रेसच्या पर्वरी गटाचे अध्यक्ष ऍड. शंकर फडते यांनी दिली.

म्हादईच्या विषयावरून कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेले आंदोलन दडपून टाकण्यासाठी सरकारकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप कॉंग्रेसचे उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके यांनी केला.

कला अकादमीसमोर
म्हादईप्रश्‍नी निदर्शने
दरम्यान, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी येथील कला अकादमीसमोर म्हादई जनजागृतीसाठी निदर्शने केली. म्हादईच्या प्रश्‍नावरून जनजागृती करणार्‍या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोवा मनोरंजन संस्थेच्या मुख्यालयासमोर म्हादई जनजागृती निदर्शने करण्याचे ठरविले होते. तथापि, शेवटच्या क्षणी कॉंग्रेसने कला अकादमीच्यासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला.

म्हादई प्रश्‍नाबाबत सर्वोच्च
न्यायालयात लढाई ः रॉड्रिगीस

म्हादईच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात लढाई लढली जाणार आहे, असे जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
म्हादईप्रश्‍नी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कणखर भूमिका घेतली असून गोव्याला योग्य न्याय मिळणार आहे. केंद्रीय मंत्रालयाकडून कर्नाटकाला देण्यात आलेले पर्यावरण पत्र मागे घेण्यात आल्यानंतर म्हादईचा विषय संपणार नाही. म्हादईच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात लढाई चालू ठेवली जाणार आहे, असे मंत्री रॉड्रीगीस यांनी सांगितले.
म्हादईप्रश्‍नी मंत्रिमंडळ मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यापाठीमागे ठामपणे उभे आहे. म्हादई प्रश्‍नी योग्य न्याय मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगितले.