इतिहास : प्रताप आणि प्रमाद

0
259

– डॉ. सोमनाथ कोमरपंत
बालपणीच मला इतिहासाची आवड लागली. पण त्यात काही विशेष नाही. ती प्रत्येकाला असतेच. भारतासारख्या संस्कृतिसमृद्ध भूमीत ज्या बालकांचा जन्म झालेला आहे, त्यांनी बालपणी रामायण-महाभारतातील कथा ऐकलेल्या असतात. भारतीयत्वाचा तो प्रथम संस्कार आहे. हे बीज एकदा का मनात पडले तर ते रुजतेच. पुढे त्याचा अनेक अंगांनी विकास व्हावा अशी आई-वडिलांची इच्छा असते. आपला इतिहास बालकांना मातेच्या दुग्धपानाबरोबर कळत जातो. पण तो इतिहास आहे हे माहीत नसताना.जाणीवपूर्वकतेने एखादी गोष्ट करणे भाग पडते तेव्हा ती सक्ती होते. मग भक्ती राहत नाही. रामायण-महाभारतातील शौर्याच्या, चांगुलपणाच्या गोष्टी ऐकताना मुलांना कंटाळा येत नाही. वडीलधार्‍या माणसांकडून त्या ऐकताना कान टवकारले जातात. ‘पुढे काय… पुढे काय?’ असा प्रश्‍न ती विचारू लागतात. बरे आणि वाईट यांमधील फरक काय हेदेखील या महाकाव्यांच्या शिकवणीतून मनावर बिंबवले जाते. वाढत्या वयाबरोबर नंतरचा इतिहास त्यांना शिकावा लागतो. इतिहासातील व्यक्ती, त्यांच्या वृत्तिप्रवृत्तीमुळे झालेल्या घडामोडी आणि सनसनावळी लक्षात ठेवाव्या लागतात. त्यांच्या आकलनाचे विशिष्ट वय असते. त्यांच्या बुद्धीच्या पलीकडे या गोष्टी गेल्याबरोबर त्राग्याने ती विचारतात, ‘‘इतक्या उठाठेवी या लोकांनी केल्याच कशाला? आम्हाला विनाकारण ताप! पानिपतची पहिली लढाई, दुसरी लढाई आणि तिसरी लढाई कधी झाली याच्याशी आमचा संबंध तो काय?’’ अशा व्यक्ती, अशा घटना आणि त्यांचा काल लक्षात ठेवता ठेवता त्यांच्या नाकी नऊ येतात. तेव्हा मग चांदबिबीला किंवा सुलताना रझियाला टोकदार पेन्सिलीने मिश्या काढणे सुरू होते. आपल्या बालबुद्धीने त्यांनी इतिहासावर उगविलेला तो सूड असतो. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, आपला इतिहासही रंजक पद्धतीने शिकवला गेला पाहिजे. ही प्रक्रिया आनंददायी व्हायला हवी. इतिहासाचे अध्ययन कशासाठी याची समज या वयात मुलांना यायला हवी. यासंदर्भात वि. द. घाटे यांनी लिहिलेला ‘नाट्यरूपी महाराष्ट्र’ सहज आठवावा.
आमच्या सुदैवाने १९५३-५४ च्या दरम्यान ‘रामायण-महाभारतातील सोप्या गोष्टी’ आम्हाला अभ्यासासाठी लावलेल्या होत्या. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे ते आनंददायी होते, स्मरणशक्तीला ताण द्यावा लागत नाही आणि सर्जनशीलतेला ते पोषक असते याचा अनुभव त्या वयात आमच्या पिढीने घेतला. दिवस गोमंतकाच्या पारतंत्र्याचे होते. सर्वत्र प्रतिकूल परिस्थिती होती. पण शालेय विश्‍व आनंदमय करण्याचे व्रत शाळांनी आणि संस्थाचालकांनी निष्ठेने अंगीकारले होते. मकरसंक्रांतीच्या पर्वणीकाळात काढल्या जाणार्‍या प्रभातफेर्‍या आणि त्यामुळे शाळा-शाळांमध्ये निर्माण झालेले सौहार्द आजही आठवते. तिसर्‍या इयत्तेत आम्हाला मराठ्यांच्या इतिहासाचा ओनामा होता. त्यानंतर चौथ्या इयत्तेत ‘मोठी माणसे’ आली. पुस्तक उपलब्ध नव्हते म्हणून त्याऐवजी ‘थोर लोक’ आले. त्यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग आवर्जून अधोरेखित करण्यात आले होते. पाचवीपासून सातवीपर्यंत ‘भारताची कहाणी’ होती. तिच्यात क्रमवार संगती होती. आठवीपासून आमच्या इतिहासाची मजल जगाच्या इतिहासापर्यंत गेली. शालेय वयात एक गोष्ट मनावर बिंबली ः हा इतिहास केवळ मनोरंजनासाठी नाही. हा केवळ अभ्यास-क्रम नाही. माता ते मातृभूमी असा हा विकासक्रम आहे. या मातीशी आमची नाळ पुरलेली आहे. जोडीला ‘जननी जन्मभूमिश्‍च स्वर्गाऽदपि गरियसी’ हा मंत्र संस्कृत भाषेच्या अध्ययनातून मिळाला. देशभक्ती हा विशेष गुण नाही; ते व्यक्तित्वाचे अविच्छेद अंग आहे. ते तसे नसणे हा अवगुण आहे, हे सोळाव्या-सतराव्या वर्षापर्यंत कळले. त्यामुळे आयुष्याचा प्रवास सुखाचा झाला. स्वयंनिर्णयाची क्षमता आली. जगाचा इतिहास कळला नाही तरी आपल्या विश्‍वाचे भान आले.
आपल्या भाषा, त्यांच्यामधील वाङ्‌मय आणि इतिहास यांच्या त्रिवेणी संगमातून संस्कृती जन्मास येते. वाङ्‌मय हे इतिहासाचे उपांग आहे. संस्कृतिविकासाच्या पाऊलखुणा वाङ्‌मयातून उमटत असतात. देश-काल-परिस्थिती यांच्या चिंतनातून सर्जनशील साहित्याची निर्मिती होत असते. तिच्यातून संस्कृतीचा आंतरच्छेद घेतला जातो. आपल्या राष्ट्रात थोर माणसे होऊन गेली. त्यांनी आमच्यासाठी समृद्ध वारसा ठेवलेला आहे. त्याच्या जतनाचे आणि संवर्धनाचे उत्तरदायित्व आपल्याकडे आहे. यातूनच समाजसन्मुख वृत्ती निर्माण होते. हीच इतिहासाची मर्मदृष्टी होय. ‘असे असे घडले ते सांगणारा तो इतिहास’ अशी सोपी अन् सुटसुटीत व्याख्या सांगणारे शिक्षक मला श्रीमल्लिकार्जुन विद्यालयात भेटले. इतिहास हा वस्तुनिष्ठ असतो. वस्तुनिष्ठ पद्धतीने तो शिकवला गेला पाहिजे. नाहीतर अनेक घोटाळे होतात. पूर्वग्रहदूषित दृष्टी निर्माण होते. ‘मी सांगतो तो इतिहास अन् मी सांगतो ते सत्य’ असा एकांगी दृष्टिकोन त्यातूनच प्रकट होतो. समाजहिताला तो बाधक ठरतो.
************
मानवी जीवनात इतिहासाचे मोहन कायम असते. त्याच्या वैभवशाली कालखंडाच्या आठवणींनी माथा उन्नत होतो. बाहूंना स्फुरण येते आणि पराभवामुळे मान खाली जाते. आपल्या भारताचा इतिहास गौरवाचा आहे; तसाच तो पराभवाचा आहे, हे मान्य करण्याचे धाडस मात्र हवे. आपण पराक्रमी कधीच नव्हतो. पण परक्यांची आक्रमणे थोपविता थोपविता आपल्या राष्ट्राचा उभा जन्म गेला. या पराभवाची आणि परक्यांच्या आक्रमणाची मीमांसा करताना एकच मोठा दोष अधोरेखित करावा लागतो तो म्हणजे आपल्यामधील दुभंगलेपणाचा. त्यामुळे सातत्याने खच्चीकरण, आत्मविश्‍वासाचा अभाव आणि स्वत्वाचा विसर या बाबी आपल्या मानसिकतेत शिरल्या. याची तपशीलवार चर्चा करण्याची ही जागा नव्हे. घडामोडींतून इतिहास घडतो. इतिहास म्हटला की घडणे आणि मोडणे हे आलेच. पण आपल्या राष्ट्रीय इतिहासाच्या प्रदीर्घ प्रवासात घडणे कमी आणि मोडणे जास्त प्रमाणात आले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना उदात्त आहे; पण बाहेरून आलेल्याला पाय पसरायला देणे आणि त्याच्या साम्राज्यतृष्णेला वाव देणे योग्य नव्हते. तो प्रमाद आपल्याकडून घडला.
प्राचीन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत आपल्या राष्ट्रावर अनेक आक्रमणे झाली. आर्यपूर्व भारतात मोहेन-जो-दारो आणि हडाप्पा येथील सिंधू संस्कृती ही प्रगत अवस्थेत होती. प्रगत लिपी अस्तित्वात होती. सरदर्या आणि अमुदर्या या नद्यांच्या काठावरून खैबरखिंड ओलांडून आर्य भारतात आले. शांतपणे आले. स्थिर झाले. त्यांनी ‘सप्तसिंधू’ प्रदेशात संस्कृती निर्माण केली. कृषिसंस्कृती आणि ऋषिसंस्कृती यांचा स्वरमेळ त्यांनी साधला. आजच्या सामाजिक संदर्भात यज्ञयागाचे समर्थन कोणी करणार नाही. करूही नये. विवेकाशिवाय घडलेली कृती म्हणजे कर्मकांड. आजही त्याचे अवशेष आढळतात.
भारतात राष्ट्रवाद केव्हापासून आला? बुद्धिवादी लोक त्याचे श्रेय सर्वस्वी ब्रिटिशांना देतात. पण आपण त्याचा पुनर्शोध घेतला तर…
काले वर्षतु पर्जन्यः|
पृथिवी सस्यशालिनी|
देशोऽयमं क्षोभरहितः|
हा व्यापक मनोभूमिकेतून उच्चारलेला स्वर कोणत्या ध्यासातून आलेला आहे? ‘आसेतुहिमाचल’ भूमीत वास करणार्‍या भारतीयांना तो का भावमंत्रित करतो? ‘दुर्लभं भारते जन्म’ ही जाणीव कशातून निर्माण झाली?
‘भारताच्या उत्तर दिशेला देवतात्मा हिमालय नावाचा नगाधिप आहे… तो पृथ्वीचा मानदंड आहे,’ असे ‘कुमारसंभवा’च्या प्रारंभी सांगणारा कालिदास हा आमच्या अभिजात वाङ्‌मयाचाही मानदंड आहे. ‘मेघदूत’ हे काव्य केवळ प्रीतिसंगमाचे आणि प्रीतिविरहाचे थरथरते स्पंदन नव्हे; कालिदासाने वैभवशाली आर्यावर्ताची घडवून आणलेली परिक्रमा आहे. निसर्गाच्या विभ्रमांचे ते विहंगम दर्शन आहे. ‘येणें वाग्यज्ञें तोषावें’ अशी ही कालिदासाची शब्दसमाधी आहे. ‘रघुवंशा’चा प्रसन्न आलोक त्याने भारताच्या भावी पिढ्यांसमोर कलात्म स्वरूपात साकार केला. या स्मरणोज्जीवित विचारतरंगांना वाट करून देताना पं. राहुल सांस्कृत्यायन यांच्या ‘व्हॉल्गा ते गंगा’मधील संस्कृतियात्रेची आठवण होते. एकात्म भारताची स्पंदने ही तर कधीपासूनची. स्वामी विवेकानंदांनी हाच आत्मस्वर शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत उमटविला होता.
************
व्यक्तीच्या जीवनात जशी नियती कार्यरत असते तशी राष्ट्रजीवनातही! एकदा का नष्टचर्य सुरू झाले की त्याचा फेरा कायम राहतो. आपल्या भारताच्या वाट्याला ते आले. महंमद घोरीपासूनचा इतिहास आठवावा. शांती, समृद्धी या देशात नांदली. त्याच्याकडे परकीय देशातील सम्राटांचे डोळे वळले. संस्कृतिविहीन टोळ्यांनी आपला देश व्यापला. शक आले. हुण आले. कुशाण आले. मुघलांनी तर कमालच केली. त्यांनी आमच्या मूळ भूमीवर प्रहार करता करता समाजसंस्कृतीवरही घाला घातला. तैमुरलंग, चंगीझखान, महंमद गझनी आणि अल्लाउद्दिन खिलजी यांच्या आक्रमणांची नुसती आठवण काढली तरी इतिहासाने घेतलेली कलाटणी, उद्भवलेली हत्याकांडे आणि येथील सृजनशील माणसांनी घडविलेल्या संस्कृतीच्या मानचिन्हांची मोडतोड हे सारे सारे आठवत जाते. मन खिन्न होते. बाबर, अकबर यांची गोळी शर्करावगुंठित होती, पण साम्राज्यतृष्णा तीव्र होती. काहींची वाघनखे आतमध्ये लपलेली असतात. ती खुपसण्याचा मार्ग निराळा असतो. आपल्या भारतात केवळ साम्राज्यवैभव नव्हते; सुखशांती नांदत होती. श्रेष्ठ दर्जाची ज्ञानपरंपरा होती. नालंदा, तक्षशिला व विक्रमशिला ही विद्यापीठे होती. ज्ञानार्जनाच्या उद्दिष्टाने येथे बाहेरून माणसे यायची. ह्यूएनसिंग, फाहियान आणि इत्सिंग या ज्ञानार्थी चिनी प्रवासी व्यक्तींचा येथे आवर्जून उल्लेख करायला हवा. इतिहासाच्या अपघातामुळे आता तक्षशिला आपल्याकडे राहिलेली नाही. संस्कृत व्याकरण लिहिणार्‍या पाणिनीची जन्मभूमी आपल्याकडे राहिलेली नाही. वीर शिरोमणी रणजितसिंहाने जिंकून घेतलेला ‘कोहिनूर‘ आजही इंग्लंडच्या राणीच्या दरबारात शोभायमान झालेला आहे. अजिंठा-वेरूळ येथील अक्षय सौंदर्याने भारून टाकणारी लेणी घडविणार्‍या कलावंतांच्या वंशजांचे हात ब्रिटिशांनी छाटून टाकले. महंमद गझनीने सतरा वेळा सोरटी सोमनाथच्या मंदिरावर हल्ला केला. प्राचीन काळापासून आजतागायत परकीयांनी भारतीय भूमी ही आपली संचारभूमी बनविली. पर्यटक संस्कृतीच्या नावाखाली परदेशी लोकांना मुक्त स्वातंत्र्य देणार्‍या स्वदेशी सरकारने वास्तविक याचे भान ठेवायला पाहिजे. इतिहासाची जुनी थडगी आताच्या गतिमान काळात उरकू नयेत असा दृष्टिकोन मनाशी बाळगणारे महाभाग बरेच आहेत. काही बुद्धिवादी तर इतिहासाचे अवगाहन समग्रतेने न करताच चुकीचा अन्वयार्थ लावतात. याला इतिहासाचे आकलन म्हणावे की अनाकलन म्हणावे? जळजळीत सत्य सांगायला ते का कचरतात? सोयीचा इतिहास हा खरा इतिहास आहे का?
************
आपल्या राष्ट्रीय इतिहासाचे पुनरावलोकन करत असताना विदारक आठवणींनी ऊर भरून येतो. मनाच्या कुरुक्षेत्रावर नव्याने तांडव सुरू होते. बधिरलेल्या संवेदनांना नवी जाग येते. आपण सकारात्मक अभुनूती मनात कधीतरी बाळगणार आहोत की नाही? अशा वेळी राणा प्रताप आठवतो. पराभवाच्या खुणा अंगावर झेलत असताना विक्रमांची मालिका निर्माण करणारा हा बलशाली राजा. स्वाभिमानी. व्रतस्थ. राज्य संकटात असताना सोन्याच्या थाळीत भोजन करणार नाही. साध्या अंथरुणावर झोप घेईन असा त्याचा दृढ निर्धार… रोहिडेश्‍वराच्या मंदिरात बाराव्या वर्षी बोटाच्या रक्ताची धार अर्पून स्वराज्याची दीक्षा घेणारा बालशिवबा येथे आठवतो. अखंडित परिश्रमांनी आणि पराक्रमाच्या बळावर गड, किल्ले आणि जंजिरे जिंकून ‘मुद्रा भद्राय राजते|’ अशी १६७४ मध्ये स्वतंत्र शिवमुद्रा निर्माण करणारे शिवछत्रपती आठवतात. या कर्तबगार राजाचे ‘आज्ञापत्र’ आठवते…. स्वारीवर असताना बाजरीच्या ताटातील कोवळी कणसे खाऊन लढणारे पहिले बाजीराव पेशवे आठवतात… ‘मेरी झॉंशी नहीं दुँगी‘ असे आत्मनिर्भर वृत्तीने सांगणारी राणी लक्ष्मीबाई आठवते. अर्वाचीन इतिहासातील ते एक दुष्टपर्व…. वास्को-डी-गामा आफ्रिकेच्या ‘केप-ऑफ-गुड होप’ला वळसा घालून भारतात आला. मलबार किनार्‍यावर उतरला. राजा झामोरीनने त्याचे राजदरबारात स्वागत केले. त्याला दिलेल्या आश्रयातून पुढची अनर्थपरंपरा सुरू झाली. डच, फ्रेंच, ब्रिटिश आणि पोर्तुगीज लोक आपल्या देशात आले. सुरुवातीला आले ते मसाल्याच्या व्यापाराच्या निमित्ताने. ‘इस्ट इंडिया कंपनी’चे रूपांतर साम्राज्य स्थापन करण्याच्या कोनशिलेत झाले. अंतर्मुख होऊन आपल्याच मानसिकतेचा पट या संदर्भात उलगडून पाहायला हवा. हूड, मठ्ठ वृत्तीचा रॉबर्ट क्लाईव्ह कारकून म्हणून भारतात आला. पुढे त्याने सैनिकी पेशात प्रवेश केला. आक्रमक वृत्तीने त्याने हिंदुस्थानात ब्रिटिश सत्तेचा पाया घातला. आपल्या देशाला पुन्हा एकदा ग्रहण लागले. हे कसे घडले? का घडले? ब्रिटिशांच्या कर्तबगारीमुळे की भारतीयांच्या स्वाभिमानशून्य आणि परिस्थितिशरण वृत्तीमुळे? शोध घ्यायला हवा! दीडशे वर्षे निरंकुश सत्ता चालविण्याचा विडा ब्रिटिश सत्तेने उचलला. पण त्यांना बर्‍याच प्रमाणात ते जड गेले. महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाबमधून त्यांना झालेला विरोध… ‘लाल-बाल-पाल’ हे त्यांचे तेजस्वी प्रतिनिधी… पण त्याचबरोबर आकाशातील तेजस्वी तार्‍यांची मालिका असावी तशी क्रांतिकारकांची, देशभक्तांची मांदियाळी भारतात निर्माण झाली… नंदुरबारच्या शिरीषकुमारापासून, मुंबईच्या बाबू गेनूपासून सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन, सुभाषचंद्र बोस ते थेट महात्मा गांधींपर्यंत… सामान्यांपासून असामान्यांपर्यंत… ९ ऑगस्ट १९४२ च्या मध्यरात्री मुंबईत या तेजोमय पर्वाचा कलशाध्याय झाला. ‘छोडो भारत’ या गांधीजींच्या घोषणेला आत्मबळ प्राप्त व्हावे म्हणून लक्षावधी माणसे भाषाभेद, प्रांतभेद विसरून ‘गवालिया टँक’ मैदानावर एकत्र आली. ‘ब्रिटिश साम्राज्याचे दिवाळे काढण्यासाठी मी इंग्लंडचा पंतप्रधान झालेलो नाही’ हे विन्स्टन चर्चिल यांचे शब्द म्हणजे केवळ वल्गना ठरल्या. ऍटलीच्या कारकिर्दीत १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. पंडित जवाहरलाल नेहरू लाल किल्ल्यावर तिरंगी ध्वज चढविताना म्हणाले, ‘मध्यरात्री नवा सूर्योदय झाला.’ स्वातंत्र्य आले ते फाळणीचे दुःख घेऊनच.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसंग्रमाच्या मुख्य पर्वाचे अनेक अध्याय आहेत. ते स्वतंत्रपणे वर्णन करण्यासारखे आहेत. भूषण कवीप्रमाणे ‘किती असे वीर वर्णावे?’ असे म्हणावेसे वाटते. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे समर्पित वृत्तीने केलेले कार्य अतुलनीय, अद्वितीय आहे. उधमसिंगाने मिचायल डायरचा केलेला खून, चाफेकरबंधूंनी रँड व लेफ्टनंट आयर्स्ट यांचा केलेला खून आणि जालियनवाला बाग हत्याकांड सारखी झालेली हत्याकांडे, वंग-भंगाची झालेली चळवळ हा आपल्या इतिहासातील ऊर्जस्वल कालखंड.
************
या राष्ट्रीय इतिहासाचे परिशीलन व्हायला हवे. त्याच्या अवगाहनातून आपल्याला पुढच्या प्रवासाची अंतःप्रेरणा मिळेल. जे आपल्या गतेतिहासापासून धडा घेत नाहीत, त्यांच्याकडून घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती होईल. जोसेफ मॅझिनीचे सावरकरांनी चरित्र लिहिले आहे. त्यांनी मॅझिनीचे एक वाक्य उद्धृत केले आहे ः ढहेीश ुहे हर्रींश पे र्ींळीळेप; ींहशू शिीळीह. आपण या सुवचनातून प्रेरणा घेणार आहोत की नाही?