इटलीतून आणखी ८० खलाशी गोव्यात

0
143

इटली येथून तिसरे विशेष चार्टर विमान बुधवारी रात्री १०.४५ वाजता दाबोळी विमानतळावर ८० खलाशांना घेऊन दाखल झाले. अशाप्रकारे तीन खास चार्टर विमानातून एकूण ४१४ खलाशी इटलीतून गोव्यात आले. रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय कोविड – १९ चाचणीनंतर त्यांची रवानगी पोलीस देखरेखीखाली कळंगुट येथे करण्यात आली. तसेच हेच विमान गोव्यात अडकलेल्या सुमारे १०० इटलीच्या नागरिकांना घेऊन इटलीला रवाना झाले.

बुधवारी सकाळी आलेल्या पहिल विमानातून १६८ खलाशी, संध्याकाळी आलेल्या दुसर्‍या विमानातून १६७ तर रात्री उशिरा आलेल्या तिसर्‍या विमानातून ८० खलाशी दाखल झाले.
दाबोळी विमानतळावर करण्यात आलेल्या खास आरोग्य तपासणी व्यवस्थेद्वारे या खलाशांची तपासणी करण्यात आली.

आरोग्य तपासणी व इतर प्रक्रियेसाठी खलाशांना सुमारे चार तासांहून अधिक वेळ लागला. त्यानंतर त्यांना कळंगुट व बांबोळी येथे विलगीकरण्यासाठी पाठवण्यात आले. खलाशांना विलगीकरणासाठी घेऊन जाण्यासाठी दाबोळी विमानतळाच्या आवारात सकाळी व संध्याकाळी नऊ कदंब बस गाड्या तैनात ठेवण्यात आल्या होत्या. या प्रत्येक बसमधून २० खलाशांना नेण्यात आले.

ब्राझिलमध्ये अडकलेल्यांना घेऊन
२८, २९ रोजी दोन विमाने येणार
दरम्यान, ब्राझील येथे अडकलेल्या काही गोमंतकीय खलाशांना घेऊन दोन खास विमाने २८ व २९ मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे. यापैकी एक विमान गोव्यात तर दुसरे विमान मुंबईत उतरण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त विदेशी जहाजावर असलेले अन्य चार हजाराहून अधिक गोमंतकीय खलाशी गोव्यात येणार असल्याची माहिती गोवा सीमेन असोसिएशन ऑफ इंडियाचे संचालक अध्यक्ष डिक्सन वाझ यांनी दिली.

पुढील आठवड्यात ५ विमाने

विदेशात अडकून पडलेल्या गोमंतकीय नागरिकांना घेऊन पाच चार्टर विमाने दाबोळी विमानतळावर पुढील आठवड्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती राज्य कार्यकारी समितीला देण्यात आली आहे.
मुरगाव बंदरात एका जहाजातून २८० गोमंतकीय खलाशी लवकरच दाखल होणार आहे, अशी माहिती पोर्ट सचिवांनी राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत दिली. इटलीमधून ४१७ खलाशी खास विमानातून बुधवारी दाखल झाले.
दक्षिण आफ्रिकेत अडकून पडलेले ६८ गोमंतकीय नागरिक २२ मे रोजी खास विमानाने मुंबईत दाखल होण्याची शक्यता अनिवासी भारतीय आयुक्तालयाचे नोडल अधिकारी ऍन्थोनी डिसोझा यांनी दिली आहे.

मास्क न वापरल्याने १३ हजारांना दंड
दरम्यान, गोवा पोलीस आणि प्रशासनाने मास्कचा वापर न करणार्‍यांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. आत्तापर्यंत मास्क परिधान न करणार्‍या १३ हजार ९५७ जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या ७२८२ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.