इको सेन्सेटिव्ह झोनला सांगे येथे प्रखर विरोध

0
104

सांगे-वाडे येथे काल रविवारी झालेल्या जाहीर सभेत इको सेन्सेटिव्ह झोनला जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी आमदार प्रसाद गावकर, उपसरपंच अभिजित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार प्रसाद गावकर म्हणाले की, इको सेन्सेटिव्ह झोन हा केवळ सांगेचा विषय नसून गोव्यातील चौसष्ट गावांचा विषय आहे. २०१४साली या विषयीची सूचना केंद्र सरकारने प्रसारित करून कोणकोणते गाव या क्षेत्राखाली येणार आहेत त्याची अधिसूचना प्रसारित केली होती. पण तत्कालीन आमदार, मंत्र्यांनी या अधिसूचनेकडे दुर्लक्ष केल्याने आज हे संकट उभे राहिले आहे. गोव्यातील एकूण चौसष्ट गावांपैकी सांगे तालुक्यातील एकतीस गावांचा तर सांगे मतदारसंघातील सोळा गावांचा सहभाग असल्याचे सांगितले.

याविषयी मी विधानसभेत आवाज काढला होता पण इको सेन्सेटिव्ह झोन लागू होणारे आमदार त्यावेळी व आजही गप्प आहेत. अजूनही मी आमदार या नात्याने इको सेन्सेटिव्ह झोन लागू होणार्‍या आमदारांनी या विषयी सोक्षमोक्ष लावण्यासाठी पुढे यावे असे आवाहन करतो असे गावकर पुढे म्हणाले.

अभिजित देसाई यांनी, जून २०१९ला इको सेन्सेटिव्ह झोन संदर्भात नेत्रावळी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सरकारला पाठविला पण अद्याप त्याचे कोणी उत्तर दिले नाही. इको सेन्सेटिव्ह झोन लागू झाल्या नंतर कोणताच त्रास होणार नाही म्हणून जर कोणी सांगत असेल तर नेत्रावळीतील राजशेखर नायर आणि आशा गावस यांच्या बांधकामाच्या फाईल वनखात्याचा शेरा मारून परत कशा आल्या असा प्रश्न केला.
आनंद गावकर म्हणाले की इको सेन्सेटिव्ह झोन मुळे विकास होणार नाही. त्याची नियमावली बंधनकारक राहणार म्हणून प्रत्येकाने याला विरोध करण्याचे आवाहन केले. तसेच याच आंदोलनाच्या माध्यमातून साळावली धरणग्रस्थांचे प्रश्न धसास लावूया, असे आवाहन केले.

चंदन उडेलकर यांनी स्वागत केले. अनिल काकोडकर यांनी सूत्रसंचालन तर सतीश गावकर यांनी आभार मानले.