भारताला जागतिक चित्रपटासाठीचे केंद्र बनवणे हे भारत सरकारचे उद्दिष्ट असून त्यासाठी चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनसाठी लागणार्या सगळ्या साधनसुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत आहे. असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी काल स्पष्ट केले. काल इफ्फीत इंडियन पॅनोरमा विभागाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
पुढे बोलताना त्यांनी, भारतातील प्रादेशिक चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान मिळावे यासाठी काय करता येईल, यासंबंधीच्या सूचना संबंधितांनी केंद्र सरकारला कराव्यात असे आवाहन केले.
यावेळी पुढे त्यांनी इंडियन पॅनोरमा विभागासाठी दर्जेदार व अभिजात अशा चित्रपटांची निवड केलेल्या ज्युरी मंडळाचे कौतुक केले. या विभागासाठी येणार्या शेकडो चित्रपटातून मोजक्या अशा दर्जेदार चित्रपटांची चोखंदळ अशा प्रेक्षकांसाठी निवड करणे हे सोपे काम नसल्याचे ते म्हणाले. काही दर्जेदार चित्रपटांची निवड करताना काही चांगले चित्रपट नाकारण्याचे कठीण कामही ज्युरी सदस्यांना करावे लागत असल्याचे ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. चित्रपटाचा विषय व त्याची कथा ही उच्च दर्जाची असली तरच चांगला चित्रपट निर्माण होऊ शकतो, असे सांगून त्यावर भर देण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी प्रमख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बोलताना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले की आमच्या समाजात ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचे व समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम चित्रपटांद्वारे होत असते. भविष्यातील भारताचे प्रतिबिंबही चित्रपटांतून दिसावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. इंडियन पॅनोरमाच्या फिचर आणि नॉन फिचर चित्रपटांसाठीच्या ज्युरींचा यावेळी सन्मान करण्यात आला.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंदा यांनी आतापर्यंतच्या भारतीय चित्रपट महोत्सवांचा थोडक्यात आढावा घेतला. योवेळी अनुराग ठाकूर व राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते ज्युरी सदस्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई हेही उपस्थित होते.