कॉंग्रेसच्या काही उमेदवारांची डिसेंबरमध्ये घोषणा

0
23

>> गिरीश चोडणकर यांची माहिती

>> जास्तीत जास्त नवीन चेहर्‍यांना संधी

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काही मतदारसंघातील कॉंग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली जाणार आहे. कॉंग्रेस पक्षाकडून ७० ते ८० टक्के नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाणार आहे, अशी माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल पणजी येथे कॉंग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आगामी निवडणुकीसाठी आघाडीबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय घेतला जाणार आहे. आपण केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आघाडीसंबंधीचा प्रस्ताव ऐकून घेऊन वरिष्ठांसमोर मांडलेला आहे. आपण पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम करीत आहे. निवडणूक आघाडीबाबत निर्णय घेण्यासाठी वेगळी समिती नेमण्यात आलेली आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.
कॉंग्रेस पक्षाच्या गट समित्यांकडून नावांची शिफारस केली जाणार आहे. त्यानंतर राज्य आणि जिल्हा पातळीवरील समिती उमेदवारांच्या नावाच्या शिफारस केंद्रीय समितीकडे करण्यात येणार आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादीसोबत युतीचा
निर्णय केंद्रीय समितीकडे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांचा कॉंग्रेससोबत युतीचा प्रस्ताव मी ऐकून घेतला आहे. आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याचा काय प्रस्ताव आहे तो ऐकून घेऊन आम्हाला कळवा असे सांगितल्याने त्यांचा प्रस्ताव सध्या ऐकलेला आहे. त्यांचा प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवलेला आहे. राष्ट्रवादीसोबत युती करायची की नाही याचा निर्णय केंद्रातील ज्येष्ठ नेते घेणार असल्याचे यावेळी चोडणकर यांनी सांगितले.

युतीचा प्रश्‍न ज्येष्ठ नेत्यांकडे
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असेल वा इतर समविचारी पक्ष किंवा ज्यांना कॉंग्रेससोबत युती करायची आहे अशा सर्वच बाबतीत युतीची चर्चा सध्या आमचे ज्येष्ठ नेते करत आहेत. आपण सध्या पक्ष मजबूत आणि संघटित करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे यावेळी चोडणकर यांनी स्पष्ट केले.

इफ्फीत पत्रकारांना प्रवेश
नाकारणे हे दुर्दैवी
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) उद्घाटन सोहळ्याला स्थानिक पत्रकारांना प्रवेश नाकारणे दुदैवी आहे. कॉँग्रेस पक्ष सरकारच्या या कृतीचा निषेध करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकाराबाबत पत्रकारांची माफी मागितली पाहिजे. तसेच, इफ्फीच्या समारोप समारंभात सहभागी होण्यास मान्यता द्यावी. अन्यथा कॉंग्रेस पक्षाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा चोडणकर यांनी दिला.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, गोवा मनोरंजन संस्था यांनी या प्रकाराबाबत जनतेची माफी मागितली पाहिजे. इफ्फीचा फायदा केवळ भाजप कार्यकर्त्यांना कसा होईलयाकडेच केंद्र व राज्यसरकारने लक्ष दिले आहे. इफ्फीतून स्थानिक चित्रपटांना वगळलेले अशल्यामुळे स्थानिकांना इफ्फीचा काहीच फायदा नसल्याचे चोडणकर यांनी यावेळी सांगितले.