>> रियान ब्रीवस्टरची हॅट्ट्रिक
रियान ब्रीवस्टर याच्या सनसनाटी हॅट्ट्रिकच्या बळावर इंग्लंडने संभाव्य विजेत्यांत स्थान देण्यात आलेल्या ‘सांबा बॉईज’ ब्राझिलला ३-१ असे पराजित करत फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच धडक दिली. ब्रीवस्टरने सलग दुसर्या सामन्यात हॅट्ट्रिक नोंदवत जादुई खेळाचे दर्शन घडविले. अमेरिकेविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंग्लंडने ४-१ अशा मिळविलेल्या विजयात त्याने हॅट्ट्रिक नोंदविली होती. कोलकातामधील प्रेक्षकांचा ब्राझिलला पाठिंबा असताना याची पर्वा न करता ब्रीवस्टरने १०व्या, ३९व्या व ७७व्या मिनिटाला गोल नोंदवून ६३,८८१ लोकांना स्तंभित केले. लिव्हरपूलच्या युवा संघातर्फे खेळणार्या ब्रीवस्टरने कालच्या हॅट्ट्रिकसह या स्पर्धेतील आपली गोलसंख्या सात केली आहे.
फिफा अंडर १७ विश्वचषक स्पर्धेच्या एका पर्वात दोन हॅट्ट्रिक नोंदविणारा ब्रीवस्टर हा जगातील पहिलाच खेळाडू आहे. ब्राझिल संघाचा एकमेव गोल वेस्ली याने २१व मिनिटाला नोंदविला. इंग्लंडने प्रतिकुल परिस्थितीतही तांत्रिकदृष्ट्या सरस खेळाचे दर्शन घडवतानाच परिस्थितीनुसार वेळोवेळी रणनीती बदलून ब्राझिल संघाला भांबावून सोडले. केवळ चौथ्यांदा या स्तरावरील विश्वचषकात खेळूनही इंग्लंडने इतिहास रचला होता. परंतु, काल त्यांनी अजून एक पाऊल टाकताना जेतेपदाच्या सामन्यात स्थान प्राप्त केले. चेंडूवर ताबा राखण्याच्या बाबतीत ब्राझिल व इंग्लंडच्या संघात किंचित फरक होता. परंतु, फिल फोडेन, कॅल्लम हडसन ओडोय व ब्रीवस्टर या इंग्लंडच्या त्रिकुटाने ब्राझिलच्या बचावफळीला उसंत घेण्याची संधी दिली नाही. इंग्लंडने केवळ पाच फटके गोलजाळीच्या दिशेने लगावले. या तुलनेत ब्राझिलने ९ वेळा इंग्लंडच्या गोलक्षेत्रात धडक दिली. परंतु, ‘फिनिशिंग टच’ देण्यात ब्राझिलचा संघ कमी पडला.