आश्‍वासनांची खैरात करणारा भाजपचा जाहीरनामा पंतप्रधान मोदींहस्ते जाहीर

0
84

‘संकल्पित भारत, सशक्त भारत’ या घोषवाक्याखालील विविध अशा सुमारे ७५ आश्‍वासनांची खैरात करणारा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा भाजपने काल प्रकाशित केला. गतीमानतेने राम मंदिर उभारणी, घटनेतील जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द करणे या महत्त्वाच्या आश्‍वासनांचा समावेश असलेला हा ४५ पानी जाहीरनामा प्रकाशित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावर तपशीलवार भाष्य केले. २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविणे हा भाजपच्या जाहीरनाम्याचा हेतू असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्याचे लक्ष्य या जाहीरनाम्यात ठेवण्यात आले असून अयोध्येतील राम मंदिराची उभारणी वेगाने करणे, निग्रहपूर्वक दहशतवादाचा बिमोड, शेतकर्‍यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ, २०३० पर्यंत भारताला जगात आर्थिकदृष्ट्या तिसर्‍या क्रमांकाचा देश बनविणे, जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० वे कलम रद्द करणे अशा आश्‍वासनांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, विदेश व्यवहारमंत्री सुषमा स्वराज, वित्तमंत्री अरुण जेटली, भाजपाध्यक्ष अमित शहा आदी उपस्थित होते.

जीएसटीत सुलभता
या जाहीरनाम्यात जीएसटी कर पद्धतीत सुलभता आणण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. या क्षेत्रातील सर्व संबंधितांशी चर्चा करून याविषयी कृती केली जाणार असल्याचे त्यात म्हटले आहे.