आशीर्वादाचा हात देणारी ‘आत्या’

0
654

संदीप मणेरीकर

माणूस म्हटलं की नात्यांचा गोतावळा येतोच. नात्याची सुरुवात आईपासून होते. मग बाबा, भाऊ, बहीण, काका… अशी काही नाती वडिलांच्या बाजूने असतात तशीच आईच्याही बाजूने मामा, मामी, मावशी अशी नाती आपुुलकीचा संवाद साधतात. साधारण नाती तीच असतात म्हणजे आई किंवा बाबांचा भाऊ, बहीण वगैरे. फक्त नावं वेगळी. फक्त आजी आणि आजोबा ह्या नात्यांची नावं मात्र सारखीच असतात. शक्यतो आपला ओढा आईच्या बाजूच्या नात्यांकडे जास्त असतो. अर्थात याला अपवाद असतीलही. पण सहसा बघितल्यास काकापेक्षा मामा, आत्यापेक्षा मावशी, वडिलांकडून आजी-आजोबांपेक्षा आजोळच्या आजी-आजोबांकडे नेहमीच ओढा राहिलेला असतो.

‘माय मरो मावशी उरो’ सारखी म्हण याची साक्ष देते.
माझी एक आत्या नुकतीच देवाघरी गेली आणि मग आत्याविषयी विचार मनात आले. त्यावेळी असं लक्षात आलं की, आत्या ही माहेरी असते त्यावेळी तिचं त्या घरात महत्त्व असतं. विवाहानंतर ती दुसर्‍या घरी जाते. भावाला मुलं होतात. ती आत्या होते. भावाला मुलगी झाली की आत्याचं महत्त्व कमी होत जातं. कधी कधी तर असंही होतं की, आत्या आपल्या मुलांना घेऊन माहेरी म्हणून येते आणि त्याचवेळी आई आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेलेली असते. त्यामुळे त्यांची भेटच होत नाही. मात्र एक.. जशी आई आपल्या मुलांना घेऊन माहेरी जाते तसे वडील आत्याकडे मुलांना घेऊन जात नाहीत. त्यामुळेही आत्याकडचा भाच्यांचा ओढा कमी होत असावा.

बर्‍याच घरात असंही असतं की आई आणि आत्या यांचं एकमेकांशी जास्त पटतही नाही. (अर्थात यालाही अपवाद आहेत) नणंद भावजय यांचं सख्य जुळल्याचं कुठल्या चित्रपटातही दाखवलेलं नाही. उलट त्यात नणंद कशी फोडणी देते याचंच चित्रीकरण केलेलं दिसतं. त्यामुळे याचाही परिणाम भाच्यांवर होत असावा आणि त्यामुळे आत्या ही नावडती होत जात असावी.

माझी ही आत्या गोव्यातली. ही तिच्या भावंडात सर्वात मोठी. ज्यावेळी ती आमच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी यायची तेव्हा घर एकदम भरून जायचं. एक मोठी, ज्येष्ठ व्यक्ती घरात आल्यामुळे घरालाही एक पोक्तपणा आल्यासारखा वाटायचा. त्यात तिचं बोलणं हे कोकणी हेल काढून असायचं. त्यामुळे तिचं येणं आनंददायी वाटायचं. घरी होत असलेल्या धार्मिक कार्याला दोन-चार दिवस अगोदर येऊन दोन-चार दिवसांनी जाणारी ही आत्या लहानपणापासून आमची आवडतीच होती.

मुळात आत्या हे व्यक्तिमत्त्वच प्रौढ, धीरगंभीर, सागराप्रमाणे, वटवृक्षासारखं वाटतं. याच्या उलट मावशी ही अल्लड, खळखळता झरा. पायांना वाकून आदराने नमस्कार करावा तर आत्याला आणि खांद्यावर हात ठेवावा तो मावशीच्या. हिरवागार निसर्ग पाहिला की मावशी आठवावी आणि धीरगंभीर निळं आकाश पाहिलं की आत्या आठवते. मैत्रीचा हात पुढे करावा मावशीने आणि आशीर्वादासाठी हात उंचवावा तो आत्याने. मावशीसोबत आपण खेळ खेळतो पण आत्यासोबत देवांची स्तोत्रं, पाढे… मला वाटतं, आपल्यावर जे संस्कार झाले ते आपल्या भाचरांवरही व्हावेत हीच आत्याची अपेक्षा असते. त्यामुळे लग्नापूर्वी ती भाच्यांना जीव लावते व त्यांच्यावर चांगले संस्कार करते.