>> लखीमपूर खीरी हिंसाचारप्रकरण
लखीमपूर खीरी हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्रासह शेतकर्यांविरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. लखीमपूरमधील आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकर्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकर्यांनी केला आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी, हिंसाचार झाला तेव्हा त्यांचा मुलगा घटनास्थळी नव्हता. असा दावा केला आहे.
या हिंसाचाराविरोधात पंजाबमधील कॉंग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी आंदोलन केले मात्र त्यांना चंदिगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंजाबमध्ये राज्यपाल भवनबाहेर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नवज्योत सिंग सिद्धूंच्या नेतृत्वात आंदोलन केले.
या कुटुंबीयांना ४५ लाख ः योगी
उत्तर प्रदेश सरकारने हिंसाचारात बळी पडलेल्या चार शेतकर्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई तसेच जखमींना १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल. तसेच पीडितांच्या कुटुंबातील एका सदस्याला नोकरी दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.