राज्यात २३०० मतदान यंत्रे दाखल

0
35

>> मुख्य निवडणूक अधिकार्‍यांची माहिती, राजकीय पक्षांसोबत चर्चा

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. कुणाल यांनी राज्यात २३०० नवीन ईव्हीएम मशीन्स व व्हीव्हीपॅट दाखल झाल्याची माहिती काल दिली. काल राज्य निवडणूक अधिकार्‍यांनी राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण सावंत, आयशा वायंगणकर, संगीता नाईक, सुदेश गावडे आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लवकरच हाती घेण्यात येणार्‍या खास उजळणी २०२२ कार्यक्रमासंबंधी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच छायाचित्रात्मक तत्सम नोंदी (पीएसई) हटविण्याचा विषय, मतदार हेल्पलाइन ऍपची वैशिष्ट्ये, शेवटच्या बैठकीत उपस्थित झालेल्या समस्यांचे निराकरण, २४- मुरगांव विधानसभा मतदारसंघ बीएलओची बदली, बीएलएसाठी ओळखपत्र आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीच्या प्रथम स्तरावरील तपासणीवरही चर्चा झाली.
कुणाल यांनी, सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना जिल्हा स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्याची विनंती केली. जेणेकरून निवडणूक यंत्रणा त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी समन्वय साधू शकेल. श्री. कुणाल यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार हेल्पलाईन ऍपची माहिती दिली.
यावेळी अपंग व्यक्तींवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांग व्यक्तींची काळजी घेण्यासाठी ५३० दिव्यांग मित्रांची नेमणूक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनच्या अद्ययावत एम३ मशीन वापरल्या जातील अशी माहिती दिलीे. श्री. कुणाल यांनी बूथ लेव्हल एजंट नेमून सर्व राजकीय पक्षांनी उजळणी प्रक्रियेत सहकार्य देण्याचे आवाहन केले.

मतदार याद्यांचे वेळापत्रक
यावेळी या बैठकीत मतदार याद्यांविषयी वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. त्यानुसार १ नोव्हेंबर २०२१ रोजी मतदार याद्यांचा मसुदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती व दाव्यांसाठी १ ते ३० नोव्हेंबरर्पंत मुदत देण्यात आली आहे. बीएलओंची विशेष मोहीम २० व २१ नोव्हेंबर आणि २७ व २८ नोव्हेंबर या काळात राबवण्यात येेईल. दावे केलेले सर्व अर्ज २० डिसेंबर रोजी निकाली काढण्यात येतील तर दि. २० जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दरम्यान, राज्यात दाखल झालेली सर्व ईव्हीएम मशीन्स उत्तर व दक्षिण गोव्यात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. त्यांची प्राथमिक स्तरावरील तपासणी २६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे यावेळी कुणाल यांनी सांगितले.

राजकीय पक्षांची स्तुती
सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदान वाढविण्याच्या प्रयत्नांसाठी आणि मतदारांत जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्तम कार्य केले असल्याचे श्री. कुणाल यांनी सांगितले.

बैठकीला कॉंग्रेसचे अल्तिन्हो गोम्स, भाजपचे पुंडलिक राऊत देसाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अविनाश भोसले, मगोपचे गौरव नाईक आणि गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत आदी उपस्थित होते.