Home बातम्या आल्मेदा हायस्कूल : एक उज्ज्वल यशोगाथा

आल्मेदा हायस्कूल : एक उज्ज्वल यशोगाथा

0

– सतीश दत्ताराम दळवी, पराग हाउसिंग को – ऑपरेटीव्ह सोसायटी, शांतीनगर, फोंडा

दि. २ ऑक्टोबर २०११ या दिवशी गोवा विद्याप्रसारक मंडळ आणि ए. जे. दी आल्मेदा विद्यालय, फोंडा यांना शंभर वर्षे पूर्ण झाली. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या एका संस्थेला आणि त्यांनी चालवलेल्या शाळेला शंभर वर्षे पूर्ण होणे, ते सुद्धा शंभर वर्षांत सहा पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळा, पाच माध्यमिक शाळा, एक उच्च माध्यमिक आणि दोन महाविद्यालये एवढा मोठा वृक्ष तयार करणे, त्यांना गोव्यातच नव्हे तर देशात व देशाबाहेरही मानाचे स्थान प्राप्त करून देणे हे संस्थाचालक व त्यात काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना भूषणावह आहे.

पण हा मानाचा पाट ह्या शाळेला व संस्थेला सहजासहजी मिळालेला आहे काय? जसे एखाद्या व्यक्तीला काट्याकुट्यांतून चालून ध्येयापर्यंत पोचावे लागते, तसेच ह्या शाळेला व संस्थेला किती तरी बर्‍यावाईट प्रसंगांना धीराने तोंड देत तावून सुलाखून आज गोव्यात व गोव्याबाहेर शिक्षणक्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त केलेले आहे.

गोवा विद्याप्रसारक मंडळ तथा आल्मेदा हायस्कूल स्थापनेच्यावेळी दादा वैद्य श्री. शांबाराव कृष्णाजी सूर्यराव सरदेसाईंना म्हणाले होते, ‘‘अज्ञानांनी सज्ञान व्हावे, निरक्षरांनी साक्षर व्हावे, साक्षरांनी सुशिक्षित व्हावे, सुशिक्षितांनी विचारवंत व्हावे, विचारवंतांनी आचारवंत व्हावे व आचार-विचारवंतांनी अज्ञान, दारिद्य्र व सामाजिक दौर्बल्य हे समाजास ग्रासणारे तीन शत्रू, त्याविरूद्ध सामना देऊन विजय मिळवावा, अशा माझ्या आकांक्षा आहेत.’’

समाज सुधारणेचे हे व्रत घेऊन दादा वैद्य आयुष्यभर वावरले. ह्याच समाजसुधारणेचे एक पाऊल म्हणजे शिक्षणाचा प्रसार. १९१० त पोर्तुगालमध्ये क्रांती होऊन ‘प्रजासत्ताक’ स्थापन झाले. तिथल्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते डॉ. आंतोनियु जुजे द आल्मेदा ह्यांच्या प्रयत्नाने गोव्यातल्या ख्रिश्चनेतरांना सुद्धा धार्मिक, भाषिक व नागरिक हक्क प्राप्त झाले. त्याचाच लाभ उठवून दादांनी गोवा विद्याप्रसारक मंडळ स्थापन केले. ह्या संस्थेमार्फत संपूर्ण गोव्यात शिक्षण प्रसाराबरोबरच राष्ट्रीयत्वाची भावना रूजविण्याचा सुप्त हेतू होता असे दिसते. सुरूवातीला अशी शाळा त्यांनी फोंड्यात काढली. ह्या धाडसी कार्यात त्यांना दोन समविचारी, सेवाभावी माणसांची न भूतो न भविष्यती अशी साथ लाभली. ते म्हणजे श्री. सीताराम विश्वंभर केरकर आणि श्री. विनायक रामचंद्र सरज्योतिषी. ज्या नेत्याच्या प्रयत्नामुळे गोव्यातील ख्रिश्चनेतर जनतेला ‘स्वातंत्र्य’ प्राप्त झाले, त्याची चिरंतन आठवण रहावी ह्या उद्देशाने शाळेला ‘कॉलेजीयु आतोनियु जुजे द आल्मेदा’ नाव ठेवले.

शिकून सवरून राष्ट्रीय विचारसरणीचे समाजसुधारक तरूण गोव्याला मिळतील, जे स्वतःच्या पायावर उभे राहून ताठ मानेने गोव्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावतील अस स्वप्न दादा पाहात होते अस दिसून येते. ह्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातून (पुण्याहून) भूमिगत स्वातंत्र्य सैनिक सर्वश्री दत्तात्रय विष्णू आपटे, हरी गणेश फाटक, श्रीधर अनंत घारे शास्री व जयकृष्ण नारळे ह्याची शिक्षक म्हणून सुरूवातीच्या काळात नेमणूक केली होती. पुस्तकी ज्ञानाबरोबरच ‘कार्यानुभवा’चे महत्त्व त्यांना माहीत होते म्हणून त्यांनी सुरूवातीला सुतारकाम हा विषय लावला व त्याला लागणारे सारे सामान उपलब्ध केले गेले. श्री. जयकृष्ण नारळे यांचा ह्या विषयात हातखंडा होता.

या शाळेचे काही वर्ग सुरूवातीला फोंड्यात वरच्या बाजारात ज्याला त्या काळात ‘कसबा’ म्हणून संबोधत, तिथे कायतानु फ्रांसिस्कु पिन्तु (नंतर ते घर शंभू आत्मानंद शेणवी उसगांवकर ह्यांचे झाले) ह्यांच्या घरात भरत असत. प्रशस्त माळी असलेले हे मोठे घर होते. काही वर्ग कांसार (श्रीवंत) ह्यांच्या घराच्या माडीवर भरत. दोन्ही घरे कसबा वाड्यावर शेजारी शेजारी होती. १९१२-१४ च्या दरम्यान कसबा येथे देवीची साथ पसरल्यामुळे शाळा सर्व वर्गांसह कपिलेश्वरी येथे श्री कपिलेश्वरी देवस्थानच्या अग्रशाळेत हलविण्यात आली. दोन वर्षांत ती परत फोंड्यात आली. दादांनी आपले खडपाबांध येथील घर व परिसर शाळेला दान केला होता.

त्या काळी फोंड्यात लोकवस्ती फार थोडी होती. त्यात शिक्षणाची गरज ओळखलेले क्वचित- जास्त करून काही ब्राह्मण समाजातील कुटुंबे. अशा परिस्थितीत शाळा चालवायची कशी? सीताराम केरकर व इतरांनी ह्यावर तोडगा काढल्याचे दिसून येते. त्यांनी प्रचार तंत्र वापरले. त्या काळी उपलब्ध असलेल्या सगळ्या मार्गांचा उपयोग करून गोवाभर राष्ट्रीय शाळेचा प्रचार सुरू केला. त्यामुळे गोव्याच्या कानाकोपर्‍यातून पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी आल्मैद कॉलेजमध्ये भरती करू लागले. आता ह्या सगळ्यांना शाळेत प्रवेश द्यायचा झाला तर त्यांच्या रहाण्याचा, खाणा-जेवणाचा प्रश्‍न हाताळावा लागणार. त्याकाळी आताच्या प्रमाणे वाहतुकीची व्यवस्था नव्हती की, हॉटेलची सोय नव्हती. ज्यांचे नातेवाईक फोंडा किंवा जवळपास राहात, त्यांच्याकडे आपल्या पाल्यांची व्यवस्था करत. बाकीच्यांचे काय? संस्थाचालकांनी त्यांच्यासाठी वसतीगृहाची योजना राबविण्याचे ठरविले. पण इथेही शाकाहारी – मांसाहारीचा प्रश्‍न आडवा आला. भट विद्यार्थी पूर्णपणे शाकाहारी, तर सारस्वत ब्राह्मण व इतर मांसाहारी! संस्थेने दोन वेगवेगळी वसतीगृहे सुरू करून हा गुंता पण सोडवला. एक भटी वसतीगृह व दुसरे सारस्वत वसतीगृह! दोन्हीकडे उत्तम स्वयंपाक करणार्‍या वयस्क स्त्रियांची नेमणूक केली होती. संस्थाचालकांच्या प्रचारतंत्राच्या परिणामस्वरूप गोव्याच्या कानाकोपर्‍यांतून झालेल्या पालक प्रबोधनाची साक्ष विद्यार्थ्यांच्या नावांवरून आपल्याला दिसून येते. नमुन्यादाखल काही नावेः

विष्णू रूद्राजी गुडे, विश्वनाथ अनंत बाळे, मुकुंद नारायण कीर्तनी, व्यंकटरमण पुरूषोत्तम सुकेरकर, पुंडलिक दत्तात्रेय गायतोंडे, पुरूषोत्तम के. काकोडकर, लक्ष्मीदास बाळकृष्ण खलप, दिगंबर नगरसेकर, शिवराम भास्कर प्रतापराव सरदेसाई, मधुकर शिरोडकर, मलबा सूर्याराव सरदेसाई, महेश्वर यज्ञेश्‍वर संझगिरी, सुब्राय महादेव दळवी, शिवराम विनायक खांडेपारकर, नरसिंहसरस्वती विष्णू वेलींगकर, पांडुरंग दत्ता तिंबले.

शाळेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती, गोवाभर चाललेली त्याची ख्याती काही भल्या माणसांना सोसवत नव्हती असे दिसते. कुणी चांगले कार्य करण्यासाठी पुढे आल्यास त्याचे पाय ओढण्याचे कार्य तेव्हा चालत होते. आल्मेदा विद्यालयाबद्दल खोटे-नाटे आरोप-प्रत्यारोप त्या काळच्या एका नावाजल्या नियतकालिकातून होऊ लागले. पण त्या सगळ्या आरोपांना त्या वेळचे गोवा विद्याप्रसारक मंडळाचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष श्री. डॉ. बाळकृष्ण उर्फ बुलबुल साखरदांडे चोख प्रत्युत्तर देऊन तोंड बंद करायचे. डॉक्टरसाहेबांच्या, (व त्याच्या पूर्वीच्या व आजपर्यंतच्या) कार्यकारी मंडळाने शिक्षकांच्या निवडीबाबत सदैव चोखंदळपणा दाखवलेला असल्याने व शाळांच्या अडीअडचणीत वेळींच जातीने लक्ष पुरविल्यामुळे अशा खोडसाळ आरोपांना ते रोकठोकपणे उत्तरे देऊ शकले (व आजही मंडळ छातीठोकपण देऊ शकते). आपआपल्या विषयात निपुण असलेले, शिकविण्यात रस असलेले, विद्यार्थ्यांविषयी आपुलकी व शिक्षकी पेशात बांधिलकी असलेले, त्याचबरोबर ‘राष्ट्रीय शाळे’च्या ध्येयाकडे नेणारे शिक्षक हेरून शाळेत घेतले जायचे. असे चित्र शिक्षकांच्या नांवावरून नजर फिरविल्यास दिसून येते.

हे शिक्षक देखील वसतीगृहातच राहात असल्याकारणाने एक प्रकारे गुरूकुल पद्धतीने शिक्षण चालायचे असे म्हणल्यास वावगे होणार नाही. अर्थातच विद्यार्थी व शिक्षक ह्यांचा चोवीस तास संपर्क असणे स्वाभाविक. त्या काळचे शिक्षक शिक्षकी पेशाकडे बांधील असल्यामुळे त्यांच्या वागण्या – बोलण्याचा योग्य तो परिणाम विद्यार्थ्यांवर कळत न कळत झाल्याशिवाय कसा राहाणार? वर दिलेली काही विद्यार्थ्यांची नावे पाहिल्यावर आपल्या ध्यानांत आलेच असेल की, बहुतेकांनी नंतर आपआपल्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेले आहे. उदाहरणार्थ, पुंडलिक गायतोंडे – मूळ पाळोळे – काणकोणचे. पोर्तुगालमध्ये उच्च डॉक्टरकीची पदवी घेऊन प्रख्यात शल्यविशारद बनले, पण शाळेत मिळविलेला राष्ट्रीय बाणा रक्तात भिनलेला असल्यामुळे पोर्तुगीज गव्हर्नरपुढेसुद्धा न डगमगता ‘यू प्रोतास्तो’ म्हणून सरळ आपला विरोध नोंदवून जेलमध्ये जाणे पसंत केले. ज्याच्यामुळे गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या दुसर्‍या पर्वाला सुरवात झाली.

विद्यार्थ्यांमध्ये जसे पुंडलिक गायतोंडे, पुरूषोत्तम काकोडकर, अनंत काकबा प्रियोळकर, कु. कल्याणी रामनाथकर, रवींद्र केळेकर, वेणीमाधव बोरकर, गोविंद वैद्य, मुरारी शिरोडकर, कु. प्रमिला कपिलेश्वरकरसारखे हुशार विद्यार्थी होते, तसेच एकापेक्षा एक असे उच्च दर्जाचे शिक्षक होते. (पान ६ वर)

(पान ४ वरून) सुरूवातीला खास निमंत्रणावरून पुण्याहून आलेल्या शिक्षकांव्यतिरिक्त योगदान देणार्‍यांमध्ये कितीतरी श्रेष्ठ व्यक्ती आहेत. जागेअभावी सर्वांची नावे घेणे शक्य नाही. तरीपण काहींची नावे नोंद केल्याशिवाय राहावत नाही, ती म्हणजे ः

सर्वश्री नारायण अनंत शेट बांदोडकर, गोपाळ पांडुरंग काकतकर, रघुनाथ गणेश तळवडकर, नोगार प्रुदेन्तु लॉरेंसू, राजाराम दत्ताराम प्रियोळकर, लक्ष्मण श्रीपादराव सरदेसाई, कृष्णाजी उर्फ चिंतामणराव सरदेसाई, वामन बाळकृष्ण सरदेसाई, मधुसूदन पुरुषोत्तम शिरोडकर, माधव श्रीपाद वेलिंगकर, श्रीपाद यशवंत बोरकर, टी. के. गोपिनाथन नायर व एम. पी. जॉर्ज. अशा अनेक शिक्षकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत होता. डॉ. आनंद कामत हेळेकर म्हणतात, ‘‘चिंतामणराव हे नुसते शिक्षक नव्हते, ते एकूण जीवनाचेच उत्कृष्ट मार्गदर्शक (गाईड) होते’’. रवींद्र केळेकरांनी तर लिहून ठेवले आहे, ‘‘चिंतामणरावांमुळे मी पुस्तक वाचायला शिकलो’’. प्रो. नारायणराव बांदोडकरांसंबंधी कुमार मनोहर लिहितात, ‘‘विद्वत्तेजाने तळपणारी – विनोदाने खुलणारी – प्रेमळ वागणुकीने शोभणारी ती प्रोफेसरांची प्रसन्न हसतमुख-शांत मूर्ती डोळ्यांसमोर दिसते’’. वेगवेगळ्या शिक्षकांसंबंधाने अशा अनेक कथा आहेत.

अशा वातावरणात जो विद्यार्थी घडत होता, तो उच्च विचारांचा व राष्ट्रीय वृत्ती बाळगणारा, विविध क्षेत्रे काबीज करणारा निपजल्यास आश्चर्य ते का! शाळेत राष्ट्रीय वृत्तीला खतपाणी घालणारे अनेक कार्यक्रम घडवून आणीत असत. उदाहरणार्थ. वार्षिक सरस्वती पूजन, टागोर जयंती, त्या शिवाय सगळे राष्ट्रीय सण साजरे होते. लोकमान्य टिळकांच्या मरणाचा ठराव संमत केला गेला. श्री. दत्तात्रेय बाळकृष्ण उर्फ काकासाहेब कालेलकर तसेच श्रीमती विजयालक्ष्मी पंडीत शाळेला भेट देऊन गेले. त्यांच्या भेटीच्यावेळी सुंदर देखणा स्वागत समारंभ प्रामुख्याने घडवून आणला गेला. असे अनेक राष्ट्रीय वृत्ती जोपासणारे समारंभ घडवून आणले जात. पण त्याचबरोबर देखाव्यासाठी का होईना, पोर्तुगालचा रिपब्लीक दिवस पण मोठ्या दिमाखाने साजरा करायचे. परिणामस्वरूप कितीतरी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. यादी खूप मोठी आहे. काही नावे इथे देत आहे, जी आपल्या परिचयाची आहेत. डॉ. श्री. पुंडलिक गायतोंडे, सर्वश्री. पुरुषोत्तम काकोडकर, रविंद्र केळेकर, आत्माराम सावईकर, नारायण भट हुडेकर, मंगेश होडारकर, विनायक मयेकर, गुरुनाथ केळेकर, बाबुराव गांवकर, पांडुरंग कुंकळ्येकर, प्रमोद कोरडे.

अशा शाळेवर सरकारची करडी नजर नसेल तर आश्चर्य. त्यात घरचे भेदी हे असतातच. (भारताचा इतिहास हा असाच घरभेद्यांनी भरलेला आहे). सरकारी अधिकारी वारंवार शाळेला भेटी देऊन पाहाणी करू लागले. ह्यामुळे शाळेला व पर्यायाने संस्थेला दुर्धर प्रसंगांस सामोरे जावे लागले. पण सगळ्या पेचप्रसंगातून तावून सुलाखून संस्था आणि शाळा बाहेर पडली. तरी सुद्धा सरकारच्या कडक निर्बंधांचा ससेमिरा चालूच होता.

जेव्हा मानुयेल आंतोनियु व्हासाल्व्हु सिल्व्हा गोव्याचे गव्हर्नर जनरल झाले, तेव्हापासून आल्मेदा हायस्कूलला सुगीचे दिवस आले. तोपर्यंत शाळेची विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढलेली होती. समाजातील सर्व थरांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व जाणवू लागलेले होते. दादांनी दिलेले घर अपुरे पडत होते व नव्या इमारतीची गरज भासू लागली होती. अशावेळी गव्हर्नर व्हासाल्व्हू सिल्व्हांनी शाळेला भेट दिली. ह्याच भेटीची संधी साधून शाळा संस्था चालकांनी शाळेची कैफियत त्यांच्या कानावर मोठ्या खुबीने घातली. त्यांनी ताबडतोब इमारतीची जबाबदारी स्विकारली. पण त्यासाठी लागणारी जागा उपलब्ध करून देण्याची व फंड उभारण्याच्या तयारीला लागण्यास सांगितले.

दादांनी शाळेला दिलेल्या घराशेजारी ५००० चौ.मीटर जागा शिल्लक होती. पण नव्या इमारतीसाठी सरकारची अट होती. ती म्हणजे इमारत व खेळासाठी पटांगण मिळून कमीत कमी १०,००० चौ.मीटर जागा उपलब्ध पाहिजे. त्यासाठी शाळेच्या ५००० चौ. मीटरच्या शेजारील एका ख्रिश्चनची ५००० चौ. मीटर जमीन संस्थेने घेऊन एकंदर १०,००० चौ. मीटर जमीन उपलब्ध केली. गव्हर्नर जनरलनी ‘गाबिनेत द इस्तादुश इ ऑब्रश’तर्फे इमारत बांधून दिली. त्यासाठी लागणारा फंड अर्ध्याअधीक प्रमाणात समाजातील सर्व थरातील लोकांकडून, अंत्रुजातील देवालयांकडून, तसेच फोंडा म्युनिसीपालीटी कवळे मठेधिशानी दिलेल्या देणगीतून उभा केला. राहिलेली रक्कम स्वतः गव्हर्नर साहेबांनी गाबिनेत मधून व अंत्रुज महालातील कोमुनिदादीतर्फे भरून काढली.

२ ऑक्टोबर १९६१ ह्या दिवशी तळमजल्याचे उद्घाटन स्वतः गव्हर्नर साहेबांच्या हस्ते झाले. त्यावेळी वरच्या दोन मजल्यांचे बांधकाम चालू होते. कदाचित संस्थाचालकांना येऊ घातलेल्या राजकीय बदलाची कूणकूण लागली असावी व त्यासाठी त्यांनी घाई करून गव्हर्नर जनरल व्हासाल्व्हू सिल्व, ज्यांनी संस्थेला संपूर्ण सहकार्य करून शाळा इमारतीची संपूर्ण जबाबदारी घेतली व त्याशिवाय फोंड्याच्या चौकात दादा वैद्यांचा पुतळा उभा केला, त्यांच्याच हस्ते त्या इमारतीचे उद्घाटन होणे उचित जाणले असेल. आज गोव्यात सर्वांत मोठ्या गणल्या जाणार्‍या या शाळेत ५० वर्ग भरतात, २५०० विद्यार्थी विद्यार्जन करतात व ७५ शिक्षक शिकवतात.