आरोग्य मंथन अखंड सावधान रे …

0
194
  •  प्रा. रमेश सप्रे

म्हातारपण एखाद्या वाघिणीसारखं पुढे येऊन भीती दाखवतंय; रोग देहावर शत्रूप्रमाणे हल्ले (प्रहार) करीतच आहेत आणि आयुष्य तर फुटक्या (गळक्या) घड्यातील पाण्यासारखं पाझरून संपतंय तरीही बहुसंख्य लोक निर्भयपणे अहिताच्या (आरोग्याला वाईट) गोष्टींचं आचरण करतच राहतो हे आश्चर्यच नाही काय?

महाभारतातील भीष्मप्रतिज्ञेचा पूर्वार्ध आपल्याला ठाऊक असतो. गंगा- शांतनू यांचा तेजस्वी पुत्र देवव्रत यानं आपल्या पित्याचा विवाह होऊन त्याला मनःशांतीचा लाभ व्हावा यासाठी सत्यवतीच्या पित्यानं दाशराजानं घातलेली अट मान्य केली. ही मान्य करताना त्यानं दोन प्रतिज्ञा केल्या- एक ः मी स्वतः कधीही हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर हक्क सांगणार नाही. दोन ः पुढे माझ्या मुलांनीही असा हक्क सांगू नये, म्हणून मी विवाहबद्ध होणार नाही. या वज्रनिर्धारानं प्रतिज्ञा ज्यावेळी देवव्रतानं केल्या त्यावेळी आकाशातूनच नव्हे तर सर्व दिशांनी, पंचमहाभूतातून, सार्‍या सृष्टीतून प्रतिध्वनी करत ध्वनी प्रकटला- भीष्म… भीष्म… भीष्म… भीष्म! भीष्म म्हणजे उग्र, कठोर. या प्रतिज्ञेला जागून तो स्वतः अविवाहितच राहिला पण त्यांनी सत्यवतीच्या पुत्रांसाठी, पिता शांतनूच्या मृत्यूनंतर पत्नी मिळवून दिल्या.

चित्रांगदाला मृगया (शिकार) नि युद्ध याचं व्यसन होतं. अशाच एका प्रसंगी त्यानं मरण ओढवून घेतलं. सत्यवतीचा दुसरा पुत्र विचित्रवीर्य. नावाप्रमाणेच स्त्रियांच्या उपभोगाचं नि जोडीला मदिरापानासारखं जीवनरस शोषून घेणारं व्यसन होतं. या कामवासनेच्या नि मद्याच्या अतिसेवनामुळे त्याला क्षयासारखा झिजवून अंत घडवणारा रोग जडला. त्यात तो गेलाही. या दोन्ही पुत्रांना संतती होण्यापूर्वीच त्यांची जीवनं संपली. सिंहासनाला वारस उरलाच नाही.

अशा वेळी सत्यवतीनं आपल्या पुत्रासमान असलेल्या भीष्मांना तिच्यामुळे घेतल्या गेलेल्या प्रतिज्ञेतून मुक्त केलं. पण दृढनिश्चयी भीष्मांनी नम्रपणे पण ठामपणे नकार दिला. पुढे सत्यवतीच्या विवाहपूर्व झालेल्या पुत्रापासून – व्यासांपासून – संतती झाली नि महाभारतही घडलं. या इतिहासात शिरण्याचं कारण नाही.
वरील प्रसंगातून काही महत्त्वाच्या आरोग्यविषयक, जीवनोपयोगी गोष्टी स्पष्ट होतात.
* व्यसन कोणतंही आरोग्य नि जीवन यांच्या दृष्टीनं वाईटच. शिकार नि युद्ध यांचं व्यसन म्हणजे सतत मृत्यूला निमंत्रण! चित्रांगद यामुळेच.
* कामवासनेच्या अतिरेकी उपभोगामुळे, मदिरेच्या जोम नि प्राणशक्ती यांचा क्षय होतो म्हणजे जीवनाचाच क्षय होतो.
* याला विरुद्ध असं आहे भीष्मांचं आरोग्यपूर्ण दीर्घ जीवन. त्यांना वर होता इच्छामरणाचा. पण आपली दिनचर्या- ऋतुचर्या- जीवनचर्या अत्यंत नियमित व संतुलित राखून त्यांनी मिळवलं आरोग्य – तनाचं तसंच मनाचं. शरशय्येवर असताना युधिष्ठिराच्या अनेकानेक प्रश्‍नांना त्यांनी जी उत्तरं दिली, त्या निमित्तानं जो संवाद, वार्तालाप झाला त्याचीच बनली महाभारतातील दोन मोठी पर्वं- शांतिपर्व नि अनुशासन पर्व. एवढंच नव्हे तर ‘विष्णु- सहस्त्रनामा’ची रचनाही याच अवस्थेत त्यांच्याकडून केली गेली. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. हे सर्व एवढ्या तपशीलानं सांगण्याचा उद्देश आरोग्य नि जीवनातील शिस्त यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करणं.

महाभारतात अनेक व्यासमहर्षींनी आरोग्यविषयक उपयुक्त मार्गदर्शन केलंय. धनवान (सत्तावान, शक्तिमान) माणसाचा सर्वनाश घडवणार्‍या घटकांचा उल्लेख करताना म्हटलंय-
* अर्थवन्तं नरं नित्यं पंचभिर्घ्नन्ति शत्रवः|
राजा चोरश्‍च दायादा भूतानि क्षय एव च ॥
म्हणजे – राजा, चोर, संपत्तीत वाटा असणारे भाऊबंद, याचक आणि क्षयरोग हे पाच शत्रू धनवान व्यक्तीचा नाश घडवतात. राजघराण्यातील मंडळी, धनसंपन्न मंडळी सर्व प्रकारच्या उपभोगात सतत रत असतात. उपभोग हाच त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश असतो. यामुळे शरीराला कष्ट देणारं काम त्यांच्याकडून घडत नाही; योगाभ्यास, व्यायामही ते करत नाहीत. साहजिकच धन असूनही, सारी सुखं हात जोडून समोर उभी असूनही त्यांचा उपभोग ते घेऊ शकत नाहीत. जीवनातील जोम, उमेद, शक्ती सार्‍याचा क्षय होतो.

एखादा रुग्ण निरनिराळ्या वैद्यांकडे, डॉक्टरांकडे गेला तर त्याच्या रोगाचं निदान वेगवेगळं होतंच पण रोग कसा झाला याची कारणपरंपराही प्रत्येकाची निरनिराळी असते. या संदर्भात दोन सुभाषितं चिंतन करण्यासारखी आहेत.
* वैद्या वदन्ति कफपित्तमरुद्विकारा
ज्योतिर्विदा ग्रहगतिं परिवर्तयन्ति |
भूतभिषंग इति भूतविदो वदन्ति
प्राचीनकर्मबलवन्मुनयो वदन्ति ॥
अर्थ ः वैद्य म्हणतात की कफ, वात, पित्त यांच्या प्रकोपानं (म्हणजे ते उसळल्यामुळे) रोग होतो. ज्योतिष जाणणारे सांगतात की रोग हा ग्रहगतीचा परिणाम असतो. भुतंखेतं जाणणारे (जारण मारण करणारे) म्हणतात की भुतं पिशाच्यांच्या झपाटण्यामुळे रोग होतो तर ऋषीमुनी म्हणतात की आधीच्या जन्मात केलेल्या कर्मांच्या प्रभावामुळे विविध रोग होतात.

गंमत म्हणजे रोगी वेदना सहन करतच राहतो. आजसुद्धा रक्त, मूत्र इ.च्या चाचण्यांची निरीक्षणं (पॅथॉलॉजी- रिपोर्ट) परस्परविरुद्ध असतात. एवढंच नव्हे, सगळ्या चाचण्यांचे निरीक्षण नकारात्मक असलं तरी रोगाचं नीट निदान होऊ शकत नाही. यापेक्षा काही समान कारणं रुग्णावस्थेला जबाबदार असतात. त्यांच्याबद्दल सावध राहिलं तर रोगाला प्रतिबंध होऊ शकतो किंवा तो नियंत्रणात राहतो. कोणत्या घटकांबद्दल सावधानता बाळगायला हवी-
* अपथ्याशनशीतोष्ण श्रमतापादिकारकम् |
तथाऽन्योन्यपमेक्षन्ते पापानि फलसंगमे ॥
म्हणजे- अपायकारक पदार्थांचं सेवन (भोजन), उष्णता- थंडी यांचं अधिक प्रमाण, अतिपरिश्रम, मनावरचा ताण (मनःस्ताप) किंवा अविचारानं केलेल्या कृतींचा दुष्परिणाम यामुळे होणारा पश्चात्ताप, निंदनीय कर्मं किंवा पापकर्मं यांच्यामुळे रोग निर्माण होतात. ही सर्व कारणं एकमेकाला पूरक असून रोग वाढवण्याचं काम करत राहतात.

म्हणून ही कर्मं सावध राहून, कटाक्षानं टाळली पाहिजेत. रोगाच्या बाबतीत उपाययोजनेपेक्षा किंवा इलाजांपेक्षा प्रतिबंधक उपायच महत्त्वाचे असतात. (म्हणतात ना – प्रिव्हेन्शन इज् बेटर् दॅन् क्युअर्) आणि असे उपाय आपले आपणच करायचे असतात.
अध्यात्मरामायणात एक महत्त्वाचा श्‍लोक आहे.
* सुखस्य दुःखस्य न कोऽपिदाता परो ददातीति कुबुद्धिरेषा |
अहं करोमीति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रप्रथितो हि लोकः ॥
अर्थ – सुख- दुःख म्हणजे आरोग्य आणि रोग दुसरा कोणी आपल्याला देत नाही, त्याचप्रमाणे सारं काही मीच करतो, सारं माझंच कर्तृत्व आहे हा कर्तेपणाचा अभिमानही खोटा आहे. थोडक्यात, सुखदुःख, निरोगी किंवा रोगी अवस्था ही आपल्याच कर्माची फळं असतात. माझ्या जीवनाचा सूत्रधार मीच असतो. (अर्थात् खरी सुत्रं त्या सर्वशक्तिमान परमेश्‍वराच्या हातातच असतात.)
भर्तृहरी नावाचा एक राजा होऊन गेला. राजभोग आणि देहसुखाचे उपभोग यांना कंटाळून त्याची वृत्ती विरक्त झाली. प्रपंचातील, राज्यकारभारातील त्याची आसक्ती कमी झाली. काव्य करण्याची प्रतिभा त्याच्याजवळ होती. म्हणून आपल्या सर्व अवस्थातल्या जीवनानुभवावर आधारित अशी प्रत्येकी शंभर श्‍लोकांची तीन शतकं त्यानं रचली. शृंगारशतक, वैराग्यशतक, नीतिशतक. या सार्‍या सुभाषितांची रचना, शब्दयोजना अतिशय मधुर आहे आणि प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित असल्यामुळे त्या सुभाषितांचा संदेश (शिकवण) आजच्या काळातही उपयुक्त आहे.

आजारी पाडणारी जीवनशैली, रोगाला आमंत्रण देणार्‍या चुकीच्या सवयी, आरोग्याला घातक अशा अन्नपदार्थात असलेली अतिरेकी रुची हे सारं टाळून उत्तम आरोग्याचा आनंद लुटण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन त्याच्या ‘वैराग्यशतका’त आहे.
हे सुभाषितसुद्धा मानवी स्वभाव दाखवणारं आहे.
* व्याघ्रीव तिष्ठति जरा परितर्जयन्ति
रोगाश्च शत्रव इव प्रहरन्ति देहम्‌|
आयुः परिस्त्रवति भिन्न घटादिवाम्भो
लोकःस्तथापि अहितं आचरतीति चित्रम् ॥

अर्थ – म्हातारपण एखाद्या वाघिणीसारखं पुढे येऊन भीती दाखवतंय; रोग देहावर शत्रूप्रमाणे हल्ले (प्रहार) करीतच आहेत आणि आयुष्य तर फुटक्या (गळक्या) घड्यातील पाण्यासारखं पाझरून संपतंय तरीही बहुसंख्य लोक निर्भयपणे अहिताच्या (आरोग्याला वाईट) गोष्टींचं आचरण करतच राहतो हे आश्चर्यच नाही काय?
हा ज्याचा त्याचा नित्याचा अनुभव आहे. दारू, बिडी, गुटखा यांचं सेवन नुसत्या रोगालाच नव्हे तर मृत्यूला बोलावण्यासारखं आहे हे माहीत असूनही व्यसनाधीन लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा व्यक्तीला म्हटलंय- ‘तो कैसा म्हणावा भला, (तो तर) आत्महत्यारा’.

आपण प्रपंचातल्या अनेक गोष्टींविषयी अतिसावध असतो. उपभोगाची साधनं, पैसा, देहाचं सौंदर्य यांची सावधानतेनं काळजी घेणारी अनेक मंडळी असतात. पण दिवस – सप्ताह- मास- वर्ष या गतीनं आयुष्य संपतंय याची दखलही कुणी घेत नाही.
* आदित्यस्य गतागतैरहरहः संक्षीयते जीवितम्
व्यापारैः बहुकार्यभारगुरुभिः कलो न विज्ञायते |
दृष्ट्वा जन्मजराविपत्तिमरणं त्रासश्च नोत्पद्यते
पीत्वा मोहमयी प्रमादमदिराम् उन्मत्तभूतं जगत् ॥
हा विचारही भर्तृहरीच्या ‘वैराग्यशतका’तलाच आहे. अर्थ सोपा आहे.

दर दिवशीच्या सूर्योदय- सूर्यास्तांनी आपलं आयुष्य कमी होत जातं. पण अनेक प्रापंचिक व्यापात नि व्यापारात गुंतून राहिल्यामुळे ते आपल्या लक्षातही येत नाही. याहिपेक्षा जन्म-म्हातारपण-मृत्यू इ. दुःखं रोज (आजुबाजूला) दिसत असूनही त्यांचा कोणताच परिणाम आपल्यावर होत नाही. याचं कारण म्हणजे असावधपणाची मोहमयी मदिरा पिऊन सारेजण उन्मत्त अवस्थेत जगत असतात. ‘मोहमयी प्रमाद मदिरा’ हा शब्दप्रयोग आजच्या मानवाच्या जीवनशैलीचं वर्णन करणारा आहे. जीवन संपतंय, मृत्यू जवळ येतोय हे लक्षात न येणं हा मोठा प्रमाद (अपराध) आपण करतो आणि उपभोगांच्या नशेच्या उन्मादात बेसावधपणे सोन्यासारख्या आयुष्याची राखरांगोळी करतो. दुर्दैव हे की जीवनाची अक्षरशः माती होतेय ही गोष्टही आपल्या ध्यानात येत नाही. जीवनमूल्यं मानवजन्माचं मुख्य ध्येय याचा विसर पडलाय. याला भागवतात नारदांच्या मुखातून ‘महान् व्यतिक्रम’ असे शब्द आलेयत. म्हणजे सारंच उलटं पालटं झालंय. समर्थ रामदासही म्हणतात त्याचा संदेशही हाच आहे- ‘अखंड सावधान रे, अखंड सावधान रे’. पण आपण ते ऐकलं पाहिजे ना?