>> पंतप्रधानांकडून आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजनेचा शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल ‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजने’चा शुभारंभ करण्यात आला. या योजनेंतर्गत आता देशवासियांना आता आधार कार्डच्या धर्तीवर ‘डिजिटल हेल्थ आयडी’ किंवा ‘हेल्थ कार्ड’ मिळेल. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित राहील. तसेच रुग्ण आणि डॉक्टर दोघेही रुग्णाच्या आरोग्यस्थितीबद्दलची माहिती घेऊ शकतील. डॉक्टर, नर्स आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांची नोंदणीही या प्रणालीद्वारे केली जाणार आहे. तसेच दवाखाने, औषधाची दुकाने, लॅबोरेटरी या प्रणालीच्या माध्यमातून नोंदणीकृत होणार आहे. त्यामुळे एकाच छताखाली देशवासियांना आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळणार आहेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आजपासून आयुष्मान भारत डिजिटल मिशन संपूर्ण देशभरात सुरू होत आहे. हे मिशन देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या उपचारांत येणारे अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
१३० कोटी आधार क्रमांक, ११८ कोटी मोबाईल सब्स्क्राईबर्स, जवळपास ८० कोटी इंटरनेट युजर्स, जवळपास ४३ कोटी जनधन बँक खाती एवढे मोठे कनेक्टेड इन्फ्रास्ट्रक्चर जगात कुठेच नाही. हे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर रेशनपासून प्रशासनापर्यंत, पारदर्शी पद्धतीने सामान्य भारतीयांपर्यंत पोहोचत आहे. आयुष्मान भारत-डिजिटल मिशन अंतर्गत देशवासियांना आता एक डिजिटल हेल्थ आयडी मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाचे हेल्थ रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित असेल, असेही मोदी म्हणाले.
योजनेचे फायदे कोणते?
हेल्थ कार्डमुळे नागरिकांना आपली आरोग्यविषयक सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.
देशाच्या कानाकोपर्यातील कुठल्याही डॉक्टरकडून उपचार घेता येतील. आहेत.
डॉक्टरांनाही हेल्थ कार्डमुळे रुग्णाची सर्व माहिती तात्काळ मिळणार.
हेल्थ कार्डमुळे संबंधित व्यक्तीला सरकारी आरोग्य योजनांचा लाभ मिळतो की नाही, हे कळेल.
या योजनेअंतर्गत नागरिकांना आधारच्या धर्तीवर एक युनिक हेल्थ आयडी मिळेल.
‘आयुष्मान भारत डिजिटल मिशन’मुळे आता देशभरातील रुग्णालये आरोग्यावरील उपचारासांठी डिजिटली एकमेकांशी जोडली जातील.
कसे आणि कुठे बनवयाचे हेल्थ कार्ड?
सरकारी रुग्णालये, सामुदायिक आरोग्य केंद्र, आरोग्य आणि कल्याण केंद्र किंवा राष्ट्रीय आरोग्य पायाभूत सुविधा नोंदणीशी संलग्न असलेले आरोग्य सेवा केंद्र एखाद्या व्यक्तीसाठी आरोग्य आयडी तयार करू शकतात. याशिवाय www://healthid.ndhm.gov.in/register वर जाऊन स्वतःची नोंदणी करून, माहिती भरून आपले हेल्थ कार्ड बनवता येईल. त्यासाठीमोबाइल नंबर आणि आधार क्रमांक आवश्यक असेल.
हेल्थ कार्डमध्ये काय काय असेल?
वैद्यकीय रेकॉर्ड संबंधित सर्व माहिती हेल्थ कार्डमध्ये नोंदवली जाईल. गेल्या वेळी तुम्हाला कुठले औषध दिले होते, त्याचा काय परिणाम झाला हे देखील कळेल. औषध का बदलले? हे उपचारादरम्यान डॉक्टरांना समजण्यास मदत करेल. दरम्यान, हेल्थ कार्ड बनवणे अजिबात सक्तीचे नाही. हेल्थ कार्ड बनवायचे की नाही, हे आपल्या इच्छेवर अवलंबून आहे.