आरोग्यवर्धक लसूण

0
37
  • मनाली महेश पवार

लसणीची पेस्ट अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. अनेक चटण्यांमध्ये, ठेच्यांमध्ये लसूण वापरली जाते. लसणाचा उपयोग फक्त पदार्थाची चव, लज्जत वाढवण्यासाठीच होतो असे नव्हे, तर लसूण ही बहुउपयोगी, आरोग्यदायी अशी वनस्पती आहे.

हजारो वर्षांपासून आपल्या भारतात लसणाचा उपयोग जेवणात केलेला पाहायला मिळतो. अनेक भाज्यांमध्ये, आमटीमध्ये, शेव, भडंग, भात इत्यादी खाद्यपदार्थांमध्ये लसणीचा फोडणीसाठी उपयोग केला जायचा. लसणीची पेस्ट अनेक पदार्थांमध्ये वापरली जाते. अनेक चटण्यांमध्ये, ठेच्यांमध्ये लसूण वापरली जाते. लसणाचा उपयोग फक्त पदार्थाची चव, लज्जत वाढवण्यासाठीच होतो असे नव्हे, तर लसूण ही बहुउपयोगी, आरोग्यदायी अशी वनस्पती आहे.

लसणाचे झुडूप २-३ फूट वाढते. खोड घट्ट, पाने अरूंद आणि चपटी असतात. या वनस्पतीच्या मुळाला लसूण कंद येतो. या कंदावर पांढरे आवरण असते. लसणीच्या लागवडीसाठी सुपीक, घुसघुशीत आणि पाण्याचा निचरा होणार्‍या जमिनीची गरज असते. त्यामुळे तिचे कंद चांगले पोसते आणि लसूण काढणे सोपे जाते. हे पीक बारामाही घेता येते.
लसूण ही अलियम (कांदा) कुटुंबातील एक वनस्पती आहे. लसणाच्या प्रत्येक भागास पाकळ्या म्हणतात. एका गड्ड्याला सुमारे १० ते २० पाकळ्या असतात. लसूण जगातील बर्‍याच भागांमध्ये वाढते व साधारणत: जगातील प्रत्येक स्वयंपाकघरात वापरली जाते. काही जैनधर्मी किंवा सत्संगी लसूण खात नाहीत. कडक वास आणि चवदारपणामुळे हा स्वयंपाकातील एक लोकप्रिय घटक आहे.

लसणीमध्ये मॅगनीज, व्हिटॅमिन बी-६, व्हिटॅमिन-सी, सेलेनियम, फायवर्सचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय त्यात सल्फर, कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह यांसारखे अनेक पोषक तत्त्व असतात. कच्च्या लसणीमध्ये ऍलिसिन हे मुख्य पोषकतत्त्व असते. या घटकामुळे लसूण औषधी गुणयुक्त बनते.

लसणाचे आरोग्यदायी फायदे
लसणाने कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. आपल्या शरीरात चांगले (एचडीएल) आणि वाईट (एलडीएल) असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते. वाईट कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट ऍटॅक, पक्षाघातासारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असणे आवश्यक असते. लसूण खाण्याने शरीरातील एलडीएल कमी होते तर एचडीएल वाढते. शरीरास हानिकारक असलेले रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. यासाठी दररोज दोन ते तीन लसूण पाकळ्या (कच्च्या) खाव्यात. औषध म्हणून उपयोग करताना लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाव्यात.

रक्तदाब नियंत्रित राहतो
हाय ब्लडप्रेशरचा त्रास असणार्‍यांनी आहारात लसणीचा वापर करावा. त्यामुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. दोन ते तीन लसूण पाकळ्या सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या रोज खाव्यात. धमनीकाठिन्यता होण्याचा धोकाही याने टाळता येतो.

हृदयविकारांना दूर ठेवते
हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून लसूण वाचवते. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. याने रक्त पातळ होऊन रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होत नाहीत. पर्यायाने हृदयाच्या आरोग्यासाठी लसूण खाणे फायदेशीर आहे. हृदयासंबंधी समस्या असणार्‍या लोकांनी दररोज १ ते २ ठेचून बारीक केलेल्या लसणाच्या पाकळ्या खाव्यात.

मधुमेहाचा धोका कमी होतो
इन्सुलीन सेन्सिटिव्हिटी कमी झाल्याने टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. दररोज दोन ते तीन कच्च्या लसूण पाकळ्या खाल्ल्याने इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी सुधारण्यास मदत होऊन टाईप-२ मधुमेह होण्यापासून दूर राहता येते.

कॅन्सरचा धोका कमी होतो
कच्ची लसूण खाण्याने कॅन्सरचा धोका कमी होतो. फुफ्फुसाचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर यांपासून लसूण खाल्ल्याने रक्षण होते.

हिमोग्लोबीन वाढवण्यास मदत होते
शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण फायदेशीर ठरते. लसणात लोह असतो. लसणात डायली सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढते. म्हणजेच आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते.

  • बाहेरून वापरण्यासाठी व पोटात घेण्यासाठी लसणाचा उपयोग औषधी म्हणून केला जातो.
  • कफनाशक, पित्तनाशक व वातनाशक म्हणून याचा उपयोग केला जातो.
  • संधिवातामध्ये सांध्यांना लसणाचा लेप किंवा लसणाचे तेल लावावे.
  • नायटा, गजकरणसारख्या त्वचारोगांवर लसणाचा रस बोळाने लावावा.
  • तसेच कान दुखत असल्यास खोबर्‍याच्या तेलात लसणाच्या पाकळ्या गरम करून ते तेल कोमट झाल्यावर कानांमध्ये घालावे, कानदुखी कमी होते.
  • लसूण जेवणात सतत वापरल्याने पोटाचे विकास कमी होतात.
  • आमवात, संधिवात वगैरे वातविकारांत, तसेच अजीर्ण, अपचनमध्येसुद्धा लसूण सेवनाने आराम मिळतो.
  • अनेक प्रकारच्या नेत्ररोगांवर, दमा, हृदयविकार, ताप अशा अनेक रोगांवर लसूण उपयुक्त ठरते.
  • लसणाच्या नियमित सेवनाने कफ सुटतो.
  • लसणाने पोटातील वायूचा नाश होतो, श्‍वसननलिकेवर आलेली सूज कमी होते,
    पचनशक्ती सुधारते.
  • लसणामध्ये पौष्टिकता मोठ्या प्रमाणात असते, परंतु कॅलरीच्या बाबतीत हे प्रमाण कमी नसते.
  • लसणामध्ये असलेल्या घटकांमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. लसणाचे सेवन करणार्‍या व्यक्तीला सर्दी, ताप, कमी वेळा होतो. लसणातील पोषक घटक साधारण सर्दी-तापासारख्या आजारांपासून रक्षण करतात.
  • अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश हे मेंदूशी निगडीत आजार आहेत. लसणामध्ये असणारे ऍन्टीऑक्साडन्ट घटक अशा आजारांवर उपयुक्त ठरतात. लसणाच्या अधिक सेवनाने ऍन्टीऑक्साडन्ट एन्झायममध्ये वाढ होते. शिवाय हायपरटेन्शनमध्ये होणारा ऑक्सिडेटिव्ह ट्रेस कमी करायला फायदेशीर ठरते. शिवाय रक्ताला पातळ ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मानसिक आजारांकरिता लसूण उपयुक्त ठरते.
  • लसूण सामान्य आजारांमध्येही फायदेशीर ठरते. सामान्य ताप ते संसर्गजन्य आजारामध्ये लसणाचे सेवन केल्याने रोगी बरा होतो. या अर्थी अप्रत्यक्षरीत्या लसूण आपल्याला दीर्घ आयुष्य प्रदान करते.
  • प्राचीनकाळी लढाई दरम्यान थकवा कमी करायला, तसेच मजुरांची काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी लसणाचा वापर होई. खेळाडूनांही लसूण खायला देत. शारीरिक क्षमतेमध्ये लसणामुळे सकारात्मक सुधारणा दिसते.
  • लसणामुळे किंवा त्याच्यातील सल्फरमुळे आपल्या शरीरातील जड धातूपासून तयार होणार्‍या आंतरिक विषापासून आपला बचाव होतो. लसूण खाल्ल्याने शरीरातील लेडचे प्रमाण आणि त्यातून होणारे दुष्परिणाम कमी होतात. लसणाच्या दैनंदिन सेवनामुळे महिलांमध्ये असणार्‍या एस्ट्रोजनची पातळी वाढली जाते. परिणामी त्यांच्या हाडांची झीज कमी होते. रजोनिवृत्तीनंतर लसूण अवश्य खावा.

भाजलेला लसून खाण्याचे फायदे

  • पुरुषांना शारीरिक कमजोरी दूर करायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी भाजलेला लसूण खावा. असे केल्याने शारीरिक दुर्बलता, थकवा व आळसदेखील दूर होतो. वजन कमी करण्याकरिता रात्री लसणाच्या पाकळ्या भाजून खाव्यात. शरीरातील चयापचयाची क्रिया सुधारते.
  • रात्री झोपण्यापूर्वी भाजलेला लसूण खाल्ल्यास वृद्धत्वाची लक्षणेदेखील टाळता येतात.
  • शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी लसणाच्या कळ्यांचे सेवन करावे. गर्भावस्थेत सुरुवातीच्या काही दिवसांत लसूण सेवन करू शकता. गर्भवती महिला आणि पोटातील बाळासाठी लसूण खाणे फायदेशीर असते. पण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच लसूण सेवन करावी.
  • पित्त प्रकृतीवाल्यांनी लसूण उष्ण व तीक्ष्ण असल्याने सेवन करू नये.

लसूण कशी खावी?
लसूण खाण्याचा आपल्या शरीराला उपयुक्त फायदा मिळण्यासाठी लसूण पाकळ्या सोलून ठेवून ५ ते १० मिनिटे तशीच ठेवावी व त्यानंतर लसूण खावी. ठेवल्यानंतर ऍलिसीन हे प्रभावी द्रव्य लसणामधून बाहेर येते. यामुळे हृदयाचे विकार, हायपरटेन्शन, हाय कोलेस्ट्रॉल व कॅन्सर होण्यापासून आपले रक्षण होते.
औषधीच्या रूपाने लसूण खाताना दररोज २ कच्च्या लसूण पाकळ्या खाव्यात. रात्री भाजलेल्या लसूण पाकळ्या २-३ खाव्यात. अधिक प्रमाणात कच्चा लसूण खाणे टाळावे.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे लसूण हे असे औषध आहे, ज्यामुळे सहाही द्रवे असतात. त्यामुळे प्रत्येकाने लसणाचा अवश्य उपयोग करावा. शक्य त्या स्वरूपात लसूण सेवन करावी.