आरबी लेइपझिग क्लबची प्रथमच उपांत्य फेरीत धडक

0
140

दानी ओल्मो आणि टायलर ऍडम्स यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलाच्या जोरावर आरबी लेइपझिगने ऍटलेटिको माद्रिद संघाला २-१ असे चकित करीत चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथमच आरबी लेइपझिग संघाने या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

रेड बुलने गुंतवणूक केलेल्या लेइपझिग संघाची स्थापना केवळ ११ वर्षांपूर्वी झालेली आहे आणि एवढ्याच्या छोट्या कालावधीच्या इतिहासात त्यांनी चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत धडक मारण्याची मोठी कामगिरी केलेली आहे. आता त्यांची उपांत्य फेरीतील पुढील लढत १९ ऑगस्ट रोजी पीएसजी संघाशी होणार आहे.

सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत संपले होते. या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. परंतु त्यांना यश आले नव्हते. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभीच ५०व्या मिनिटाला स्पॅनिश आघाडीपटू दानी ओल्मोने गोल नोंदवीत लेइपझिग संघाचे खाते खोलले. परंतु जुआव फेलिक्सने ७१व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करीत ऍटलेटिकोला १-१ अशी बरोबरी साधून देत सामन्यात रंगत आणली. परंतु पूर्ण वेळेस दोन मिनिटे बाकी असताना टायलर ऍडम्सने गोल नोंदवित लेइपझिगच्या २-१ अशा विजयावर शिक्कामोर्तब करतानाच संघाला प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून दिला. चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व व नंतर गोल करणारा ऍडम्स हा पहिला अमेरिकन खेळाडू ठरला आहे.

या विजयाबरोबरच आता लेइपझिग संघाला २३ ऑगस्ट रोजी होणार्‍या अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचण्याची संधी आहे.